माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा फोडून चोरटय़ांनी पाच लाख ८० हजारांची रोकड लंपास केली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या निमित्ताने बँकेकडून सुरक्षिततेविषयी पुरेशी दक्षता घेतली जात नसल्याचेही दिसून आले.
सोलापूर-सातारा जिल्ह्य़ाच्या सीमेवर असलेल्या धर्मपुरीत जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा कार्यरत आहे. काल शुक्रवारी सायंकाळी बँकेचे कामकाज संपल्यानंतर कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी गेले. दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी दहा वाजता बँक उघडायला कर्मचारी गेले असताना बँक फोडण्यात आल्याचे दिसून आले. अज्ञात चोरटय़ांनी बँकेच्या पाठीमागच्या खिडकीचे लोखंडी गज गॅस कटरच्या साह्य़ाने कापून आत प्रवेश केला. नंतर तिजोरीही गॅस कटरने फोडली व त्यातील पाच लाख ७८ हजार ८७८ रुपयांची रोकड अलगदपणे लांबविली.
बँकांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे प्रकार थांबवण्यासाठी पुरेशा सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेच्या धर्मपुरी शाखेत सायरनची यंत्रणा आहे. परंतु आवश्यक ठरलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा नाही. बँक बंद झाल्यानंतर त्याठिकाणी रखवालदार तैनात असतो. परंतु रात्री त्याठिकाणी रखवालदार गैरहजर होता. चोरटय़ांनी बँक फोडण्यापूर्वी सुरुवातीला तेथील सायरनच्या वायरी कापल्या. त्यामुळे सायरन बंद पडले. सीसीटीव्ही कॅमेरे असते तर चोरटय़ांच्या छबी कॅमेराबध्द झाल्या असत्या. या परिस्थितीची माहिती घेऊनच चोरटय़ांनी बँक फोडल्याचे दिसून आले. दरम्यान, नातेपुते पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची फिर्याद बँकेचे शाखाधिकारी रामचंद्र कारंडे यांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी. एस. खाडे हे गुन्ह्य़ाचा तपास करीत आहेत. गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते.