नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेत मुस्लिम समाजाच्या विरोधात सेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे शिवसेना-भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोदी तसेच उद्धव यांनी महाराष्ट्रातील प्रचाराच्या कोणत्याही टप्प्यात आगखाऊ भाषणे केली नाहीत. मात्र मुंबईतील सभेत कदम यांनी थेट मुस्लिमांचा बंदोबस्त करण्याचे वक्तव्य केले तेव्हा खुद्द उद्धवही आवाक होऊन पाहात होते. याचा फायदा काँग्रेसकडून पद्धतशीरपणे घेतला जाईल, असे सेना-भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
शिवसेनेने, त्यातही उद्धव यांनी आझाद मैदानावरील मुसलमानांनी केलेली दंगल आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याव्यतिरिक्त प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका तसेच विकासाचा मुद्दा यावरच भाषणे केली. काँग्रेसकडून सातत्याने गोध्रा व मोदींच्या लग्नासह महिलेवरील हेरगिरीचे आरोप होत असताना शिवसेनेत परतलेले खासदार मोहन रावले यांनी दक्षिण मुंबई व जोगेश्वरीमध्ये भाषण करताना गोध्रा आणि गुजरात दंगल यावेळी सोनियांनी संसदेत घेतलेली भूमिका यावरून भाषण केले. तथापि अन्यत्र मुंबईवरील अतिरेक्यांचा हल्ला, मुंबईत बॉम्बस्फोट असे विषय काढण्याचे शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी टाळलेले दिसले. या पाश्र्वभूमीवर बीकेसीमधील सभेत रामदास कदम यांनी थेट सभेतच मुसलमानांचा बंदोबस्त करण्याची धमकी दिल्यामुळे जे मुसलमान मतदार महायुतीला मतदान करतील तेही फिरेल अशी भीती सेनेच्या सूत्रांना वाटते. मुळात कोकणात अनंत गिते यांच्या प्रचारसभेला अनुपस्थित राहणाऱ्या कदम यांना बीकेसीत अचानक एवढे महत्त्व का देण्यात आले, असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे.  
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
जाहीर भाषणात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील जाहीर सभेतील भाषणात केलेल्या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने घेत कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. वांद्रे कुर्ला संकुल येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची जाहीर सभा नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. या सभेत भाषण करताना रामदास कदम यांनी मुस्लिम धर्मियांविरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. १९९३ ची दंगल आणि आझाद मैदान येथील दंगलीचा हवाला देत त्यांनी जातीय तेढ निर्माण करणारी भाषा वापरली होती. त्यांच्या या वक्तव्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आणि कदम यांच्याविरोधात निवडणूक आयोगानेच बीकेसी पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून कदम यांच्यावर बीकेसी पोलिसांनी कलम १५३ (दोन विभिन्न समजात जातीय तेढ, विषमता पसरविणे) कलम १५३ (ब) (राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचविणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी ए. एम. वाणी या प्रकरणाचा तपास करत आहेत.