औरंगाबादमधील महापौरपदावरून शिवसेना आणि भाजपमधील तिढा अखेर सुटला असून, शिवसेनेला चार वर्षे तर भाजपला एक वर्ष महापौरपद देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांना याबद्दल माहिती दिली.
औरंगाबादमध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे २८ आणि भाजपचे २२ उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले होते. त्याचवेळी काही विजयी बंडखोर उमेदवारांनीही युतीलाचा आपला पाठिंबा दिल्यामुळे महापालिकेत युतीची सत्ता येणार हे निश्चित होते. मात्र, महापौरपदावरून दोन्ही पक्षांमध्ये तिढा निर्माण झाला होता. यासंदर्भात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी झालेली पहिली बैठक निष्फळ ठरली होती. दोन्ही पक्ष महापौरपदावरून अडून बसल्यामुळे तिढा निर्माण झाला होता. अखेर भाजपने शिवसेनेला चार वर्षे महापौरपद देण्याची तयारी दर्शविली. त्याबदल्यात भाजपला तीन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात येणार असून, दोन वर्षे हे अध्यक्षपद शिवसेनेकडून राहणार आहे. भाजपला दोन वेळा उपमहापौरपदही देण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.