अनेकांना सध्या कॅण्डीक्रश या मोबाइल गेमने वेड लावलंय. या खेळाच्या विविध लेव्हल्स, त्या पूर्ण करण्याचे मार्ग, मोबाइलसह फेसबुकवरही खेळता येण्याची सोय, ऑनलाइन खेळण्याचा बोलबाला, मित्रपरिवारात सुरू असलेली चढाओढ या साऱ्यामुळे कॅण्डी क्रश प्रेमींनी याच्या लेव्हल्स पूर्ण करण्याचा जणू विडाच उचललाय. पण हे ध्येय पूर्ण करण्याच्या नादात शारीरिक आणि मानसिक विकारांना ते आमंत्रण देतायत याचा मात्र त्यांना विसर पडू लागलाय.

तनयच्या घरचे सगळे गप्पा मारत होते. काका ऑफिसमधले किस्से सांगत होता तर ताई ट्रेनमधल्या बायकांची भांडणं रंगवून सांगत होती. आजोबांच्या भूतकाळातल्या आठवणी अधेमधे डोकावत होत्या. काकूच्या कुकरी शोजचं कौतुकही मध्येच यायचं. पण या सगळ्या गोतावळ्यात तनयने मात्र घरातला एक कोपरा पकडला होता.

lp20या सगळ्या गप्पांचं त्याला अजिबात भान नव्हतं. कोण कशाबद्दल काय बोलतंय याची काहीच माहिती त्याला नव्हती. घरातला तो एक कोपरा, हातात मोबाइल आणि नजर एकटक त्या मोबाइलकडे. दोन्ही हातांचे अंगठे आळीपाळीने मोबाइलच्या स्क्रीनवर एकदा आडवे आणि उभे असे फिरत होते. तो नेमकं काय करतोय हे कोणालाच कळेना. शेवटी त्याची आईच त्याच्याजवळ गेली. तेव्हा तिला कळलं, ‘कॅण्डीक्रश सागा’ नावाचं भूत हे तिच्याही घरात आलंय. मग काय,‘गोकुळ एवढे गाढ झोपले, कृष्ण सखा जागा,
खेळत बसला यमुनातीरी कॅण्डीक्रश सागा’ हा लोकप्रिय मेसेज त्याच्या आईने सगळ्यांसमोर जोरात वाचून दाखवला आणि घरात सगळेच हसायला लागले. अखेर त्यांच्या हसण्यामुळे तनयचं लक्ष गेलं. जवळपास दोन तासांच्या गप्पांच्या मैफलीपासून तनय तिथे असूनही नसल्यासारखा झाला होता.

अ‍ॅडिक्ट आहात कसे ओळखाल?
तुम्ही कॅण्डीक्रश खेळताना तुमच्याशी कोणी बोलायला आलं आणि तुमचं लक्ष खेळातून विचलित झालं म्हणून जर तुमची चिडचिड झाली तर तुम्ही खेळात पूर्णत: गुंतलेले आहात असं समजा.
रोजच्या आयुष्यातली महत्त्वाची कामं बाजूला ठेवून तुम्ही हा खेळ खेळत असाल तर या खेळाचे तुम्ही अ‍ॅडिक्ट झालेलं आहेत.
जेवण कमी करून तो वेळ तुम्ही खेळात घालवताय म्हणजे त्या खेळाच्या तुम्ही अधीन झाला आहात.
मित्रपरिवार, कुटुंबातले सदस्य, नातेवाईक यांच्याशी संवाद न साधता त्यात गुंतले असाल म्हणजे या खेळाने तुम्हाला वेड लावलंय.
बोटं, पाठ, डोळे, डोकं हे कॅण्डीक्रश हा गेम खेळूनच दुखतंय हे तुम्हाला माहीत असूनही तुम्ही कॅण्डी क्रश खेळणं सुरूच ठेवलं तर याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुम्हाला त्या खेळाचं अ‍ॅडिक्शन आहे.

