राज्यात दोन टप्प्यांमध्ये आतापर्यंत २९ मतदारसंघांमध्ये सरासरी झालेले ६२ टक्के मतदान हे गेल्या तीन दशकांतील राज्यातील सर्वाधिक मतदान असून, गतवेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी १२ टक्क्यांनी वाढली आहे. वाढलेली मतदानाची टक्केवारी हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील उद्रेक किंवा नाराजी असल्याचा अर्थ विरोधकांनी काढला आहे. मात्र वाढीव मतदानाने सत्ताधाऱ्यांच्या गोटात चिंता वाढली आहे.
विदर्भ (१०), पश्चिम महाराष्ट्र (१२), मराठवाडा (सहा) आणि कोकणातील एक अशा २९ मतदारसंघांमध्ये आतापर्यंत मतदान झाले. उर्वरित १९ मतदारसंघांमध्ये पुढील गुरुवारी मतदान होईल. २९ मतदारसंघांमध्ये सरासरी ६२ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी राज्यात सरासरी ५० टक्के मतदान झाले होते. १९८४ पासूनच्या राज्यातील मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास २९ मतदारसंघांमध्ये आतापर्यंत झालेले हे सर्वाधिक मतदान आहे. १९९५ मध्ये सत्ताबदल होऊन युतीची सत्ता आली तेव्हा राज्यात विक्रमी ७२ टक्के मतदान झाले होते.
पहिल्या टप्प्यात विदर्भात ६२.८८ मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात ६२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. हाच कल मुंबई आणि अन्यत्र कायम राहील, अशी चिन्हे आहेत. गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी मतदानातून व्यक्त झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वाढलेल्या मतदानामुळे किती नुकसान होऊ शकते, असा अंदाज सत्ताधाऱ्यांच्या गोटातून व्यक्त करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या रुपाने मतदारांना योग्य पर्याय सापडला. यामुळेच राज्यातील मतदार मोटय़ा प्रमाणावर बाहेर आले. वाढीव मतदानाचा भाजप-शिवसेना युतीलाच फायदा होईल, असा विश्वास भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केला. वाढीव मतदानानंतरही काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे हे आशावादी आहेत. विदर्भाप्रमाणेच मराठवाडा आणि प. महाराष्ट्रात आघाडीलाच चांगले यश मिळेल, असा दावा ठाकरे यांनी केला.

पनवेलमध्ये मतदारयादीत घोळ
मृत व्यक्तीचे नाव मतदारयादीत तर जिवंत व्यक्तीचे नावच नाही असा घोळ पनवेलमधील मतदारयाद्यांत आढळून आला. कळंबोली, खांदा कॉलनी व कामोठे या ठिकाणी हा घोळ आढळून आला. मतदारांना नेहमीच्या मतदारयादीत आपले नाव नसल्याने अनेक ठिकाणी खेटे मारावे लागले. मात्र त्यानंतरही या मतदारांना आपली नावे सापडली नाहीत.
परभणी ६२%
कडक बंदोबस्तामुळे जिल्ह्य़ात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सायंकाळी सहापर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाले. शेवटच्या तासात मतदानाचा वेग वाढला. पालम तालुक्यातील सायळा येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला.
साताऱ्यातील मतदानासाठी ३९ वाहने रवाना
साताऱ्यात १७ एप्रिल रोजी घडय़ाळ्यावर शिक्का हाणायचा आणि बोटावरील शाई पुसून २४ एप्रिल रोजी नवी मुंबईत मतदान करण्यासाठी यायचे हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा दोनदा मतदान करण्याचा सल्ला माथाडी कामगार किती पाळतील याबाबत चित्र स्पष्ट झालेले नसले तरी गुरुवारी पहाटे कोपरखैरणे येथून सुमारे ३९ वाहने साताऱ्यातील मतदानासाठी साडेचार हजार मतदार गेल्याची माहिती उपलब्ध आहे
कोल्हापूर  ६९.८० %
कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदान करण्यासाठी लागलेल्या रांगा सायंकाळपर्यंत कायम राहिल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ६९.८० टक्के इतके मतदान झाल्याने मतांचा वाढलेला टक्का कोणासाठी निर्णायक ठरणार हे कुतूहल आहे.
