पुरातत्त्व विभाग आणि शिवप्रेमी संघटना यांच्यातील वाद पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची शक्यता आहे. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात जिल्हा परिषदेने लावलेले सौरदिवे पुरातत्त्व खात्याने उखडून टाकले आहेत. त्यामुळे शिवपुतळा परिसर अंधारात राहत आहे. पुरातत्त्व विभागाच्या या मनमानी कारभाराविरोधात सर्व थरांतून संताप व्यक्त केला जातो आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्याला दरवर्षी हजारो शिवप्रेमी भेट देतात, मात्र पुरातत्त्व विभागाच्या उदासीनतेमुळे किल्ल्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. हा परिसर रात्रीदेखील प्रकाशमान असावा, अशी शिवप्रेमींची सातत्याने मागणी होती. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेने या ठिकाणी सौरदिवे लावले होते, परंतु पुरातत्त्व खात्याने हे दिवे काढून टाकले. हे दिवे काढून आता हत्तीखान्यात ठेवण्यात आले होते.
यापूर्वीही वीज बिल न भरल्यामुळे छत्रपतींचा समाधी परिसर अंधारात राहिल्याची बाब समोर आली होती. आता तर शिवपुतळ्यासमोरील दिवे काढून टाकण्यापर्यंत पुरातत्त्व खात्याची मजल गेली. केवळ याच बाबतीत नाही तर मुद्दांवर किल्ले रायगडावर पुरातत्त्व खात्याचा अडसर येत असतो. पुरातत्त्व विभाग स्वत: काही करत नाही आणि दुसऱ्याला काही करू देत नाही, अशी शिवप्रेमींची भावना आहे. त्यामुळे त्यांच्यात कमालीचा संताप आहे.
इथे येणारे पर्यटक आणि इतिहासप्रेमींना किल्ल्याची साधी माहिती उपलब्ध होत नाही. िहदवी स्वराज्याचे हे वैभव आणि भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी त्याचे संरक्षण आणि डागडुजी करण्याची नितांत गरज आहे, पण त्याकडे लक्ष द्यायला पुरातत्त्व विभागाला वेळ नाही. उलट किल्ल्यावरील विकासकामांना विरोध करण्याची भूमिकाच पुरातत्त्व विभाग घेत आले आहे.
एकीकडे अरबी समुद्रात करोडो रुपये खर्चून शिवरायांचे स्मारक उभारले जात आहे. दुसरीकडे किल्ले रायगडावरील शिवाजी महाराजांचा पुतळा अंधारात यासारखे महाराष्ट्राचे दुर्दैव नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरिवद म्हात्रे यांनी दिली. छत्रपतींच्या भूमीतच त्यांचा पुतळा अंधारात राहण्यास जबाबदार असणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, तसेच पुराततत्त्व विभागाने हटवलेले हे दिवे पुन्हा त्या जागी बसवावेत, अशी मागणी अरिवद म्हात्रे यांनी केली आहे.
दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या या आडमुठय़ा भूमिकेमुळे शिवप्रेमी आणि पुरातत्त्व विभाग असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.