हे चित्र एकटं तनयच्याच घरचं नाही. तर असे असंख्य तनय घराघरांत सापडतील. ‘कॅण्डीक्रश सागा’ हा मोबाइल गेम याचं कारण. ‘तुझी कोणती लेव्हल पूर्ण झाली’, ‘मला ही एवढी लेव्हल पूर्ण करून दे ना प्लीज’, ‘किती दिवस झाले यार मी त्याच लेव्हलवर अडकले आहे’, ‘मोबाइल दे रे जरा. गेम खेळायचाय’ अशा वाक्यांनी आता कट्टा, घर, ट्रेन, ऑफिस अशा सगळ्याच ठिकाणी कब्जा केला आहे. ‘सबवे सर्फ’, ‘टेंपल रन’ या गेम्सनंतर आता लोकप्रिय झालाय तो ‘कॅण्डीक्रश.’ ट्रेनमध्ये अनेकांच्या हातात मोबाइल असतो आणि त्यावर कॅण्डीक्रशची स्क्रीन ओपन असते. वेळ घालवणं हे या खेळामागचं प्रमुख कारण असलं तरी त्यामागेही अनेक कारणं दडली आहेत. एकाग्रता वाढवणं, समाधान मिळणं, ताण घालवणं अशी अनेक कारणं हा खेळ खेळणारे सांगतात. तर दुसरीकडे कॅण्डीक्रशच्या रिक्वेस्ट फेसबुकवर पाठवणाऱ्यांनी उच्छाद मांडलाय. रिक्वेस्ट्स पाठवू नका असा संदेश सूचित करणाऱ्या गोड, काही अति गोड तर काही उपहासात्मक गोड अशा स्टेट्सने फेसबुकवर गर्दी केली. असे स्टेट्स टाकूनही अनेक जण रिक्वेस्ट्स पाठवतच राहिले. त्यामुळे अशा रिक्वेस्ट्स प्रेमींना काहींनी त्यांच्या फ्रेंड लिस्टमधून जाहीरपणे बेदखलही केलं. एकूणच कॉलेज, ऑफिस, घरासोबतच आता सोशल साइट्सच्या कट्टय़ावरही कॅण्डीक्रशच्या चर्चानी उधाण आणलंय.

लोकप्रिय मोबाइल गेम्स
० कॅण्डीक्रश
० बबल शूट
० सब वे सर्फ
० टेंपल रन
० तीनपत्ती
० वर्ड सर्च
० डॉट्स
० २०४८
० अँग्री बर्ड
० फ्रुट निंजा

कॅण्डीक्रश असा खेळतात
या गेममध्ये एका लाइनमध्ये गोल, चौकोनी, अंडाकृती आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या कॅण्डीज आणि चॉकलेट्स असतात.
एकाच रंगाच्या तीन कॅण्डीज, चॉकलेट्स एकत्र आडव्या किंवा उभ्या रेषेत आणाव्या लागतात. त्या एकत्र आल्या की त्या क्रश होतात आणि एकेक पायरी पुढे जात राहतो.
यामध्ये मॅजिक बॉल, बोनस पॉइंट, लाइफलाइन असे प्रकार आहेत.
मॅजिक बॉलचा वापर शक्यतो लगेच करू नये. एकाच रंगाच्या कॅण्डी एका बाजूला जमा करून मगच या मॅजिक बॉलचा वापर करावा. यामुळे पाँइंट्सची संख्या वाढते.
एकेक पायरी पुढे जाताना प्रत्येक लेव्हलमध्ये किती मुव्हस म्हणजे कॅण्डीजची अदलाबदल करण्याच्या किती संधी आहेत याची संख्या दिलेली असते. त्यामुळे लेव्हल पूर्ण करताना या संख्येकडे लक्ष असणं आवश्यक असतं.
जेली, फळं असे घटक लेव्हल्समध्ये असतात. ते संपवण्याचा कठीण टास्क असतो. अशा वेळी मूव्हची मर्यादित संख्या आणि जेली, फळं संपवणं अशी दुहेरी जबाबदारी असते.
प्रत्येक लेव्हल पूर्ण करण्याच्या पाच संधी संपल्या तरी फेसबुकच्या माध्यमातून खेळाडूला त्याच्या मित्रांना लाइफलाइनसाठी रिक्वेस्ट पाठवू शकतो.

