lp31२७ वर्षांच्या कारावासानंतर खचून न जाता नेल्सन मंडेला यांचे प्रत्येक पाऊल दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य, लोकशाही व स्वयंशासनाकडे नेणारे होते. आयुष्यभर आदर्श जीवनमूल्य जपणाऱ्या मंडेला यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त हा लेख.

That straight walk from the prison to the gate. That walk the world saw and which changed the world it led you through to life from  life withheld  from broken stones with your  unbroken heart.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Ajit Pawar and Sharad Pawar
लोकजागर- विभाजितांची ‘हतबलता’!
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!
Pakistan former Prime Minister Imran Khan
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दिलासा, १४ वर्षांच्या शिक्षेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाची स्थगिती

नेल्सन मंडेला २७ वर्षांच्या प्रदीर्घ कारावासातून (जून १९६४ ते फेब्रु. १९९०) बाहेर आल्यानंतर इंग्लिश राजकवी अँड्रय़ू मोशन यांना स्फुरलेल्या कवितेतील हे एक कडवे. एवढा भयानक तुरुंगवास भोगल्यानंतर एखादा सामान्य माणूस पार खचून गेला असता; परंतु मंडेला हे एक अजब रसायन होते. ताठ मानेने, दमदार पावले टाकीत, हसतमुखाने आणि खंबीर मनाने त्यांनी कारागृहाला निरोप दिला. त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर जणू काही बंदिवासात असलेली स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही त्रयीही चालत होती. मंडेलांचे प्रत्येक पाऊल हे दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याकडे, स्वयंशासनाकडे, लोकशाहीकडे नेणारे होते.

लौकिकार्थाने मंडेला तुरुंगाच्या चार भिंतींतून मुक्त झाले असले तरी ते दक्षिण आफ्रिका या विशाल कारागृहातच परतले होते. फेब्रु. १९९० मध्ये मंडेलांची सुटका झाली तेव्हा द.आ. म्हणजे एक विशाल तुरुंगच बनलेला होता. पी.डब्ल्यू. बोथांच्या वर्णद्वेषी सरकारने अन्याय, जुलूम यांचे सर्वोच्च शिखर गाठलेले होते. (Securocratic Regime) गोरे विरुद्ध काळे असे राजकीय ध्रुवीकरण झालेले होते आणि आर्थिक, सामाजिक स्तरावर विषमतेची भयानक दरी निर्माण झालेली होती. द.आ.चे मूळ भूमिपुत्र निग्रो हे दारिद्रय़, अज्ञान, रोगराई यांनी ग्रस्त होते अन् वर्णद्वेषी सरकारच्या अन्याय्य

धोरणांमुळे ही निरपराधी, साधीभोळी जनता साध्या माणुसकीलाही पारखी झाली होती.

आंतरराष्ट्रीय दबावामुळे बोथांचे सरकार व आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे (ANC) नेते यांच्यात वाटाघाटी चालू होत्या. द.आ.ला लोकशाहीचे, स्वयंशासनाचे अधिकार देण्यासाठीची ही बोलणी कूर्मगतीने चालू होती. मंडेलांसारखा शांत डोक्याचा, समन्वयवादी नेता या वाटाघाटी करत होता. त्यामुळे अनेक वेळा बोलणी फिसकटल्यानंतरही चर्चेत खंड पडला नाही. सुदैवाने जाने. १९८९ मध्ये आजारपणामुळे दुराग्रही बोथांना पदत्याग करावा लागला व त्यांच्या जागी डी. क्लार्क हे मवाळ गृहस्थ द.आ.चे अध्यक्ष झाले. सरकार व आफ्रिकन नॅशनल काँग्रेस यांच्यामधील सामंजस्य वाढले. राजबंद्यांची सुटका करण्यात आली. मंडेलांचा कारावासही संपला. या वेळेची द.आ.ची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती अराजकाला निमंत्रण देणारी होती. खवळलेला जनसमुदाय छोटय़ाशा चिथावणीनेही हिंसक बनत होता; परंतु मंडेलांचे आपल्या गोरगरीब जनतेवर संपूर्ण प्रभुत्व होते. द.आ.मधील धगधगती परिस्थिती त्यांनी कौशल्याने हाताळली. अखेरीस वाटाघाटी यशस्वी होऊन द.आ.च्या स्वयंशासनाचा दिवस उजाडला. २७ एप्रिल १९९४ रोजी द.आ.च्या कोटय़वधी लोकांनी मतदान केले. अध्यक्ष म्हणून प्रचंड बहुमताने मंडेलांची निवड झाली.

