जिल्हय़ात एका पाठोपाठ एक घडत असलेल्या दलित अत्याचारांच्या घटनांबाबत राज्य अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी चिंता व्यक्त केली. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील जाधव हत्याकांडाचा सखोल तपास करण्याचा आदेशही त्यांनी दिला.
थूल यांनी जवखेडे खालसा गावास भेट देऊन जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्येची सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर नगर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. माजी मंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी अनिल कवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, समाजकल्याण अधिकारी माधव वाघ या वेळी उपस्थित होते.
दलित अत्याचाराच्या सततच्या घटना लक्षात घेता नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून का घोषित करू नये, अशा संतप्त सवाल करून थूल म्हणाले, अशा घटना थांबवण्यासाठी समाजानेच आता पुढे आले पाहिजे. विशेषत: स्वयंसेवी संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने गावपातळीवर कार्यशाळा घेतल्या पाहिजेत, अशी सूचना थूल यांनी केली. जवखेडे खालसा येथील घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 नगर जिल्हय़ातच प्रकार
दलित अत्याचाराच्या अशा घटना नगर जिल्हय़ातच का घडतात, याचीच चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. त्यासाठीच उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, असे ते म्हणाले.