कॅण्डीक्रशच्या आधी फार्मविले या गेमने भुरळ घातली होती. फेसबुकवरचा हा सर्वाधिक खेळला जाणारा खेळ होता. तेव्हाही याबाबत चर्चा होत होती. एकमेकांच्या शेतात काम करायचं, मग शेत पूर्ण झालं की ते विकत घ्यायचं अशा अनेक गोष्टी त्यामध्ये असतात. याचीही क्रेझ तितकीच होती. पण फरक इतकाच की तो फक्त फेसबुकवर खेळला जात होता. कॅण्डीक्रशप्रमाणे अँड्रॉइडवर तो गेम अजून आला नाही. मात्र कॅण्डीक्रश हा फेसबुक, अँड्रॉइड आणि आता विंडोज फोन अशा तिन्हीवर उपलब्ध असल्याने याची लोकप्रियता तुफान आहे. कॅण्डीक्रश हा गेम एकाग्रता वाढवण्यासाठी खेळला जातो असं अनेकांचं म्हणणं आहे. पण त्यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी सांगतात, ‘कॅण्डीक्रश हा गेम खेळल्याने एकाग्रता वाढते हा समज पूर्णत: चुकीचा आहे. एकाग्रता वाढवण्याचे दुसरे अनेक चांगले पर्याय आहेत. एकाग्रता वाढवण्यासाठी योगा, मेडिटेशन, नृत्य असे पर्याय आहेत. तो खेळ खेळताना तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टींचं भान राहात नाही याचा अर्थ तुमची एकाग्रता वाढतेय असा अजिबात होत नाही. याच मुद्दय़ाला डॉ. वाणी कुल्हळी हे मानसोपचारतज्ज्ञ दुजोरा देतात. त्या सांगतात, ‘‘कॅण्डीक्रश या गेमकडे केवळ विरंगुळा म्हणून बघायला हवं. एकाग्रता वाढवण्यासाठी याचा वापर करू नये. एकाग्रता वाढते असा समज करून तो गेम खेळला जातो. पण त्याचं प्रमाण वाढल्याने त्याचे दुष्परिणामच होतात.’’

वापरावर नियंत्रण असायलाच हवं
lp21 कोणताही मोबाइल गेम फार काळ टिकत नाही. किंवा एखाद्या मोबाइल फोनची लोकप्रियताही दीर्घकाळ टिकत नाही. दर तीनेक महिन्यांनी नवनवे मोबाइल फोन्स आणि गेम्स येतच राहतात. कॅण्डीक्रश लोकप्रिय असण्याची अनेक कारणं आहेत. रंगीबेरंगी आहे. खेळायला सोपा आहे. भरपूर लेव्हल्स आहेत. मुख्य म्हणजे हा गेम खेळण्यासाठी साथीदार असणं आवश्यक नाही. त्यामुळे एकटं असतानाचा वेळ हा खेळ खेळण्यात खर्च केला जातो. या खेळामुळे स्मरणशक्ती कमी होते. कॅण्डीक्रशचं अ‍ॅडिक्शन ही वेगळी समस्या नाही. तर संपूर्ण इंटरनेट अ‍ॅडिक्शन हीच मोठी समस्या आहे. कुठलंही मनोरंजनाचं माध्यम हे मनं ताजतवानं करण्यासाठी वापरलं जावं. त्याचा आवश्यक तितका वापर केला तरच ते फायदेशीर ठरतं.
डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ.

मुलांना गेम्सची भुरळ घालूच नका
lp22कॅण्डीक्रश हा खेळ समजायला सोपा आहे. त्यामुळे इथे तुम्ही किती सुशिक्षित आहात हा मुद्दा येत नाही. म्हणून हा खेळ लोकप्रिय आहे. बाजारात कोणतीही नवीन गोष्ट आली की त्याबाबतची उत्सुकता वाढते. या उत्सुकतेमुळेच त्यातल्या विविध गोष्टी आजमावून बघितल्या जातात. आणि यामुळेच विशिष्ट गोष्टीबाबत अ‍ॅडिक्शन वाढतं. मनोरंजनाच्या साधनांपैकी कॅण्डी क्रश एक असलं तरी तो शेवटचा पर्याय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कंटाळा आला तर मित्र-मैत्रिणींना भेटा, कुटुंबासोबत फिरायला जा. कॅण्डी क्रश हा स्ट्रेस घालवण्याचा एकमेव पर्याय नसून तो अशा पर्यायांमधला शेवटचा पर्याय आहे. लहान मुलांना तर अशा गेम्सशी भुरळ घालूच नये. कारण कॅण्डीक्रशमध्ये गोष्टी वेगाने घडत असतात. त्यामुळे मुलं चंचल स्वभावाची होतात. म्हणून अभ्यास करताना त्यांना तो वेग संथ वाटतो आणि कंटाळा येतो. त्यांची एकाग्रता कमी होते. यासाठी पालकांनी सतर्क असायला हवं. आपल्यासाठी किती आणि काय चांगलं आहे याचं भान ठेवलं पाहिजे.
डॉ. वाणी कुल्हळी, मानसोपचारतज्ज्ञ