एका मृतप्राय झालेल्या राष्ट्राला संजीवनी देण्याची, राष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न साकारण्याची, लोकांच्या आशाआकांक्षांना मूर्तरूप देण्याची खडतर जबाबदारी मोठय़ा विश्वासाने जनतेने आपल्या प्रिय मडिबांकडे सोपवली. पुढील पाच वर्षांच्या आपल्या लोकाभिमुख, सर्वसमावेशक कारभारामुळे मडिबांनी हा विश्वास सार्थ ठरवला. Reconciliation before recrimination, healing before bitterness, peace before conflict (एकमेकांवर दोषारोप न करता समेट घडवून मैत्रीचा हात पुढे करणे, कटुता निर्माण होण्याआधीच त्यावर उपाययोजना करणे व संघर्षांआधीच शांतता प्रस्थापित करणे.) या त्रिसूत्रीनुसार मंडेलांनी कारभार केला. जुना इतिहास उगाळत न बसता मार्गक्रमण करण्याचे भान त्यांच्याजवळ होते. आपल्या एका भाषणात मंडेला म्हणाले, ”South Africa has long traversed past a mindset  that seeks to heap all blame on the past and others” म्हणूनच आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर विजयाने बेहोश झालेल्या जनतेला काबूत ठेवण्यात मंडेला यशस्वी झाले. मडिबांच्या लोकप्रियतेमुळे, जनसामान्यांवरील त्यांच्या प्रभावामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. वर्णद्वेषी गोऱ्यांना अभय मिळाले. इतकेच नव्हे, तर नवीन सरकारमध्ये डी. क्लार्क उपाध्यक्ष झाले व नॅशनल पार्टीच्या इतर काही लोकांनाही मंत्रिपद मिळाले.

द.आ.चा राज्यशकट हाकताना त्यांनी अगदी बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष पुरवले. शिक्षणाची दुरवस्था दूर करून शिक्षण पद्धती सदृढ करणे हे सर्वात महत्त्वाचे काम होते. वर्णद्वेषी सरकारने निग्रोंना निकृष्ट प्रतीचे शिक्षण मिळेल अशीच व्यवस्था केलेली होती. द.आ.चे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचे महत्त्वाचे कार्य मंडेलांना करावे लागले. त्यांनी सर्वाना उत्तम दर्जेदार शिक्षणाचे द्वार खुले करून दिले. द.आ.ची सर्वागीण प्रगती होण्यासाठी उच्चविद्याविभूषित तरुणांची गरज आहे हे ओळखूनच त्यांनी शिक्षण सुधारणेला सर्वाधिक प्राधान्य दिले. शैक्षणिक धोरण आखत असतानाही मंडेलांच्या समंजस वृत्तीचा प्रत्यय आला. त्यांच्या मंत्रिमंडळातील जहाल विचारसरणीचे लोक, गोऱ्या लोकांनी चालू केलेल्या शैक्षणिक संस्थांना सरकारी अनुदान देण्याच्या विरुद्ध होते; परंतु मंडेलांनी हे अविचारी पाऊल उचलले नाही. त्यांनी संबंधितांच्या लक्षात आणून दिले की, गोऱ्यांच्या शिक्षण संस्थांतही निग्रोंना मोठय़ा प्रमाणात प्रवेश मिळत आहे.

