थोडीशी उसंत घेऊन धो-धो कोसळणा-या सततच्या पावसाने कृष्णा, कोयना नद्यांकाठी दैना उडवून दिली आहे. सलग तिस-या दिवशी जनजीवन विस्कळीतच राहताना, ठिकठिकाणची वाहतूकही संथगतीने सुरू आहे. हा पाऊस दुष्काळी माण, खटाव, खंडाळा व फलटण तालुक्यातही कमी, अधिक प्रमाणात कोसळत असल्याने दुष्काळी जनतेलाही काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, पाटणनजीकच्या संगमनगर धक्का पुलासह कमी उंचीचे सर्वच पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. संततधार पावसामुळे लघु पाटबंधारे भरून वाहिले असून, मध्यमप्रकल्पही शिगोशिग भरण्याच्या मार्गावर आहेत. सध्या कोयना धरणात ५३ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर, धरणक्षेत्रातील पाथरपुंज विभागात सर्वाधिक २,९७० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या ३६ तासात कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात २४२ एकूण २,०७१ मि. मी, नवजा विभागात ३५० एकूण २,३२९ मि. मी, तर महाबळेश्वर विभागात २८९ एकूण १८७८ मि. मी. पावसाची नोंद आहे. हा सरासरी पाऊस २०९२.६६ मि. मी. असून, गतवर्षी आजअखेर ३,५४६.५ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. आजअखेरच्या सरासरीत कराड तालुक्यात २१९.२ तर, पाटण तालुक्यात ७०५.५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी हाच पाऊस अनुक्रमे ३०५.०८ आणि  १,०९४.०७ मि. मी नोंदला गेला आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या महाकाय कोयना धरण पाणलोट क्षेत्रात या पावसाचा जोर आणखी वाढल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात गतीने वाढ होत आहे. आज सायंकाळी ६ वाजता कोयना जलाशयाची पाणीपातळी २,०९६ फूट राहताना, पाणीसाठा ४१ टीएमसी म्हणजेच ३९ टक्के आहे. गेल्या १३ दिवसात कोयना प्रकल्पाची पाणीपातळी ६१ फुटाने तर, पाणीसाठा २९ टीएमसीने वाढला आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा ८८ टीएमसी म्हणजेच ८३.६० टक्के नोंदला जाताना, धरणाचे दरवाजे १० फुटांवर उचलून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात येत होते.  
मान्सूनचे पहिले सत्र निराशाजनक गेल्याने पाणी साठवण प्रकल्प तळ गाठून होते. मात्र, गेल्या १३  दिवसात कोसळलेल्या दमदार पावसाने धरणे झपाटय़ाने भरू लागली आहेत. हा पाऊस मान्सूनच्या पहिल्या सत्राची तूट भरून काढत असल्याने यंदाचा पाऊस सरासरीच्या तुलनेत समाधानकारक राहील असेच सध्याचे चित्र आहे. सततच्या धो-धो पावसाने खरीप हंगामाला दिलासा मिळाला असून, कृष्णा, कोयना नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत. कराडनजीकचा खोडशी वळवणीचा बंधारा पाण्याखालीच आहे.