बलात्कार प्रकरणातील आरोपीने नगर तालुका पोलिस ठाण्यातील कोठडीत आत्महत्या केल्याप्रकरणी एक अधिकारी व चार कर्मचारी अशा एकूण पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सोमवारी निलंबित केले. पोलिस ठाण्याचे प्रभारी तथा सहायक निरीक्षक विनोद चव्हाण, सहायक उपनिरीक्षक श्याम हराळे, हवालदार रवींद्र चव्हाण, शिपाई कल्याण लगड व वैशाली कारखिले यांचा त्यात समावेश आहे. या सर्वावर कामात निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गेल्या महिन्यातच कोतवाली पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या नितीन साठे या दलित युवकाचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला होता. त्या वेळीही एका पोलिस निरीक्षक, एक उपनिरीक्षक अशा दोघा अधिका-यासह चार कर्मचारी अशा एकूण ६ जणांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे सध्या पोलिस दलात अस्वस्थता निर्माण झालेली आहे.
स्वत:च्या मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या रामेश्वर तानाजी मगर याने रविवारी सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा आरोप निलंबित करण्यात आलेल्या पाच जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. रामेश्वरच्या मृत्यूसंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर करीत आहेत. रामेश्वर याने पश्चात्तापातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज मालकर यांनी व्यक्त केला.
पोलिस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीतील आरोपीच्या मृत्यूची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्याच्या स्थायी सूचना आहेत. मगर याने कोठडीत गळफास घेतल्यासंदर्भात कोतवाली पोलिसांनी सीआयडीला माहिती दिली आहे, मात्र सीआयडीने अद्यापि चौकशी सुरू केली नसल्याचे समजले.