हॉलीवूडमध्ये सुपरडुपर हिट ठरलेला आणि बॉलीवूडमध्येदेखील पाय रोवलेला सीक्वेलचा फंडा आता मराठीतदेखील रुजू पाहात आहे. टाइमपास पाठोपाठ आलेल्या अगंबाई अरेच्चाच्या सीक्वेलनं हेच दाखवून दिलं आहे. ‘अगंबाई अरेच्चा १’ मधलाच विनोदी फॅण्टसीचा जॉनर वापरत पण नायिकेच्या आयुष्यातील चमत्कृतीवर हा सीक्वेल बेतला आहे. अतर्क्य गोष्टीच्या खरेखोटेपणात न अडकवता प्रेक्षकांना त्यात बेमालूमपणे गुंतविण्याचं आणि त्यातील गमतीचा आनंद देण्यात फॅण्टसीचं यश दडलेलं असतं. पण कथानकाची खेचाखेच झाली की आत्तापर्यंत मजेशीर वाटणा-या अतर्क्य गोष्टींवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं, त्यातला ह्यूमर हरवत जातो आणि चांगलं कथानकदेखील बालिशपणाकडे झुकू लागतं.

‘अगंबाई अरेच्चा २’ ची नायिका शुभांगी कुडाळकर लहानपणापासूनच स्पर्शाच्या चमत्कृतीपूर्ण घटितांमध्ये अडकलेली असते. ज्याच्यावर तिचं प्रेम असेल आणि त्याचंदेखील तिच्यावर प्रेम असेल तर एकमेकांच्या स्पर्शामुळे त्या पुरुषाच्या आयुष्यात काही तरी अपघात घडणारच ह्या अनेक प्रसंगातून सिद्ध झालेल्या गृहीतकावर कथानकाचा डोलारा बांधला आहे (स्पर्शप्रेमाच्या चमत्कारात नातेवाईक, मित्रांचा समावेश नाही.) अर्थातच ती वैवाहिक आयुष्याला दुरावलेली असते. लग्नापासून दुरावलेल्या, दुखावलेल्या या शुभांगीचं आयुष्य पुस्तकात बंद करण्यासाठी लेखक विक्रम देसाई सरसावतो. लेखनप्रक्रियेच्या ओघात मात्र दोघे आपसूकच एकमेकांत गुंतत जातात आणि मग एका शुभांगीचं आयुष्य एका वेगळ्याच दिशेने जाऊ लागतं. आजवर स्पर्शातून झालेले अपघात आणि त्यातून बदलत गेलेली शुभांगी, स्पर्श न करता सुरू केलेलं वैवाहिक आयुष्य हे सारं फॅण्टसीच्या ढंगाने (कधी कधी गंभीरतेनं) मांडण्याचा प्रयत्न म्हणजे ‘अगंबाई अरेच्चा २’…

फॅण्टसीवर आधारित चित्रपट पाहण्याची आपल्याला चांगलीच सवय आहे. त्यातील गृहीतक पटो अथवा न पटो त्यावर बोलण्यात काहीच हशील नाही. पण मग अशी फॅण्टसी अती खेचली गेली की फॅण्टसीतल्या जगाची तुलना खºया जगाशी होऊ लागते. अंतिमत: फॅण्टसीची गंमत हरवते आणि ना तो चित्रपट विनोदाच्या पातळीवर उरतो, ना जाणिवेच्या. तसंच काहीसं येथे झालं आहे. अनेक ठिकाणी जाणवणारा संवादातला फोलपणा, सोशल मीडियावरील जोक्सचा वापर, ओव्हर रिअर्‍ँक्टग आणि केवळ कथा पुढे न्यायची म्हणून ओढूनताणून मांडलेले अनेक प्रसंग यातून हे सारंच कथानक बालिशपणाकडे झुकू लागतं.
स्पर्श न करण्याचं गृहीतक सिद्ध करताना सुरुवातीला मांडलेल्या प्रसंगातला विनोद नंतर मावळतो आणि सुरू होतो तो केवळ त्या गृहीतकावर जास्तीत जास्त पुटं चढविण्याचा प्रकार. स्पर्श न करता सुरू असणाºया वैवाहिक आयुष्यातील प्रसंग दाखविताना बालिशपणा परिसीमाच गाठतो. सत्यनारायणाच्या पूजेत हाताला हात लावताना स्पर्श होऊ नये म्हणून प्लॅस्टरचा आधार चालू शकतो तर पायात घुसलेली काच काढायला असाच काही प्रयोग न करता दारात आलेल्या कुरिअर बॉयचा वापर करण्यात जो निव्वळ बाष्फळ आणि फालतू विनोद निर्मितीचा प्रयत्न केला आहे त्यातून कथानक खेचण्याचा कळसच गाठला गेला आहे. मग चित्रपटाच्या जाहिरातीत वापरलेलं स्पर्शाची मज्जा हे शब्द आणखीनच बालीश वाटू लागतात.

सीक्वेलच्या पारंपरिक फंड्यातील मांडणीचा साचा येथे नाही. एखादी चमत्कृतीपूर्ण शक्ती ही मध्यवर्ती संकल्पना सामायिक ठेवून कथानक मांडणे हा अर्थातच वेगळा प्रयोग म्हणावा लागेल हे निश्चितच कौतुकास्पद आहे. प्रीक्वेलचं कथानक पुढं सरकत नसलं तरी सीक्वेलची तुलना प्रीक्वेलमधील इतर घटकांशी होत राहतेच. प्रीक्वेलमध्ये चमत्कारी शक्ती मिळाल्यावर होणारा बदल मांडताना दिसलेल्या गमतीचा येथे पूर्णत: अभाव आहे. नव्या दमाच्या संगीतकाराने दिलेल्या गाण्यांनी ही उणीव भरून काढायचा प्रयत्न केला असला तरी तो तोकडा वाटतो. चित्रपटातील तांत्रिक बाजू आणि ज्याप्रमाणे चित्रपट साकारला आहे त्यानुसार पात्रनिवड योग्य आहे.
मात्र चित्रपट संपल्यानंतर त्यातल्या ह्यूमरपेक्षा बालिशपणाच लक्षात राहिल्यामुळे अगंबाई अरेच्चाऐवजी अगंबाई बालिश असच म्हणावंसं वाटलं तर काही गैर नाही…

निर्माता – नरेंद्र फिरोदीया आणि सुनील लुल्ला
बॅनर – इरॉस इंटरनॅशनल, अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट, केदार शिंदे प्रॉडक्शन.
सहनिर्माता – बेला शिंदे.
दिग्दर्शक – केदार शिंदे.
कथा – दिलीप प्रभावळकर, केदार शिंदे.
पटकथा – ओंकार मंगेश दत्त.
संवाद – दिलीप प्रभावळकर, केदार शिंदे, ओंकार मंगेश दत्त.
छायाचित्रलेखन – सुरेश देशमाने
गीत – अश्विनी शेंडे, मनोहर गोलांबरे, ओंकार मंगेश दत्त.
संगीत – निशाद
कलावंत – सोनाली कुलकर्णी, धर्मेंद्र गोहील, गौरवी, शिवराज वायचळ, सुरभी हांडे, माधव देवचक्के, भरत जाधव, प्रसाद ओक, मिलिंद पाठक, उमा सरदेशमुख, विद्या पटवर्धन, वरुण, स्वप्निल मुनोत.