कॅण्डीक्रश आवडणाऱ्यांमध्ये सगळ्या वयोगटातली मंडळी आहेत. पण काहीजण केवळ गंमत म्हणून या खेळाचा वापर करतात. ताण घालवण्यासाठी या खेळाचा उपयोग करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. श्रद्धा देवधर या गृहिणी सांगतात, ‘‘केवळ गंमत म्हणून मी हा खेळ खेळते. रोजची महत्त्वाची कामं संपली आणि मोकळा वेळ असल्यास मी या खेळाचा विचार करते. आव्हानात्मक खेळ आहे या दृष्टीने मी विचारच करत नाही. इतका गांभीर्याने विचार करूही नये असं मला वाटतं.’’ असंच काहीसं म्हणणं आहे उदय जोग यांचं. ‘‘मोबाइलमधल्या कोणत्याच खेळात इतकं गुंतून जाऊ नये असं मला वाटतं. आपलं मनोरंजन होण्यासाठी त्याचा किती वापर करायचा हे आपल्या हातात असतं’’, असं ते म्हणतात. तर याउलट याचं अ‍ॅडिक्शन असल्याचं अनेक जण कबूलही करतात. एखादी लेव्हल पूर्ण होत नसल्याचा मनस्ताप होतो. तो मनस्ताप इतक्या टोकाला जातो की एखाद्याकडून जमेल तितक्या लवकर ती लेव्हल पूर्ण करून घेतली जाते. हा खेळ खेळून एकाग्रता वाढते असं अनेकांचं म्हणणं असलं तरी लेव्हल पूर्ण करण्यापर्यंत आवश्यक असलेली संयमी वृत्ती मात्र कमी होताना दिसते. ठरावीक लेव्हल पूर्ण झाल्यानंतर पुढचा टप्पा गाठण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता एकाच वेळी अनेकांना ‘लाइफ’ची रिक्वेस्ट पाठवली जाते. यातून संयमी वृत्ती कमी होताना दिसते.

