केंद्रात व राज्यात सामान्य जनतेला भूलथापा देऊन व अनेक आश्वासने देऊन आणि विकासाची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपने काही महिन्यातच आपला रंग दाखविला असून खरेतर भाजपचा कारभार पाहता राज्यात व केंद्रात सत्ता भाजपची नसून संघाचीच आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला.
सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन तथा कार्यकर्त्यांंचा मेळावा सोमवारी दुपारी पार पडला. त्यावेळी पवार बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष, आमदार दीपक साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यासपीठावर आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार हणमंत डोळस, धैर्यशील मोहिते-पाटील, प्रदेश युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार राजन पाटील, रश्मी बागल, महेश गादेकर, उपमहापौर प्रवीण डोंगरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड आदींची उपस्थिती होती.
अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. मोदी हे सत्तेत आल्यापासून सतत परदेश दौ-यावर असतात व भारतात क्वचितच राहतात. ‘मन की बात’ च्या माध्यमातून त्यांनी यापूर्वी श्रावण मासात रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा ‘मन की बात’द्वारे देशवासियांशी संवाद साधला. परंतु मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजान महिना चालू असताना त्यानिमित्ताने त्यांना मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देता आल्या नाहीत. यावरून मोदी सरकारची संकुचित वृत्ती लक्षात येते व देशावर संघाची सत्ता असल्याची धारणा पक्की होते, अशी टीका पवार यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस हे राज्यात दुष्काळजन्य संकट कोसळत असताना शेतक-यांना आधार देण्याऐवजी परदेशाला निघून जातात, ही बाब शोभत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनीही शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा आधार घेत राज्यात जिकडे तिकडे भ्रष्टाचारच भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. आम्ही सत्तेवर असताना भाजपवाल्यांनी आमच्यावर सिंचन घोटाळ्यासह अन्य आरोप वारंवार करून आमची प्रतिमा मलीन केली व जनतेची चक्क दिशाभूल करून सत्ता काबीज केली. आता तेच उघडे पडू लागले आहेत, अशी टीका तटकरे यांनी केली. यावेळी धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दिलीप सोपल आदींची भाषणे झाली. कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीने हुतात्मा स्मृतिमंदिर तुडुंब भरले होते.