पुणे वेधशाळेने दिलेल्या इशा-यानुसार कोकण, मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रागयड, रत्नागिरीत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून तेथील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. येथील नद्यांनाही पूर आल्याचे सांगण्यात आले आहे. संगमेश्वर येथील सोनवी नदीची पाण्याची पातळीही सातत्याने वाढत आहे. येथील पावसाचा जोर इतका आहे की, भातशेतीही धोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  दापोली येथे १६८ मिमी इतकी सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून त्यापाठोपाठ गुहागर १३३ मिमी तर रत्नागिरीत १२४ मिमी, लांजा १२६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. शनिवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत राज्याच्या सर्वच भागात चांगल्या पावसाची नोंद झाली. आतापर्यंत पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाडय़ात सर्वदूर २० ते ८० मिलिमीटर इतका मोठा पाऊस पडला. त्यात उदगीर, चाकूर, उमरगा, तुळजापूर, निलंगा, लोहा, रेणापूर, अंबेजोगाई, लातूर, अदमहपूर, बीड, नांदेड, धारूर अशा सर्वच भागांचा समावेश होता.
मुंबईतही वसई, विरार भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या काही तासांत मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.