स्पर्धात्मक दृष्टिकोन तयार होतो
lp23कॅण्डी क्रश हा खेळ मी फेसबुकवर खेळायला सुरुवात केली. फेसबुकवर आपण एकेक लेव्हल पूर्ण करत गेलो की, इतरांच्या कोणत्या लेव्हल सुरू आहेत हेही दिसतं. यामुळे स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. एक जण ठरावीक लेव्हलपर्यंत गेलाय तर त्याच्यापुढे जायला हवं हा दृष्टिकोन हा खेळ खेळायला प्रवृत्त करतो. असं असलं तरी मी या खेळाच्या अधीन नाही, म्हणून मी अजून साठाव्या लेव्हलवरच आहे. हातातलं काम सोडून तुम्ही हा खेळ खेळणं हे योग्य नाही. सहज गंमत म्हणून या खेळाकडे बघावं. एखादी लेव्हल पूर्ण होत नसल्याचा त्रासही होतो. पण तो कितपत करून घ्यायचा हेही आपल्याच हातात आहे. मेंदूला ताण देणारा हा गेम असला तरी तो आपल्या स्वत:मध्ये एकाग्रता, संयम या गोष्टींमध्ये सुधारणा करण्यासाठी असतो. त्यामुळे या ताणाचा त्रास होत नाही. ट्रेन, बसमध्ये प्रवास करताना मोकळ्या वेळेत मी हा गेम खेळते.
– किमया कुलकर्णी-पाध्ये, गृहिणी.
आनंद मिळतो!
lp24चार-साडेचार महिन्यांपासून मी हा गेम खेळतोय. सध्या माझी ६१८ वी लेव्हल सुरू आहे. हा गेम खेळताना आनंद मिळतो. टाइमपास म्हणून हा खेळ मी खेळतो. त्यातल्या नवनवीन लेव्हल्स पूर्ण करायला मला आवडतं. अनेकदा एखादी लेव्हल पूर्ण न होण्याचा मनस्ताप होतो, चिडचिडही होते. पण, तीच लेव्हल पूर्ण झाल्यावर मिळणारं समाधानही मला महत्त्वाचं वाटतं. हा गेम खेळताना रोजच्या कामातून जरा विश्रांती मिळते.
– प्रतीक सराफ, नोकरी
बिझी राहायला आवडतं!
lp25दोन वर्षांपासून मी हा गेम खेळतेय. १९८ वी लेव्हल सध्या सुरू आहे. मला या गेममध्ये बिझी राहायला आवडतं. एकटं राहायचं असेल, स्ट्रेस कमी करायचा असेल, नकारात्मक विचार दूर करायचे असतील तर हा गेम एक उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. पूर्वी मला या गेमचं अ‍ॅडिक्शन खूप होतं. म्हणजे रात्री मध्येच जाग आली आणि पुन्हा झोप येत नसेल तर हा गेम खेळायला मी सुरुवात करायचे. एखाद्या लेव्हलवर अडकले असेन तर ती सकाळी उठल्या उठल्या मी पूर्ण करायचे. कारण मला वाटायचं सकाळी फ्रेश माइंडने ती लेव्हल पूर्ण होते. एखादी लेव्हल सुटत नसेल तर तेव्हा संयम सुटतो. मग ती लेव्हल आपल्या पुढे गेलेल्या एखाद्याकडून पूर्ण करून घेणं हे माझं ठरलेलं काम आहे. हा गेम खेळण्यासाठी वेळेचं भान आणि चातुर्य अशा दोन्हीची आवश्यकता असते. एकाग्रताही महत्त्वाची आहेच. पण, याच्या अधीन गेल्याचे दुष्परिणामही जाणवतात. आता मोकळा वेळ मिळेल तिथे हा गेम खेळला जातो. पण, तो वेळ पुस्तकवाचनानेही भरून काढता येतो याचा सोयीस्कररीत्या विसर पडतोय.
– रसिका वेंगुर्लेकर
आव्हानात्मक खेळ
lp28कॅण्डीक्रश गेमचं अ‍ॅडिक्शन आहे हे मान्य करतो. माझी सीएची परीक्षा होती. त्या वेळी मी व्हॉट्सअप, हाइक, फेसबुक अशा सगळ्या सोशल साइट्सची अप मोबाइलमधून काढली होती. कॅण्डीक्रश हा गेम मात्र ठेवला होता. मित्रांमुळे या खेळाची आवड निर्माण झाली. सुरुवातीला मी त्यांच्या मोबाइलमध्ये हा गेम खेळायचो. मग तो गेम आवडायला लागल्यापासून मी माझ्या मोबाइलमध्येही घेतला. अ‍ॅडिक्शन वाढत गेलं. आव्हानात्मक गेम आहे असं वाटतं. सध्या मी २७० वी लेव्हल खेळतोय. एखादी लेव्हल पूर्ण झाली नाही की मनस्ताप होतो. पण, ती सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतो. अगदीच जमत नसेल तर एखाद्या मित्राकडून ती पूर्ण करून घेतो. यावर आणखी एक उपाय आहे तो म्हणजे एखादी लेव्हल मोबाइलमध्ये पूर्ण होत नसेल तर फेसबुकवर जाऊन ती पूर्ण करतो. कारण मोबाइलपेक्षा फेसबुकवर एखाद्या लेव्हलसाठी मिळणारी पॉवर जास्त आहे. टाइमपास म्हणून वेळ घालवण्यासाठी हा खेळ खेळतो. विशिष्ट लेव्हलपर्यंत गेल्याचं समाधान मिळतं. आवडीची गोष्ट असल्यामुळे गेममध्ये येणाऱ्या ताणाचा त्रास होत नाही. दिवसभरात मी एकूण चार ते पाच तास हा गेम खेळतो.
– निखिल जोशी, सीएचा विद्यार्थी

