पुण्यानंतर मुंबईतही वेगवेगळ्या मतदारसंघातील मतदारांची नावे गायब असल्याचे गुरुवारी मतदानावेळी लक्षात आल्यामुळे असंख्य मतदारांना मतदानाला मुकावे लागले. सुमारे साडेसहा लाख मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईमधील सहा मतदारसंघांमध्ये त्यासोबतच लगतच्या ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघांमध्येही मतदानाला भरभरून प्रतिसाद मिळाला नाही. एप्रिलमधील उकाडा आणि असंख्य मतदारांची नावेच वगळण्यात आल्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारी झाल्याचे दिसते. दरम्यान, ठाण्यामध्ये एका मतदानकेंद्र अधिकारी महिलेचा मृत्यू झाल्याने निवडणुकीला गालबोट लागले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यातील १९ मतदारसंघांमध्ये मिळून ५५.९४ टक्के मतदान झाले.
मुंबईमधील लोकसभेच्या सहाही मतदारसंघात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ५२ ते ५६ टक्क्यांदरम्यान मतदान झाल्याचे दिसून आले. शहरातील वेगवेगळ्या मतदार केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसते होते. मात्र, दुपारनंतर मतदानाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही.
ठाण्यातील खोपट मतदानकेंद्रावर नियुक्तीला असलेल्या महिला अधिकारी वैशाली भाले यांचा मृत्यू झाल्याने निवडणुकीला गालबोट लागले. भाले यांना भोवळ आल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाले या न्यू बॉम्बे सिटी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या.
मुंबईतील अनेक भागांत मतदारांची नावे मतदारयादीत नसल्याचे गुरुवारी दिसून आले. यामुळे असंख्य लोकांना मतदानाला मुकावे लागले. एचडीएफसी बॅंकेचे अध्यक्ष दीपक पारेख, अभिनेता अतुल कुलकर्णी, अभिनेत्री वंदना गुप्ते यांचीही नावे मतदारयादीत नसल्यामुळे त्यांनाही मतदानापासून वंचित राहावे लागले. काहीही कारण नसताना आपले नाव मतदारयादीतून गायब कसे काय झाले, असा प्रश्न अनेकजण विचारत असल्याचे दिसून आले. मुंबईमध्ये माहीम, कुर्ला, चेंबूर या भागामध्ये अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून गायब झाल्याचे आढळले.
सेलिब्रिटींचे मतदान
मुंबईमध्ये गुरुवारी अनेक सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अमिताभ बच्चन, जया बच्चन, आमीर खान, गुलजार, विद्या बालन, फरहान अख्तर, प्रिती झिंटा, धर्मेंद्र, सोनम कपूर, सनी देओल, रेखा, मधुर भांडारकर, किरण राव, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांच्यासह मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही आपला मतदानाचा हक्क बजावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. अनिल अंबानी, वेणूगोपाल धूत, अदी गोदरेज यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
राज्यातील १९ मतदारसंघातील सहा वाजेपर्यंतची सरासरी टक्केवारी
* नंदुरबार – ६२%
* धुळे- ६१%
* जळगाव – ५६%
* रावेर – ५८%
* जालना – ६३%
* औरंगाबाद – ५९%
* दिंडोरी – ६४%
* नाशिक – ६०%
* भिवंडी – ४३%
* पालघर – ६०%
* कल्याण – ४२%
* ठाणे – ५२%
* उत्तर मुंबई – ५२%
* उत्तर-पूर्व मुंबई – ५३%
* उत्तर मध्य मुंबई – ५५
* उत्तर-पश्चिम मुंबई – ५०%
* दक्षिण मुंबई – ५४%
* दक्षिण-मध्य मुंबई – ५५%
* रायगड – ६४%