दर्जा घसरत असल्याने महापालिका शाळा बंद पडत असल्याची ओरड होत असतानाच परभणीला स्थलांतरित व्हावे लागलेल्या १२ वर्षांच्या चिमुरडीने आपल्या शाळेच्या ओढीने पायपीट, रेल्वे आणि बसने २५० मैलांचा प्रवास करीत थेट नाशिक गाठले. या तिच्या निरागस प्रेमाने भारावलेल्या शिक्षकांनी तिची महत्प्रयासाने समजूत काढली आणि तिला तिच्या आईच्या स्वाधीन केले.
सोनाली माणिक निरवाळ असे या चिमुरडीचे नांव. पालिकेच्या शाळा क्रमांक ६७ या फुलेनगरमधील मुलींच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये ती शिकत होती. वडिलांची तब्येत बिघडल्याने निरवाळ कुटुंबीय परभणीला कायमचे गेले.  सोनाली गावी जायला तयार नव्हती. आधीच्या शाळेत जायचा तिचा आग्रह तिथे सुरू होताा. गुरुवारी सकाळी सोनाली कोणाला काही न सांगता निघाली. दीड ते दोन तास पायपीट करत परभणीचे रेल्वे स्थानक गाठले. तिथून नाशिकला जाणारी रेल्वे पकडली. खिशात एक रुपया नसताना तिने हे धाडस केले. रेल्वेत कोणीतरी तिला १५ रुपये दिले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरून सोनालीने आपल्या शाळेकडे म्हणजे पंचवटीकडे जाणारी बस पकडली. सायंकाळी सहाच्या सुमारास पंचवटीत आल्यावर ती आपल्या जुन्या घराजवळ नवनाथनगरमध्ये राहणाऱ्या राणी धोंगडे या मैत्रिणीच्या घरी गेली. तिची मैत्रीण पालिकेच्या त्याच शाळेत शिक्षण घेते.
या बाबतची माहिती राणीने शुक्रवारी शाळेतील शिक्षिकांना दिली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा खांडेकर व कृती समितीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सुवर्णा जोपळे यांनी सोनालीला आपल्या घरी नेले. तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधून ती सुखरुप असल्याचे कळविण्यात आले. तत्पूर्वी, सोनाली बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबियांनी परभणी पोलिसांकडे तक्रार दिली होती. यामुळे शाळेने पंचवटी पोलीस ठाण्यात या बाबत कल्पना दिली. शनिवारी सोनालीची आई तिला नेण्यासाठी नाशिकला आली. शाळा सोडून गावी जाण्यासाठी ती तयार नव्हती. शिक्षकांनी तिची समजूत काढली. तिच्या शिक्षणासाठी चार हजार रुपयांची मदतही दिली. सर्वाच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या पालिकेच्या शाळेबद्दल तिचे उत्कट प्रेम पाहून शिक्षिकांना गहिवरून आले आणि जड अंतकरणाने सोनालीला निरोप देण्यात आला.