सीएचं शिक्षण घेत असलेली अदिती वाळिंबे या खेळाच्या फायद्यांसह तोटय़ांबाबतही बोलते. ती म्हणते, ‘‘कॅण्डीक्रश खेळण्यासाठी बुद्धीला चालना द्यावी लागते. पण दोन मिनिटांचा ब्रेक मिळावा यासाठी खेळायला सुरुवात केलेला हा खेळ कधी दोन तासांवर जातो कळत नाही. एकाग्रता वाढत असली तरी इतर गोष्टींचा हा खेळ खेळताना विसर पडतो.’’ खेळण्याच्या कालमर्यादेवरही मानसोपचारतज्ज्ञांनी मत व्यक्त केलं. डॉ. शेट्टी सांगतात, ‘‘दिवसभरात फक्त अर्धा ते पाऊण तास हा गेम खेळायला हरकत नाही. तेही फ्रेश वाटण्यासाठी याहून अधिक वेळ त्यासाठी दिला तर त्याचा शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही त्रास होण्याची शक्यता असते. टेक्नॉलॉजी हे अन्न नसून मिठासारखं आहे. गरजेपुरताच त्याचा वापर केला पाहिजे, हे लक्षात घ्यायला हवं.’’ तर डॉ. कुल्हळी सांगतात, ‘‘वास्तविक कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा एका तासापेक्षा जास्त वापर करू नये. पण आता काळानुरूप अनेक बदल झालेत. आता आयटी क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रांत कॉम्प्युटरचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होतो. कालांतराने याचे दुष्परिणामही सगळेच बघतात. तरी कामाचं स्वरूप बदलत असल्यामुळे पद्धतीतही बदल करावे लागतात. दिवसभरातल्या काही नकारात्मक गोष्टींपासून लक्ष विचलित करण्यासाठी कॅण्डीक्रशमधून मिळणाऱ्या पॉझिटिव्हिटीचा काही वेळ विचार करणं चालू शकतं. पण तरी दिवसभरात फक्त पाऊण ते एक तास इतकाच वेळ खेळावं.’’

आम्ही का खेळतो?

