कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाची संततधार दुस-या दिवशी कायम राहिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. राधानगरी धरण ७५ टक्के भरले असून तेथील तालुका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. बंधारे पाण्याखाली जाण्याची संख्या दिवसात तब्बल ४१ ने वाढली असून आता ही संख्या ६९ पर्यंत गेली आहे. राजाराम बंधा-यातील पाण्याच्या पातळीत सुमारे पावणेदोन फूट वाढ झाली आहे.
मंगळवारपासून जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस पडत आहे. आजही सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे राधानगरी धरण ७५ टक्के भरले आहे. जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडून राधानगरी तालुका प्रशासनास दक्षता घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार तालुका प्रशासनाने नदीकाठच्या ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे बंधारे पाण्याखाली जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मंगळवारी २८ बंधारे पाण्याखाली गेले होते. बुधवारी सकाळी ही संख्या ६० पर्यंत पोहोचली होती, तर सायंकाळी सहा वाजता यामध्ये आणखी नऊने वाढ झाली असून ६९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
येथील पंचगंगा नदीच्या पाणी पात्रातही झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. बुधवारी सायंकाळी राजाराम बंधा-यावर ३४.११ इंच इतके पाणी होते. २४ तासात पावणे दोन फूट पाणी वाढले आहे. नदीपात्र विस्तारत चालले असून पाणी जामदार क्लबच्या दिशेने वाहात असल्याचे दिसत आहे.
 जिल्ह्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच खराब रस्ता, धरणाचे, बंधा-याचे पाणी रस्त्यावर आल्याने राज्य परिवहन मंडळाकडून जिल्ह्यातील एसटीचे एकूण १० मार्ग पूर्णत बंद करण्यात आले आहेत. तर ९ मार्ग अंशत बंद केले असून ७ पर्यायी मार्ग चालू ठेवण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसाच्या विश्रांतीनतर वरुणराजा पुन्हा बरसला. यामुळे काही मार्गावर पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रंकाळा स्थानकाकडून मानबेटकडे (गगनबावडा) जाणा-या  एसटी बसेस अंशत बंद करण्यात आल्या आहेत. गवसे धरणावरील पाण्याने गारगोटी-आजरा मार्ग बंद आहे, तर आजरा-देवकांडगाव तसेच पाटगाव बंधा-यावर पाणी आल्याने गारगोटीकडे जाणा-या बसेस बंद झाल्या आहेत. गवसे बंधा-यावरील पाण्यामुळे आजरा-चंदगड, बुजवडे हा मार्ग बंद आहे. इब्राहीमपूर पुलावर पाणी आल्याने चंदगड-इब्राहीमपूर बसची वाहतूक बंद पडली, तर शिरगाव धरणावर पाणी आल्याने राधानगरीकडून शिरगाव माग्रे भोगावतीकडे जाणा-या बसेस पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत.