विधानसभा निवडणुकीच्या छाननीप्रक्रियेत आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोपसुंदीचे दर्शन बुधवारी घडले.
उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अस्तित्वपणाला लागलेल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दूर्वास कदम यांचा अर्ज वैध ठरला असतानाही त्यांनी नाटय़मयरीत्या माघार घेतल्याने दक्षिणेतील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष निवेदिता माने यांचे सुपुत्र सत्त्वशील माने यांनी इचलकरंजीतील अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतानाच जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील ही राष्ट्रवादीला लागलेली कीड असल्याचा आरोप करून त्यांनी माने घराण्याला राजकारणातून संपवण्याचा कट रचला असल्याने त्यांच्या विरोधात उघडपणे शिवसेना उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. धर्यशील माने यांनीही शिरोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष रूपाने भरलेला अर्ज मागे घेतला असून तेही आता कनिष्ठ बंधूप्रमाणे बंडाचा झेंडा हाती घेतात का याकडे वेधले आहे.
दूर्वास कदम यांचा उमेदवारी अर्ज छाननीप्रक्रियेत अडकला होता. नॅश्नॅलिस्ट काँग्रेस पार्टीऐवजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा उल्लेख केल्याने अर्ज वैधता प्रक्रिया रेंगाळली होती. अखेर याबाबत निवडणूक आयुक्तांकडे पक्षाच्या वतीने दाद मागण्यात आल्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. त्यांनी खासदार धनंजय महाडिक तसेच पक्षाच्या नेत्यांना दोष दिला होता. तथापि, बुधवारी त्यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांनी बदललेली भूमिका पक्षालाही बुचकळय़ात टाकणारी ठरली. पक्षाचे सरचिटणीस अनिल साळोखे यांनी कदम यांची भूमिका चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यांचा अर्ज वैध ठरण्यासाठी सर्व पातळय़ांवर प्रयत्न केलेले असतानाही कदम यांनी माघार का घेतली हे आकलनापलीकडे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रक्रियेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत.
जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात असलेल्या शिरोळ व इचलकरंजी या मतदारसंघांतील उमेदवारीवरूनही राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आणखी तापला आहे. माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धर्यशील माने यांना शिरोळमधून उमेदवारी देण्याचा शब्द पक्षनेतृत्वाने दिला होता. त्यानुसार एबी फॉर्मही त्यांना दिला होता. पण अर्जछाननीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांना प्रथम एबी फॉर्म दिला असल्याने माने यांची अधिकृत उमेदवारी नाकारली गेली. त्यामुळे धर्यशील माने यांची भूमिका काय राहणार याकडे लक्ष वेधले असताना त्यांनी अचानक अपक्ष उमेदवारीही मागे घेतली आहे. तर त्यांचे कनिष्ठ बंधू सत्त्वशील माने यांनीही इचलकरंजीतील अपक्ष उमेदवारी मागे घेताना जिल्ह्यातील नेतृत्वावर खालच्या पातळीवर जाऊन टिकास्त्र सोडले आहे. मुश्रीफ व के. पी. पाटील यांचा एकेरी उल्लेख करीत सत्त्वशील माने यांनी भस्मासुररूपी मुश्रीफ व पाटील यांचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी वल्गना त्यांनी केली आहे.