केवळ गंमत म्हणून बघावं
lp29कॅण्डीक्रश गेमचं मला व्यसन नाही. फक्त गंमत आणि टाइमपास म्हणून मी तो गेम खेळते. हातातली कामं सोडून खेळणाऱ्यांपैकी मी नाही. मोकळा वेळ घालवण्याचं साधन म्हणून मी या गेमकडे बघते. रोज रात्री एकदा मी हा खेळ खेळते. तेही झोप येत नसेल तरच. अन्यथा वेळ मिळत नाही. एखादी लेव्हल पूर्ण न झाल्याचं मी दु:ख किंवा मनस्ताप करून घेत नाही. कारण मी गांभीर्याने तो गेम खेळत नाही. निव्वळ एक गंमत म्हणून कॅण्डीक्रश या गेमचा विचार करावा असं वाटतं.
– श्रद्धा देवधर, गृहिणी
उत्सुकता वाढत जाते
lp30दीड वर्षांपासून मी हा खेळ खेळतोय. सध्या माझी ३१० वी लेव्हल सुरू आहे. टाइमपास म्हणून खेळतो. या गेममुळे मन ताजंतवानं राहतं. दिवसभराचा शीणही निघून जातो. एकेक लेव्हल पूर्ण करत गेलो की पुढची लेव्हल कशी अशी याची उत्सुकता निर्माण होते. ही उत्सुकता हळूहळू वाढत जाते आणि पुढच्या लेव्हल्स पूर्ण करण्याची जिद्दही बळकट होते. कामातला थकवा दूर करण्यासाठी या गेमचा वापर होतोय. पण, इथेही डोकं चालवावंच लागतं. बुद्धीचा वापर इथे करावा लागत असला तरी तो ‘गेम’साठी केला जातोय. त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. एखादी लेव्हल पूर्ण करताना लाइफ गेली तर मी फेसबुकवर मित्रमैत्रिणींना रिक्वेस्ट्स पाठवतो. दिवसभरात जवळपास दोन ते अडीच तास मी हा खेळ खेळतो. इतका वेळ सलग बसून हा खेळ खेळणं शक्य नाही त्यामुळे जमेल त्या वेळेत मी खेळतो. या खेळाचं अ‍ॅडिक्शन तर आहेच. एक दिवस खेळलो नाही तर चुकचुकल्यासारखं होतं.
– स्वप्निल भाटवडेकर, नोकरी
सगळ्यांचा विसर पडतो
lp31माझ्याकडे अँड्रॉइड फोन आल्यापासून आणि कॅण्डीक्रश हा गेम त्यावर आल्यापासून मी हा खेळ खेळतेय. या गेमचे फायदे तसे तोटेही आहेत. मध्यंतरी दोनदा हा गेम मी फोनमधून काढून टाकला होता. कारण त्यामुळे खूप वेळ जातो असं माझ्या लक्षात आलं होतं. पण, पुन्हा तो मोबाइलमध्ये मी घेतला. अभ्यास करताना थोडा वेळ ब्रेक हवा म्हणून मी खेळते. पण, पाच मिनिटांचे दोन तास कधी होतात ते कळत नाही. एखादी लेव्हल पूर्ण झाली नाही की मनस्ताप होतो, इगो दुखावतो. हा गेम खेळताना सगळ्याचाच विसर पडतो. ट्रेनमध्ये आहोत, रस्त्याने चालतोय, लेक्चरला बसलोय या सगळ्याचा विसर पडतो. या गेममधल्या वेगवेगळ्या लेव्हल्समुळे एकाग्रता वाढते. कठीण लेव्हल पूर्ण करण्यासाठी डोकं वापरलं जातं. बुद्धीला चालना मिळते. त्यामुळे हा गेम खेळावासा वाटतो. यामुळे आपला वेळ वाया जातो हेही समजत असतं. पण, ते अ‍ॅडिक्शन असल्यामुळे ते पूर्णत: थांबवणं कठीण आहे. पण, जादा कष्ट घेऊन फेसबुकवर रिक्वेस्ट्स पाठवण्याइतकी मी नक्कीच अधीन नाही.
– अदिती वाळिंबे, सीएची विद्यार्थिनी
फक्त मनोरंजनाचं साधन
lp32गंमत आणि टाइमपास म्हणूनच मी कॅण्डीक्रश खेळतो. दिवसभरातून अर्धा ते पाऊण तास खेळतो. कधी कधी दोन-दोन दिवस खेळतही नाही. फेसबुकवर खेळत नाही. आव्हानात्मकही वाटत नाही. खेळ म्हणूनच तो खेळावा. त्यात गुंतण्याचं काहीच कारण नाही. सध्या माझी २७५ ही लेव्हल सुरू आहे. एखादी लेव्हल पूर्ण होत नाही याचा मनस्ताप कधीच होत नाही. या खेळामुळे अ‍ॅडिक्ट व्हायला होतं हे खरंय. पण, त्यावर ताबा ठेवणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. ते मनोरंजनाचं एक साधन आहे. ते तसंच वापरावं. यामुळे एकाग्रता वाढते असं मला अजिबात वाटत नाही.
– उदय जोग, नोकरी

lp26सॉरी बेटा.. आज रात्री जेवायला थोडा उशीर होणारे..
माझ्या अजून पाच लाइव्हज शिल्लक आहेत. त्या पास झाल्याशिवाय मी नाही उठणार..

lp27पण दोन मिनिटांचा ब्र्रेक मिळावा यासाठी खेळायला सुरुवात केलेला हा खेळ कधी दोन तासांवर जातो कळत नाही.

५०० लेव्हल्स? माय गॉड! काय ग्रेट असणार ती व्यक्ती! मला तर अजून पन्नासदेखील लेव्हल्स् करता येत नाहीयेत.

कॅण्डीक्रश लोकप्रियतेची कारणे:
हा गेम आवडण्यामागचं पहिलं कारण म्हणजे यातल्या कॅण्डीज. अशा कॅण्डीज अनेकांनी त्यांच्या लहानपणी अनुभवल्या असतील. हा गेम खेळताना बालपणात हरवून जाण्याची मजा खेळणाऱ्यांना येते.
दैनंदिन आयुष्यातला तणाव या गेममुळे कमी होतो. ऑफिस, कॉलेज, प्रोजेक्ट्स या सगळ्याच्या ताणातून मुक्त होण्याचा कॅण्डीक्रश हा एक उत्तम पर्याय समजला जातो.
एकाग्रता वाढवण्यासाठी हा फायदेशीर ठरतो, असा खेळणाऱ्यांचा समज आहे.
विशिष्ट गोष्टीसाठी स्वत:ला प्रेरणा देण्यासाठी हा खेळ उपयुक्त ठरतो. या गेममध्ये असलेल्या लेव्हल्स काही वेळा पूर्ण होऊ शकत नाही. अशा वेळी ‘ट्राय ट्राय बट डोण्ट क्राय’ असं म्हणत स्वत:लाच धीर देऊन खेळ जिद्दीने पूर्ण केला जातो.
एखादी लेव्हल पूर्ण केल्याचा आनंद या खेळामुळे मिळतो. तर इतरांच्या तुलनेत या खेळाच्या लेव्हलमध्ये आपण खूप पुढे गेल्याची भावना सुखावणारी असते.

