काँग्रेस पक्ष हा पुरुषांची मक्तेदारी असून महिलांना ५० टक्के आरक्षण असतानाही निर्णय प्रक्रियेत महिलांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महिला काँग्रेस ही संघटना मोडीत काढावी, इतक्या तीव्र शब्दात काँग्रेसमधील सक्रिय महिला नेत्यांनी प्रदेश काँग्रेस समितीच्या निरीक्षक वनमाला राठोड यांच्यासमक्ष व्यथा मांडल्या. काँग्रेसची ही दुरवस्था बघून पक्ष निरीक्षक राठोड याही क्षणभर चक्रावून गेल्या.

जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष संगीता अमृतकर यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष कमल व्यवहारे यांनी प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष वनमाला राठोड व भंडारा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे यांना आज येथे निरीक्षक म्हणून पाठवले होते.
पक्ष निरीक्षक विश्रामगृहावर दाखल होताच पत्रकारांसमक्ष महिला नेत्यांनी काँग्रेसमध्ये महिलांना स्थान नसल्याची भावना बोलून दाखवली. दोन्ही महिला निरीक्षकांचे आगमन होताच डॉ. रजनी हजारे, सुनीता लोढीया, डॉ.आसावरी देवतळे, नंदा अल्लूरवार, सुनीता अग्रवाल, रजनी मुलचंदानी, रंजना पडवेकर यांनी निरीक्षकांची भेट घेऊन पक्षाच्या वाईट स्थितीची जाणीव करून दिली.
जिल्हा महिला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. रजनी हजारे यांनी पक्षाची स्थिती नाजूक आहे. अशा स्थितीत विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज असताना एखादा निर्णय घेताना महिलांना विश्वासात घेतले जात नाही या शब्दात नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्या हाती असताना स्थानिक पातळीवरही पक्ष पुरुषांची मक्तेदारी झाल्याची व्यथा मांडली.
आज महिलांना ५० टक्के आरक्षण असताना या पक्षात महिलांच्या विचारांना व मतांना महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांनी महिला काँग्रेस संघटना विसर्जित करावी इतक्या तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सलग पाच वष्रे यशस्वीपणे सांभाळल्यानंतर देखील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना स्थान दिले जात नाही. ज्या महिलांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही त्यांना दिली जाते व जे सातत्याने उमेदवारी मागतात त्यांना दिली जात नाही असेही त्या म्हणाल्या.
प्रदेश काँग्रेस अध्यक्षा सुनीता लोढीया यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान करणाऱ्या माजी महापौर संगीता अमृतकर यांची नियुक्ती झालीच कशी? हा प्रश्न उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्षांवर पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप करणारी व पक्षातून निलंबित झालेली महिला अध्यक्ष झाली याबद्दल निरीक्षकांकडे खेद व्यक्त केला.
वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या पराभूत उमेदवार डॉ.आसावरी देवतळे यांनी पक्षात महिलांना पूर्वीसारखा मान व स्थान मिळत नसल्याची भावना व्यक्त केली. एखाद्या पदावर साधी नियुक्ती करायची असेल तर जिल्हा काँग्रेस स्थानिकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करून त्यांनी थेट जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यावर टीका केली. जिल्हा काँग्रेसचे काम सध्या एकला चलो रे अशा पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे आम्ही महिला काँग्रेससाठी केवळ निवडणुकीच्या तोंडावर मते मागण्यासाठी कामी पडणारे बाहुल्या ठरलो आहोत, असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. आसावरी देवतळे यांनी प्रकाश देवतळे यांचाही समाचार घेतला. पक्ष निरीक्षकांसमोरच काँग्रेसच्या या सर्व महिला नेत्यांनी प्रकाश देवतळे यांच्या कामाच्या पद्धतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना पक्ष निरीक्षक वनमाला राठोड या सर्व महिलांची समजूत काढीत होत्या. माजी महापौर संगीता अमृतकर यांनीही पक्ष निरीक्षकांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडली. सर्व महिलांची बाजू ऐकून घेतली असून येत्या दोन दिवसात प्रदेश महिला काँग्रेस समितीकडे अहवाल सादर करणार असल्याचे पक्ष निरीक्षक राठोड यांनी पत्रकारांना सांगितले.

महिला काँग्रेस अध्यक्षपदासाठी चौघी इच्छुक
चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदासाठी चार महिलांची नावे आपल्याकडे आली असल्याची माहिती निरीक्षक वनमाला राठोड यांनी दिली. या महिलांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला असला तरी या चार आघाडीवरील नावांमध्ये माजी खासदार नरेश पुगलिया गटाकडून सुनीता अग्रवाल व रंजना पडवेकर ही दोन नावे आहेत. तर अन्य दोन नावांमध्ये डॉ. आसावरी देवतळे व सुनीता लोढीया यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती आहे.