तिकिटाविना प्रवास करणारे पाच प्रवासी एस.टी.मधून २५ ऑक्टोबरला पकडण्यात आले. यामुळे मानसिक तणावात रात्र काढणाऱ्या वाहकाने सोमवारी पहाटे सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सालेकसा तालुक्यातील बिजेपार ग्राम पंचायत कार्यालयाजवळ घडली. धनलाल मोहनलाल नागपुरे (५५, तुमखेडा खुर्द) असे आत्महत्या करणाऱ्या एस.टी. वाहकाचे नाव आहे.

एस.टी. बस (एमएच२०-डी ८७०२)ची नियमित तपासणी आमगाव-देवरी मार्गावरील हरदोली येथे शनिवारी करण्यात आली. या तपासणीत या बसमध्ये पाच प्रवासी विनातिकीट आढळले होते. विभागीय कार्यालयातील सहायक वाहतूक निरीक्षक जीभकाटे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी ही तपासणी केली होती. या तपासणीत आपण दोषी आढळणार, याची खंत धनलाल यांना रात्रभर राहिली. तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईलही जप्त केला होता. त्यामुळे तो अधिकच तणावात होता.

एस.टी.मध्ये चालक व वाहकाला मोबाईल नेणे बंदीचे असल्यामुळे धनलाल अधिकच धास्तावले होते. त्यांनी सायंकाळची फेरी डोमाटोलापर्यंत नेऊन परत येताना बिजेपार येथे विश्रांती घेतली. रात्री जेवण केल्यावर चालक मुस्ताक व धनलाल दोघेही झालेल्या कारवाईबाबत विचार करीत होते. रात्री उशिरा दोघेही बसमध्ये झोपले.

त्यानंतर पहाटे ४ वाजता दरम्यान उठल्यावर धनलालने चालक मुस्ताक यास शौचालयास जातो, असे सांगितले. लुंगी व बनियानवरच शौचालयासाठी गेल्यावर सकाळी ७.३० वाजेपर्यंत ते बसजवळ न आल्याने वाहक मुस्ताक यांना काळजी वाटली. त्यानंतर मुस्ताकने ते न आल्याची माहिती बिजेपार येथील एओपीचे प्रमुख उमेश महाले यांना दिली. त्यानुसार धनलाल यांचा शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेह ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीत ३५ फूट खोल पाण्यात आढळला.

कोटरा येथील कृषीसेवक राजू मेश्राम यांनी धनलालचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. शनिवारी बस आगाराच्या विभागीय कार्यालयाने केलेल्या कारवाईमुळे ते रात्रभर चिंताग्रस्त असल्याचे चालक मुस्ताक यांनी सांगितले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सालेकसाच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. एस.टी.ची तपासणी करण्यात आली. ती नियमित तपासणी होती. हरदोली येथे शनिवारी केलेल्या तपासणीत पाच प्रवासी विना तिकीट आढळले असल्याचे के.वाय. आदमने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

गोंदियाच्या एस.टी. आगारात कार्यरत असलेल्या धनलालने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या बसमधील प्रवासी विनातिकीट आढळले की, ते अधिकाऱ्यांना कारवाई करू नका अन्यथा, आत्महत्या करू, अशी धमकी देत असल्याचे कळले. यापूर्वीही धनलालने यापूर्वी एक वेळा विद्युत खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याशिवाय, तीन वेळा अधिकाऱ्यांना आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.