वॉव.. हेअर कट मस्त झालाय.. पण तो सुरू असताना मला माझा गेम थांबवावा लागला नाही हे जास्त मस्त..

ताण घालवण्यासाठी या खेळाचा वापर केला जातो असंही अनेकांचं म्हणणं असतं. पण ताण घालवण्याचे विविध पर्याय उपलब्ध असतात. त्यासाठी कॅण्डीक्रशचा वापर करणं चुकीचं आहे. डॉ. कुल्हळी एक उदाहरण सांगतात, ‘‘माझ्याकडे एक गृहिणी आली होती. मुलाला सांभाळण्यासाठी तिने नोकरी सोडली होती. पण तिला कॅण्डीक्रशचं इतकं वेड लागलं होतं की, हळूहळू तिचं तिच्या मुलाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. ‘मुलगा दूध पितोय, चला तोवर एक लेव्हल पूर्ण करू’’ असं ती करू लागली. यामुळे मुलाची रडरड वाढली आणि त्याचं संगोपन नीट होत नव्हतं. म्हणूनच महत्त्वाची कामं बाजूला ठेवून अशा खेळांच्या मागे कितपत धावायचं हे ज्याने-त्याने ठरवायला हवं. या खेळामुळे बोटं, पाठ, डोकं यांचे विकार उद्भवतात. असा शारीरिक त्रास व्हायला लागला की तेवढय़ापुरतं उपचार न घेता त्याच्या खोलवर जायला हवं. अशा शारीरिक त्रासांसह मानसिक त्रासही होतो. एकटं असल्यावर मनात या खेळाविषयीच विचार सुरू असतात. हा खेळ सुरू असलेली स्क्रीन सतत डोळ्यांसमोर येते. अमुक लेव्हल मित्राची पूर्ण झाली, पण माझी नाही या भावनेने इगोही दुखावतो.
‘ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये’ ही म्हण वारंवार वापरली जाते. हा ऊस सध्या ‘कॅण्डीक्रश’ या गेमच्या रूपात सगळ्यांच्या मोबाइलमध्ये उगवलाय. पण, तो ऊस मात्र मुळासकट खालला जातोय. आपल्याला काय आणि किती हवं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. कशामुळे आपला फायदा आणि नुकसान याचंही भान ठेवणं आवश्यक आहे. कॅण्डीक्रशसारखा केवळ विरंगुळा म्हणून असलेल्या खेळाला अनेकांनी त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवला आहे. सुरुवातीला वेळ घालवण्यासाठी आणि टाइमपास म्हणून खेळणारे अनेक जण आता या गेमचे अ‍ॅडिक्ट झाले आहेत. थोडा थोडा वेळ करतच अ‍ॅडिक्शनला सुरुवात होते हे लक्षात घ्यायला हवं. याचा शारीरिकच नाही तर मानसिकही परिणाम होतो. बोटं, पाठ, डोकं यांच्या विकारांसह स्मरणशक्ती कमी होणं, संयमी वृत्ती कमी होणं, अलिप्त रहाणं, अबोल होणं अशा मानसिक विकारांनी ग्रासले जातात. कोणतीही नवी गोष्ट आली की त्याबाबत कुतूहल वाटणं स्वाभाविक आहे. पण उत्सुकता, कुतूहल म्हणून एखाद्या गोष्टीच्या किती खोलात जायचं हे ठरवणं महत्त्वाचं आहे. आज कॅण्डीक्रश आहे उद्या आणखी वेगळा खेळ मोबाइलमध्ये येऊन हजर होईल. त्यामुळे हे जाळं आणखी वाढायच्या आतच कमी करायला हवं.