गड, किल्ले, लेणी यांसह संस्कृतीचा वारसा शाळांमध्ये अध्यपन अध्यापनाचा भाग व्हावा, म्हणून राज्यातील १०४ शाळांमधील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. सात वर्षांपूर्वी अशा प्रकारचा प्रशिक्षण वर्ग झाला होता. त्यानंतर पुन्हा सांस्कृतिक अंगाने शिकवावे कसे, असा धडा गुरुजींना दिला जात आहे. केंद्रातील सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्यावतीने जिल्हा नियोजन प्रशिक्षण केंद्रात या अनुषंगाने प्रशिक्षण दिले जात आहे. संस्कृतीची ही ओळख नव्याभाजप सरकारमुळे रुजविली जात आहे काय, या प्रश्नाचे उत्तर देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.
गेल्या ७ वर्षांपासून प्रशिक्षण कोठे घ्यायचे, हा पेच होता. नव्यानेच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने शिक्षणात मूलभूत बदल व्हावेत आणि वारसा शिक्षण अभ्यासक्रमाचा भाग व्हावा, असे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्याचा भाजप सरकारशी संबंध नाही, असे सांगितले जाते. मूलत: शिक्षण पद्धतीत होणारे बदल समजून घ्यावे, असा आग्रह अधिकारी धरीत आहेत. कुतुबमीनारसारखी वास्तू वेगवेगळ्या अंगाने अभ्यासक्रमात येऊ शकते. भूगोलाचा शिक्षक कुतुबमीनार नक्की कोठे आहे, हे नकाशाद्वारे दाखवू शकतो. इतिहासाचा शिक्षक हा मीनार विजयोत्सव म्हणून कसा बांधला गेला, हे सांगू शकतो. त्या काळच्या शासन व्यवस्थेची माहितीही त्याला देता येऊ शकते. या बरोबरच मीनारचे वैज्ञानिक महत्त्वही सांगता येईल.
ज्या वेगवेगळ्या पदार्थापासून कुतुबमीनारचे बांधकाम झाले, ते कसे होते आणि त्याचे तंत्र कोणते हे विज्ञानाच्या शिक्षकाला सांगता येईल. त्याच वास्तुतील अभियांत्रिकीही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची पद्धत शिक्षकांच्या अध्ययन-अध्यापनात यावी, म्हणून अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केल्याची माहिती या प्रशिक्षणाचे आयोजक केतनसिंग यांनी सांगितले. वारसा शिक्षणाचा हा नवा प्रयोग यापूर्वी करण्यात आला. मात्र, त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नव्हते. आता राज्यातील १०४ शाळांमध्ये सांस्कृतिकदृष्टय़ा अभ्यासक्रमाकडे कसे पाहावे, हे शिकविले जात आहे.
शैक्षणिक नियोजनाचे तीन-तेरा!
ज्या महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेत संस्कृतीचे धडे दिले जात आहेत, त्या संस्थेची अवस्था मोठी गमतीची आहे. सहसंचालक दर्जाचा अधिकारी, समन्वयक व प्रशासकीय अधिकारी एवढय़ावर कारभार चालतो. राज्य सरकार या संस्थेला एक रुपयाचेही अनुदान देत नाही. वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध विभागांकडून मिळणारी रक्कम, हीच कमाई. त्यामुळे प्रशिक्षणार्थीची सोय करणे दिवसेंदिवस जिकिरीचे ठरू लागले आहे. रिक्त पदे न भरल्याने शैक्षणिक नियोजन करणारी ही संस्था कशीबशी सुरू आहे. तेथे संस्कृतीचे धडे गिरविले जात आहेत.