बारामती  ५८.२० %
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीतही २००९ च्या तुलनेत वाढ होऊन ते ५८.२० टक्क्य़ांवर पोहोचले. तिथे कोणाला किती मते मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
बीड ६४ %
राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात ६४ टक्के मतदान झाले. गोपीनाथ मुंडे यांनी नाथ्रा येथे मतदानाचा हक्क बजावला, तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील जामगाव येथे मतदान केले.
पुणे – ५८.५०%
पुणे मतदारसंघासह बारामती, मावळ, शिरूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये उन्हाचा कडाका असतानाही नागरिकांनी उत्स्फूर्त मतदान केले. पुण्यात तर या वेळी २००९ च्या तुलनेत सुमारे दीडपट मतदान होऊन टक्केवारी ५८.५० टक्क्यांवर पोहोचली.  पुण्यात काँग्रेसचे व राहुल गांधी यांच्या ब्रिगेडचे विश्वजित कदम, भाजपचे अनिल शिरोळे आणि मनसेचे दीपक पायगुडे यांच्यात लढत होती. वाढलेले मतदान नेमके कोणाच्या बाजूने जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सोलापूर – ५७%  माढा – ६२%
सोलापूर मतदारसंघात ५७ तर माढय़ात ६२ टक्के मतदान झाले होते. सकाळपासूनच मतदान केंद्रावर लागलेल्या मतदारांच्या रांगा, त्यात तरुणाईबरोबर महिलांचा सहभाग हेच प्रतिबिंबित करीत होता. याच मतदान केंद्राबाहेर उपेक्षित पारधी समाजाचे रोजगारासाठी मुंबईत राहणारे स्त्री-पुरुष मतदारही उपस्थित होत़े  परंतु त्यांची नावे मतदारयादीत असली तरी त्यांच्यापैकी एकाकडेही मतदार किंवा अन्य ओळखपत्र नव्हते.
रत्नागिरी – ६०%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गुरुवारी सुमारे ६० टक्के मतदान झाले. दोन जिल्ह्य़ांत मिळून पसरलेल्या या मतदारसंघात १९०४ मतदान केंद्रांमध्ये दिवसभर शांततेने मतदान झाले. संगमेश्वर तालुक्यात कडवई येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून मारामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही बाजूच्या ११ जणांना अटक करण्यात आली़   मतदान सुरू झाल्यानंतर १४ मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला. सिंधुदुर्गातही सहा ठिकाणी मतदानयंत्रात बिघाड झाला.
सातारा – ५७%
सातारा लोकसभा मतदारसंघातील १८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले. कडाक्याचे ऊन असतानाही यंदाच्या निवडणुकीत कमालीचा उत्साह दिसून आला. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गेल्या निवडणुकीत मतदान ५२ टक्क्यांपर्यंत झाले होते. ते किमान २० टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदानात वाढ झालेली दिसली नाही. तरी दिवसअखेरीस ५७ टक्के मतदानाची नोंद झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पाटण कॉलनीत दुपारी मतदानाचा हक्क बजावला.
उस्मानाबाद – ६५%
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात गुरुवारी ६५ टक्के मतदान झाले आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड, अपक्ष उमेदवार रोहन देशमुख या प्रमुख उमेदवारांसह २७ उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले. एकूण १ हजार ९७१ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. तुळजापूर तालुक्यात अमरावतीवाडीच्या ग्रामस्थांनी तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टच्या शेतजमिनी नावावर कराव्यात, या मागणीसाठी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला.
मतदानाची टक्केवारी
१९८४ (६१.७५ टक्के)
१९८९ (५९.८६ टक्के)
१९९१ (४८.७५ टक्के)
१९९६ (५२ टक्के)
१९९८ (५७ टक्के)
१९९९ (६० टक्के)
२००४ (५४.३८ टक्के)
२००९ (५० टक्के)