आघाडी संपुष्टात आल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भर पडली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट आणून अप्रत्यक्षपणे भाजपचेच सरकार आणण्याच्या कामी मदत करत भाजपने राष्ट्रवादीशी छुपी युतीच केली असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे केला.
आघाडी तोडण्यासाठी राष्ट्रवादीचेच नेतृत्व कारणीभूत ठरल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आघाडीबाबत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने आघाडी तुटेल कशी यावरच अधिक भर दिल्याचे ते म्हणाले. आघाडी तोडण्याची शरद पवारांची इच्छा नसावी, पण ती बहुधा पुतण्याचीच इच्छा असावी. त्यांना काहीही करून मुख्यमंत्री व्हायचे आहे असा चिमटाही चव्हाणांनी काढला. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नगरविकास खात्याच्या फाइल पटापट ‘क्लिअर’ कशा झाल्या? त्याची चौकशी व्हायला हवी, या अजित पवारांच्या निशाण्याला उत्तर देताना चव्हाण यांनीही, याची चौकशी झालीच पाहिजे असे सांगत, त्यांचा हा आरोप हास्यास्पद असल्याचे नमूद केले.
सिंचन श्वेतपत्रिका हवी होती
सिंचनक्षेत्राच्या कारभारावरची श्वेतपत्रिका यावी, जनतेला माहिती मिळावी ही माझी भूमिका होती. पण, काही जणांना हे आवडले नाही असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी सांगितले. सिंचनक्षेत्राच्या कारभारावरची श्वेतपत्रिकेची मागणी योग्यच होती. गोसीखुर्दला ७ हजार कोटी खर्च होताना, १ इंच पाणीही अडवू शकलो नाही याबाबत चौकशी व्हायलाच हवी होती, पण ही गोष्ट काही जणांना आवडली नाही.

“सरकारला कुठलाही अधिकार उरलेला नसतानाच्या काळात राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून भाजपचे सरकार आणण्याच्या कामी राष्ट्रवादीने भाजपला मदत केली आहे. तत्कालीन मित्रपक्ष राष्ट्रवादीने हे जाणीवपूर्वकच केले.”
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री