सांगली जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाने चार जागा जिंकून वर्चस्व मिळविले असून शिवसेनेने खानापूरची जागा जिंकून जिल्ह्यात पाय रोवला आहे. प्रस्थापित तीनही माजी मंत्री आपआपल्या मतदार संघात विजयी झाले असले तरी राष्ट्रवादीचे जयंत पाटील वगळता अन्य दोघांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली.
जिल्ह्यात भाजपाचे मिरजेत सुरेश खाडे, सांगलीमध्ये सुधीर गाडगीळ, शिराळ्यात शिवाजीराव नाईक आणि जतमध्ये विलासराव जगताप विजयी झाले. राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या तासगाव-कवठे महांकाळमध्ये माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी चुरशीच्या लढतीत बाजी मारली असून त्यांनी याठिकाणी तब्बल २२ हजार १४० चे मताधिक्य मिळविले. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवित सर्वाधिक म्हणजे ७५ हजार १८६ इतके मताधिक्य पटकावले.
पलूस-कडेगाव मतदार संघातून काँग्रेसचे डॉ. पतंगराव कदम हे विजयी झाले. मात्र पहिल्या पाच फेरीपर्यंत मताधिक्य मिळविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. दोन फे-यांमध्ये तर त्यांच्यापेक्षा भाजपाचे पृथ्वीराज देशमुख यांनी आघाडी घेतली होती. मात्र अंतिम फेरीत कदम यांनी २४ हजार ३४ मतांची आघाडी घेतली.
खानापूर मतदार संघामध्ये शिवसेनेने विजय मिळवित जिल्ह्यात सेनेचा भगवा फडकविला. येथे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले अनिल बाबर यांनी काँग्रेसच्या सदाशिव पाटील यांचा १९ हजार ७९७ मतांनी पराभव करीत विजय संपादन केला. जतमध्ये भाजपाचे विलासराव जगताप यांनी १७ हजार ६९८ मतांनी काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत यांचा पराभव करीत यश संपादन केले.
शिराळा मतदार संघात खरी लढत भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात झाली. येथे भाजपाच्या शिवाजीराव नाईक यांनी काटय़ाच्या लढतीत राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांचा अवघ्या ३ हजार ६६८ मतांनी पराभव केला. या मतदार संघात काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना तिस-या क्रमांकाची मते मिळाली.
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली मतदार संघामध्ये भाजपाचे सुधीर उर्फ धनंजय गाडगीळ यांनी काँग्रेसच्या मदन पाटील यांचा १४ हजार ४५७ मतांनी पराभव करीत भाजपाचा सांगलीचा गड कायम राखला आहे. याठिकाणी आमदार संभाजी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार हे तिस-या क्रमांकावर राहिले.
मिरज मतदार संघामध्ये भाजपाचे सुरेश खाडे यांनी एकतर्फी विजय संपादन केला. त्यांनी काँग्रेसचे सिध्दार्थ जाधव यांचा तब्बल ६४ हजार ६७ मतांनी पराभव करीत भाजपाची जागा कायम ठेवली. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न माजी खा. प्रतिक पाटील यांनी स्वाभिमानीचे खा. राजीव शेट्टी यांच्या सहकार्याने केला. मात्र अखेरच्या क्षणी एकास एक लढत करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. बहुरंगी लढत होउनही येथील लढत एकतर्फी जिंकत सर्वाधिक मताधिक्य पटकाविले.
तासगाव-कवठे महांकाळ येथे आबांना पराभूत करण्यासाठी भाजपाचे खा. संजयकाका पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभाही तासगाव येथे घेण्यात आली. मात्र या सर्व प्रयत्नांना मोडीत काढीत २२ हजाराचे मताधिक्य घेत आबांनी राष्ट्रवादीचा गड कायम राखला. याठिकाणी भाजपाचे अजित घोरपडे यांना ८५ हजार ९०० मते, तर आबांना १ लाख ८ हजार ३१० मते मिळाली. ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेल्या काँग्रेसच्या सुरेश शेंडगे यांना ३ हजार ४७३ मते मिळाल्याने अनामत रक्कमही वाचविता आली नाही.