मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्य़ाला झोडपले आहे. अतिवृष्टीमुळे जिह्य़ातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. अंबा, काळ, सावित्री, गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड आणि नागोठणे शहरांना पुराचा तडाखा बसला आहे.
  संततधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि मंगळवारी रात्री नागोठणे शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली. एसटी स्टँड परिसर, मच्छीमार्केट परिसर, बाजारपेठ परिसर पाण्याखाली गेला. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाल्याने घबराट पसरली होती. व्यापारी लोकांनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षित हलवले. त्यामुळे मोठी वित्तहानी टळली.
भाजी मार्केट परिसरात अडकून पडलेल्या चार जणांची सुटका करण्यात आली. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांत पूर परिस्थिती होती. त्यानंतर शहरातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली.
  दरम्यान महाबळेश्वर आणि पोलादपूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे काळ, सावित्री आणि गांधारी नद्यांनी बुधवारी दुपारी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे दुपारी तीननंतर महाड शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. महाड शहरातील दस्तुरी नाका, गांधारी पुल, मच्छीमार्केट परिसर, सुकट गल्ली, नाते रोड, सावित्री पुल, बाजारपेठ परिसरात पूरस्थिती होती. महाबळेश्वर परिसरात सहा तासांत १२६ मिलीमिटर पावसाची नोंद झाल्याने पूरस्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अलिबाग- १२५ मिमी
पेण- १५६ मिमी
कर्जत- १७६ मिमी
माथेरान- २३० मिमी
सुधागड पाली १५५ मिमी
पनवेल १०२ मिमी