द.आ.च्या विशाल भूखंडावर पसरलेल्या जनतेच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी दळणवळणाची साधने, वीज, शुद्ध पाणी, स्वस्त घरे, उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करण्यावर त्यांनी भर दिला. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असतानाच द.आ.ची औद्योगिक प्रगती होणे, आर्थिक परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे याचेही उत्तम भान त्यांनी ठेवले होते. त्यासाठीच अनेक देशांना भेटी देऊन, अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊन त्यांनी विदेशी मदतीचा ओघ दक्षिण आफ्रिकेकडे वळवला. त्याचबरोबर Masakhane (मसाखाने) म्हणजे स्वत:च्या उज्ज्वल भवितव्यासाठी जनतेनेच पुढाकार घेऊन सरकार आणि नागरिकांमध्ये सहकाराचे वातावरण निर्माण करणे हा परवलीचा शब्द झाला. विनाशाच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या द.आ.ला त्यांनी समर्थ लोकशाहीच्या पायावर उभे केले. मडिबांच्या राष्ट्रउभारणीच्या या कार्याचे वर्णन केवळ ‘चमत्कार’ या एकाच शब्दाने करता येते.

धर्म, जात, वर्ण यावर माणसाचे विभाजन न करता सर्वाना समान वागणूक देणारी राज्यघटना ही मडिबांनी दक्षिण आफ्रिकेला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. मानवतेसाठी, शांततेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून १९९३ साली त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. १९९८ साली द.आ.च्या संसदेत भाषण करताना क्युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो म्हणाले, ‘‘मडिबांनी भोगलेल्या २७ वर्षांच्या कारावासामुळे त्यांना इतिहासात स्थान मिळालेले नाही, तर त्यांनी अन्याय्य कारावासाबद्दल कुठलीही कटुता न ठेवता, सुडाची भावना उफाळू येऊ न देता, राष्ट्रबांधणीचे कार्य केले. त्यामुळेच ते चिरंजीव झाले आहेत. त्यांची सहिष्णुता व ज्या चतुराईने त्यांनी विजयाने बेभान झालेल्या जनसमुदायाला आवरले त्याची आठवण जगाला सदैव राहील.’’ फिडेल कॅस्ट्रो पुढे म्हणाले, ”Mandela was aware that the new S.A. would be never be built on foundations of hatred and revenge.” 

मडिबा (त्यांच्या झोसा (xhosa) जमातीकडून मिळालेले नाव) लहान असताना शेकोटीभोवती बसून आपल्या जमातींतल्या ज्येष्ठांकडून दक्षिण आफ्रिकेच्या शूरवीरांच्या, मकाना, ऑटशुमाओसारख्या वीर पुरुषांच्या गोष्टी ऐकत. या गोष्टी ऐकताना आपणही असेच हिरो होण्याची स्वप्ने त्यांच्या डोळय़ांत तरळत. नियतीने नेल्सन रोलिल्हल्हा मंडेलाचे हे स्वप्न पुरे केले. आज त्यांना दक्षिण आफ्रिकेचे सर्वश्रेष्ठ नायक म्हणून गौरविले जाते. आपल्या विरोधकांना, मानवतेच्या शत्रूंना बळाने नामोहरम न करता, प्रेम, क्षमा आणि सामंजस्य यांच्याद्वारे त्यांनी वर्णद्वेषी सरकारबरोबरच्या संघर्षांतून द.आ.ला सुखरूप बाहेर काढले.

मडिबा काळाच्या पडद्याआड गेले असले तरी (५ डिसें. २०१३) त्यांनी आयुष्यभर जोपासलेली आदर्श जीवनमूल्ये संपूर्ण मानवजातीला सतत प्रेरणादायी ठरतील. धर्म-वर्ण, जातीपाती यांच्या आधारे माणसा-माणसांमध्ये कृत्रिम भिंती उभ्या करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करून सर्व मानवांमध्ये बंधुत्वाची, मित्रत्वाची भावना निर्माण करणे, हीच या महामानवाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल!