आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांच्या नगर शहरातील सट्टा अड्डय़ावर पोलिसांच्या विशेष पथकाने काल रात्री छापा टाकून दोन जणांना रविवारी रात्री अटक केली. योगेश नामदेव सोनवणे (वय ३४) व संदीप शरद शिंदे (२८, रा. बिशप लॉईड कॉलनी, टीव्ही सेंटर जवळ, नगर) अशी या दोघांची नावे आहेत. मात्र या दोघांची न्यायालयाने आज, सोमवारी प्रत्येकी साडेसात हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. या दोघांसह एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सट्टा सुरू असलेला गाळा तोफखाना पोलीस ठाण्याच्या समोरच आहे. योगेश सोनवणे हा सट्टा चालवण्याबरोबरच जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवसायातही आहे. त्याने महापालिकेची निवडणूक लढवली होती. घरासमोरील गाळ्यातच तो हा सट्टा चालवत होता. पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना याची माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्या पथकाने छापा टाकला. पोलीस शिपाई योगेश घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएल स्पर्धेतील सहभागी संघाच्या हारजितीवर सट्टा खेळला जात होता. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्स व राजस्थान रॉयल चॅलेंजर्स या संघावर सट्टा घेतला जात होता. ग्राहकांनी प्रत्यक्ष न भेटता केवळ मोबालवर संपर्क साधून तो खेळला जात होता. सोनवणे सट्टा घेत होता. तो पाइपलाइन रस्त्यावरील नितीन सुराणा या बुकीकडे त्याची नोंद करत होता. सुराणासह भास्कर (पूर्ण नाव नाही) या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुराणा आता फरार झाला आहे.
सोनवणे याच्या गाळ्यातून एक मोठा एलसीडी टीव्ही, एक १५ हजार रुपयांचा मोबाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई जुगार अ‍ॅक्ट कलम ४,५, इंडियन टेलिग्राम अ‍ॅक्ट २५ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बेंद्रे करीत आहेत
सॉफ्टवेअर जप्त
योगेश सोनवणेकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलमध्ये सट्टय़ासाठी लागणारे अनेक सॉफ्टवेअर बसवण्यात आलेली होती. क्रिकबझ, बेटफेअर या सॉफ्टवेअरद्वारे सोनवणेला कोणत्या दोन संघात, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळी सामना खेळला जाणार आहे, याची माहिती उपलब्ध होत असे. नियमित सट्टा खेळणा-यांची किमान १२ ते १५ जणांची नावे मोबाइलमध्ये आहेत. आयपीएलचा हंगाम ९ एप्रिलला सुरू झाला, तेव्हापासून सोनवणे याने हा सट्टा तोफखाना पोलीस ठाण्यासमोरील गाळ्यात सुरू केला. सट्टा साखळी पद्धतीने खेळवला जात होता. त्याचे पाइपलाइन रस्त्यावरील नितीन सुराणा या बुकीशी संबंध होते. आयपीएलच्या सट्टय़ात पैसे गमावल्याने काहींनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे नगरमध्ये आहेत.