वणी तालुक्यातील चिखलगाव साईनगरात असलेल्या मोरेच्या शेताजवळ कोळशाचे काम करणाऱ्या मजुरांच्या  वस्तीला शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आग लागून पाच झोपडय़ा जळून खाक  झाल्या. त्यात त्यांच्या संसारोपयोगी साहित्यासह आíथक नुकसानही झाले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोळसा मजूर म्हणून काम करणाऱ्यांनी चिखलगाव येथील साईनगरालगतच  एका शेताजवळच बांबूचे टटवे व बल्या आणून वस्ती बनवून संसार थाटले होते. लालपुलिया परिसरात हे मजूर कोळशाचे काम करीत आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. गेल्या २२ ऑक्टोबरला ते दिवाळीसाठी आपल्या मुळगावी गेलेले असतांना त्यांच्या चिखलगाव येथील झोपडय़ा मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. भारत कपूर डेरिया यांच्या झोपडीला आग लागल्याचे गतम यादव यांना दिसले. त्यांनी त्यांच्या जवळच्या झोपडीवाल्यांना उठवून आग पाण्याने विझविण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात  येईपर्यंत पाच झोपडय़ा खाक झाल्या. भारत कपूर डोरिया यांच्या दोन झोपडय़ा, गुल्लु, परशु कनस भाई यांची प्रत्येकी एक झोपडी खाक झाली. हे सर्व मजूर गडचिरोली जिल्ह्य़ातील नानणी (ता. करखेडा) येथील रहिवासी आहेत. दरम्यान, एका झोपडीला बनविण्यासाठी सुमारे सात ते दहा हजार रुपये खर्च लागत असून याच झोपडय़ांसह त्यातील अन्नधान्य, कपडय़ांसह  रोजचेसंसारोपयोगी साहित्यही जळाल्याने सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

दरम्यान, घाटंजी तालुक्यातील पहुर ईजारा व दहेगाव येथे रात्रीच्या सुमारास सोयाबीन गंजीस काही अज्ञात इसमांनी आग लावली. या आगीत १ लाख ७३ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहूर ईजारा येथील सचिन देविदास बघमारेंचे  गावाशेजारी शेत आहे. दोन दिवसापूर्वी कापूण ठेवण्यात आलेल्या सोयाबीनला काही अज्ञातांनी दुपारच्या सुमारास आग लावली. यात १ लाख २० हजाराचे पीक खाक झाले. या संबंधीची तक्रार वडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.