दिवाळीच्या निमित्ताने सुरू झालेल्या खरेदी उत्सवामुळे शहरातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. शहरातील रस्ते, गल्लीबोळ प्रकाशाच्या उत्सवाने उजळून निघाले होते. गुरुवारी लक्ष्मीपूजनानिमित्त व्यापा-यांच्या दालनातून वहय़ा-चोपडय़ांचे पूजन करण्यात आले. सायंकाळनंतर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत झळाळले होते. नगरकरांनी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्याचा आनंद लुटला.
सरकारी, निमसरकारी कार्यालयांना तसेच बहुतांशी खासगी आस्थापनांनाही सलग चार-पाच दिवस दिवाळीच्या सुटय़ा जोडून मिळाल्याने यंदाच्या दिवाळीत आनंदाची भरच पडली आहे. सकाळी अभ्यंगस्नान, नंतर फराळाचा आस्वाद अशा दिवसाच्या सुरुवातीने तो द्विगुणीत झाला होता. अनेक ठिकाणी दिवाळी पहाट, सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.
कामगार, कर्मचा-यांच्या हाती बोनसचा पैसा खुळखुळल्याने बाजारपेठांनाही बहर आला आहे. दिवाळीनंतर लगेचच विवाह समारंभांना सुरुवात होणार आहे. त्याच्या खरेदीसाठीही झुंबड उडाल्याने रस्त्यातून गर्दीचे लोट वाहात होते. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर, विशेषत: चितळे रस्ता, नवी पेठ, कापड बाजार, सराफ बाजार, सर्जेपुरा, माळीवाडा, बाजार समिती आदी भागांत गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडीचा अनुभव येतो आहे. ग्रामीण भागातून खरेदीसाठी आलेले नागरिक मोठी वाहने शहरातील गल्लीबोळात घुसवत असल्याने वाहतूक ठप्प होत होती. वाहतूक शाखेचे उपलब्ध पोलीस बळही अपुरे पडत होते.
फटाके, पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य विक्रेत्यांनी रस्त्यावर पथारी मांडली होती. रस्त्यावरील ही दुकानेच गरिबांसाठी हेच मॉल ठरली होती. अनेक व्यापारी दालनांतून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतींच्या योजनांचा पाऊस पाडला होता. यंदा दिवाळीच्या तयार फराळाच्या बाजारानेही चांगली उलाढाल केल्याचे दिसले. अनेक ठिकाणी आगाऊ नोंदणी झालेली होती. नंतर हा पुरवठा कमी पडल्याचे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सांगितले.