शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढताना ज्या शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना हा पुरस्कार समर्पित करतो, अशी भावना व्यक्त करून करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटित होऊन त्यांच्या उत्पादनांना भाव मिळण्याच्यादृष्टीने प्रयत्न करा, असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले.

कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने माणिकलाल गांधी यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा २०१४ चा विदर्भ गौरव पुरस्कार शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित, ज्येष्ठ काँग्रेस नेते नानाभाऊ एंबडवार, माजी मंत्री रमेश बंग, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, श्रीराम काळे, बंडोपंत उमरकर उपस्थित होते.
शहरातील जमीनदार सुखी असतो. मात्र, खेडय़ातील जमीनदार श्रीमंत असला तरी तो आर्थिक अडचणीत असल्याचे बघायला मिळाले. शेतीच्या संदर्भात व्यवस्थेमध्ये दोष आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ राज्याचा नसतो तो देशाच्या अर्थव्यवस्थेशी जुळला आहे. त्यामुळे इतर देशात शेतीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास केला. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी जुळल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. मात्र, त्यांच्या विचारांशी फार काळ जुळवून घेता आले नाही, त्यामुळे त्यांच्यापासून वेगळा झालो असलो तरी शेतकरी संघटनेचा बिल्ला मात्र काढला नाही. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हा त्यांचा पुरस्कार आहे. शरद जोशी यांच्यासोबत काम करीत असताना त्यांची धोरणे पटली नाही. शेतकऱ्यांना थेट सबसिडी देण्याची गरज असताना प्रशासनाने मात्र त्याची दखल घेतली नाही. आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढलो, त्यांना न्याय मिळवून दिला मात्र, नाव जोशीचे घेतले जात होते. शेतकऱ्यांच्या उत्पादन मालाला भाव देता येत नसेल तर त्यांना सबसिडी दिली पाहिजे जेणे करून शेतकरी स्वतहून शेतीचा विकास करेल. मराठवाडा आणि विदर्भात पडलेला दुष्काळ हा १९७२ पेक्षा मोठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वानी संघटित होण्याची गरज असल्याचे जावंधिया म्हणाले.
दत्ता मेघे म्हणाले, आंदोलन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यासाठी सर्वानी संघटित होण्याची गरज आहे. जावंधिया गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी काम करीत असून त्यांच्या कार्यापासून इतरांनी प्रेरणा घेतली पाहिजे. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले.