भारत संचार निगम लिमिटेडमार्फत (बीएसएनएल) लवकरच जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख रस्ते ‘३-जी’ सेवेने जोडली जाणार आहेत. त्यासाठी विविध ठिकाणी २१ मोबाइल मनोरे उभारले जाणार आहेत. यामार्फत लवकरच २ एमबीपीएस तरंगलांबी (बँडविड्थ) मिळणार असल्याची माहिती बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक विजय तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या ही सुविधा केवळ नगर शहर व तालुक्यात उपलब्ध आहे.
बीएसएनएलने लँडलाइन व्यवस्थेकडे ग्राहकांना पुन्हा वळवण्यासाठी एक विशेष योजना सादर केली आहे. त्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. १५ जूनपासून संपूर्ण देशात इनकमिंग कॉलसाठी मोफत रोमिंग सेवा तसेच लँडलाइन ग्राहकांसाठी रात्री ९ ते सकाळी ७ दरम्यान देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित मोफत कॉल सुविधा सुरू करण्यात आली आहे.
काही प्रसारमाध्यमांनी या योजनेसाठी ट्राय संस्थेने बंधने आणल्याची चुकीची माहिती प्रसिद्ध केली असल्याकडे तांबे यांनी लक्ष वेधले. या योजनेसाठी ट्रायची कोणतीही आडकाठी नाही तसेच रोमिंगसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही त्यासाठी अनेक सीमकार्ड बाळगण्याची आवश्यकता नाही, ग्राहक एक राष्ट्र एक नंबर या तत्त्वावर या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
ब्रॉडबँडसाठी मोबाइलवर अनेक बंधने येतात. दरवाढीचाही फटका बसतो. ही बंधने व फटका लँडलाइनमुळे बसणार नाही. जुने ग्राहक, नजीकच्या काळात बंद पडलेले लँडलाइनचे ग्राहक, यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. बंद पडलेले लँडलाइनचे ग्राहक जोडण्यासाठी बीएसएनएलने उपकरण जोडणी शुल्कही माफ केले आहे.
जिल्ह्य़ात सध्या बीएसएनएलकडे मोबाइलचे २ लाख ३६ हजार ग्राहक आहेत. सन २००३ मध्ये लँडलाइनचे अडीच लाख ग्राहक होते. चांगली सेवा मिळत नाही म्हणून लँडलाइनचे ग्राहक ६५ हजारपर्यंत खाली आले. रात्री ९ ते सकाळी ७ दरम्यान अमर्याद मोफत कॉल योजनेमुळे त्यात वाढ होणे अपेक्षित आहे, असे तांबे यांनी सांगितले. या वेळी बीएसएनएलचे अधिकारी देवदत्त ठुबे, विजय नगरकर, आबासाहेब कदम आदी उपस्थित होते.