बदलांच्या लाटेतही सोलापूर जिल्ह्य़ातील पक्षांचे बलाबल बहुतेक पूर्वीसारखेच राहिले आहे. काँग्रेसला ३, राष्ट्रवादीला ४, भाजपला २ तर शिवसेना आणि शेकापला १ जागा मिळाली आहे. सांगोला मतदारसंघात गणपतराव देशमुख यांनी अकराव्यांदा विजय मिळवल्याने हा एक नवा विक्रम झाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या, विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांच्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत विजयश्री कायम राखली. त्यांनी एमआयएमचे तौफिक शेख यांचा ९६६७ मतांच्या फरकाने पराभव केला. शिवसेनेचे महेश कोठे, भाजपच्या प्रा. मोहिनी पत्की व माकपचे नरसय्या आडम मास्तर यांना पिछाडीवर जावे लागले.
प्रणिती शिंदे यांना ४६ हजार ६८७ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे तौफिक शेख यांना ३७ हजार २२ मते पडली. शिवसेनेचे महेश कोठे यांना ३३ हजार २४५ मते मिळाल्याने तिस-या क्रमांकावर जावे लागले. भाजपच्या प्रा. मोहिनी पत्की (२३ हजार २४३) आणि माकपचे नरसय्या आडम मास्तर (१३ हजार ८७६) यांना पराभूत व्हावे लागले. सुशीलकुमार शिंदे यांचे घनिष्ठ सहकारी विष्णुपंत कोठे यांचे पुत्र महेश कोठे यांनी शिंदे यांची साथ सोडून थेट त्यांना आव्हान देत निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उतरले होते. यातच कोठे यांचे ‘बाहुबली’ राजकीय शिष्य तौफिक शेख यांनीही कोठे यांच्या राजकीय खेळीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसमधून बाहेर पडत एमआयएमच्या माध्यमातून शिंदे यांना कडवे आव्हान दिले होते. यात शेख यांची उमेदवारी कोठे यांच्या पथ्यावर पडेल, अशी अटकळ बांधली जात होती.
विजय देशमुखांची ‘हॅट्ट्रिक’
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार विजय देशमुख यांनी तब्बल ६६ हजार ८७८ मतांची विक्रमी आघाडी घेत तिस-यांदा विजय नोंदविला. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी व काँग्रेससह शिवसेना व इतर सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. सोलापूर जिल्ह्य़ात सर्वाधिक मतांची आघाडी घेण्याचा मान देशमुख यांनी मिळविला. यापूर्वी दोनवेळा निवडून आलेले विजय देशमुख यांना ही निवडणूक एकतर्फी ठरली. त्यांना ८६ हजार ८७७ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे महेश गादेकर यांना १९ हजार ९९९ मते मिळविता आली. काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांना केवळ १४ हजार ४५६ मतांवर समाधान मानावे लागले. तसेच सेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे हे जेमतेम ९०२८ मते घेत चौथ्या स्थानावर फेकले गेले.
दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप माने यांना भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. देशमुख यांना ६९ हजार ५८० मते मिळाली. तर पराभूत माने यांना ४४ हजार ४७६ मतांवर समाधान मानावे लागले. देशमुख यांनी २५ हजार १०४ मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादीचे बाळासाहेब शेळके यांना १२ हजार २३३ तर शिवसेनेचे गणेश वानकर यांना १४ हजार ११८ मते पडली.
माढय़ात शिंदे पाचव्यांदा विजयी
माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी सतत पाचव्यांदा विजयश्री मिळविली. या ठिकाणी चार साखर कारखानदार एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे होते. शिंदे यांचा विजय राष्ट्रवादीला दिलासा देणारा ठरला. आमदार शिंदे यांनी ९७ हजार ८०३ मते मिळवून ३५ हजार ७७८ मतांची आघाडी घेतली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कल्याणराव काळे यांना ६२ हजार २५ मते पडली, तर शिवसेनेचे प्रा. शिवाजी सावंत यांना ४० हजार ६१६ मतांपर्यंतच मजल गाठता आली. भाजप पुरस्कृत चौथे साखर कारखानदार दादासाहेब साठे यांना चौथ्या क्रमांकावर जावे लागले. अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार सिद्रामप्प्पा पाटील यांना पराभवाची धूळ चारून काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी विजय मिळविला. म्हेत्रे यांना ९६ हजार ६२० मते पडली, तर पराभूत आमदार पाटील यांना ७९ हजार १९२ मतांवर समाधान मानावे लागले. माळशिरस राखीव विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील गटाची प्रतिष्ठा अखेर कायम राखली गेली. त्यांचे सहकारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हणमंत डोळस यांनी आपले प्रतिस्पर्धी अपक्ष अनंत खंडागळे व सेनेचे लक्ष्मण सरवदे या दोघांना पराभूत करून दुस-यांदा विजय मिळविला.
बार्शी येथे राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे राजेंद्र राऊत यांना ५१११ मतांच्या फरकाने पराभूत केले. या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष वेधले होते. सोपल यांना ९७ हजार ६५५ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी राऊत यांच्या पारडय़ात ९२ हजार ५४४ मते पडली. भाजपचे राजेंद्र मिरगणे यांना तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले.
करमाळ्यात शिवसेना
करमाळा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांना अखेरच्या क्षणी विजयश्रीने चकवा देत शिवसेनेच्या नारायण पाटील यांना साथ दिली. अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणुकीत नारायण पाटील यांनी रश्मी बागल यांचा केवळ १९६ मतांनी पराभूत केले. पाटील यांना ६० हजार ६१३ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी बागल यांच्या पारडय़ात ६० हजार ४१७ मते पडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय शिंदे यांना ५८ हजार ३७७ मते पडून ते तिस-या क्रमांकावर फेकले गेले. तर काँग्रेसचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी केवळ १४ हजार ३४९ मते मिळविली.
मोहोळ राखीव मतदारसंघात राष्ट्रवादीचे रमेश कदम यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे संजय क्षीरसागर यांच्यावर ८३६७ मतांच्या फरकाने मात केली. कदम यांना ६२ हजार १२० मते, तर क्षीरसागर यांना ५३ हजार ७५३ मते मिळाली. शिवसेनेचे मनोज शेजवाल यांना ४२ हजार ४७८ मते मिळून ते तिस-या क्रमांकावर गेले. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी केलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांना दारूण निराशा पत्करावी लागली.
पंढरपुरात भालके यांची सरशी
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत परिचारक यांचा ८९१३ मतांच्या फरकाने पराभव केला. शिवसेनेचे समाधान अवताडे हे तिस-या स्थानी गेले. भालके यांना ९१ हजार ८६३ मते पडली. तर प्रतिस्पर्धी परिचारक यांच्या पारडय़ात ८२ हजार ९५० मते पडली. तिस-या क्रमांकावरील सेनेचे अवताडे यांना ४० हजार ९१० मते पडली.
 

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Ajit Pawar and Sharad Pawar
लोकजागर- विभाजितांची ‘हतबलता’!
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
NCP clock symbol
अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा
Sangli Lok Sabha
सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली