सोलापूर शहरात विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसअंतर्गत राजकीय समीकरणे बदलली असून, त्यामुळे महापालिकेतील विष्णुपंत कोठे यांची सद्दी संपुष्टात येऊन आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे पालिकेचा ‘रिमोट’ राहणार असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांचे स्थानिक राजकारण पाहणारे विष्णुपंत कोठे हे उघडपणे शिंदे यांचे वैर घेऊन काँग्रेसबाहेर पडले. त्यांचे पुत्र महेश कोठे यांनी शिंदेकन्या आमदार प्रणिती शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत रोखण्याचा काटोकाट प्रयत्न केला. परंतु अखेर कोठे यांनी खेळलेला जुगार त्यांच्या चांगलाच अंगलट आला. एकीकडे लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे हताश झालेले सुशीलकुमार शिंदे यांचा दिलासा मिळाला असताना दुसरीकडे कोठे यांची अवस्था ‘तेलही गेले-तूपही गेले’ अशी झाली.
शिंदे यांचे स्थानिक राजकारण १९७८ पासून पाहणारे विष्णुपंत कोठे यांच्या ताब्यात सोलापूर महापालिका होती. गेली २५ वर्षे ‘कोठे बोले पालिका हले’ असे चित्र होते. शिंदे हेदेखील राजकीयदृष्टय़ा स्थानिक पातळीवर सर्वस्वी कोठे यांच्यावर अवलंबून होते. परंतु नंतर शिंदे संपर्क कार्यालय प्रमुखपद सांभाळताना कोठे यांची महत्त्वाकांक्षा वाढू लागल्याने व त्यातच २००४ साली सोलापूर लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा पराभव झाल्याने शिंदे-कोठे यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. गेल्या दहा वर्षांत हे शीतयुद्ध वाढत जाऊन अखेर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात युद्धाच्या मैदानावर उभे ठाकले.
पालिकेची एकहाती सांभाळताना महापौरपद, सभागृहनेतेपद भूषविलेले कोठे यांचे पुत्र महेश कोठे हे मागील २००९च्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून पराभूत झाल्यानंतर पुन्हा जोखीम नको म्हणून थेट शिंदे यांनाच आव्हान देत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. लोकसभा निवडणुकीत शिंदे हे पराभूत झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनाही पराभूत केल्यास सोलापुरातून शिंदे यांचे राजकारण हद्दपार होईल आणि आपलेच वर्चस्व निर्माण होईल, असा विश्वास कोठे यांनी बाळगला होता. सुरुवातीला शिंदे यांच्याशी असलेल्या मैत्रीला जागण्याची ग्वाही देणारे विष्णुपंत कोठे यांनी अखेर पुत्रप्रेमापोटी शिवसेनेचा भगवा शेला अंगावर घातला. शिंदे हे आपल्यामुळेच मोठे झाले, असा त्यांचा दावा होता. त्यांनी आपला अनुभव पणाला लावून शिंदे यांना जेरीला आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करून पाहिला. परंतु अखेर शिंदे यांचीच सरशी होऊन कोठे यांना मानहानी पत्करावी लागली.
या पाश्र्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असून, आतापर्यंत असलेले कोठे यांचे महत्त्व आपसूकच कमी होऊन थेट शिंदे हे स्वत: आपले राजकारण सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेतील कोठे यांचे वर्चस्व असताना त्यांच्याकडे २५पेक्षा जास्त नगरसेवक होते. परंतु यापैकी बरेच नगरसेवक त्यांच्यापासून दूर गेले आहेत. आता कोठे यांची सद्दी संपण्याची चिन्हे दिसत असताना पालिकेच्या कारभारावर आमदार प्रणिती शिंदे यांचे नियंत्रण राहणार असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी शिंदे-कोठे शीतयुद्ध चालू असताना आमदार प्रणिती शिंदे या पालिकेच्या कारभारात लक्ष घालण्याचा ज्या ज्या वेळी प्रयत्न केला, त्या त्या वेळी कोठे यांनी दबावतंत्राचा वापर करून शिंदे यांना हस्तक्षेप करू दिला नव्हता, परंतु आता शिंदे या काळाचा बदला घेण्यास तयार झाल्या असल्याचे बोलले जाते.