जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील सहा जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी, राहिलेल्या १५ जागांमध्येही दोन्ही प्रमुख गटांनी सर्वत्र उमेदवार दिलेले नाहीत. राष्ट्रवादी-थोरात गट (शेतकरी विकास मंडळ) व विखे गट या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी प्रत्येकी दोन जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. शिवाय श्रीगोंदे सेवा संस्था मतदारसंघात दोन्ही गटांचे उमेदवार नाहीत. त्यामुळे १५ जागांसाठी राष्ट्रवादी-थोरात गटाचे १३ उमेदवार तर विखे गटाचे ११च उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याबाबत राजकीय तडजोडींची चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी-थोरात गटाला कपबशी व विखे गटाला विमान हे चिन्ह मिळाले आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक दि. ५ मेला होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सोमवारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हांचेही वाटप केले. निवडणुकीचे राजकीय चित्र आता पुरते स्पष्ट झाले असले तरी काही ठिकाणी उमेदवार रिंगणात न उतरवण्याच्या दोन्ही गटांच्या खेळीकडे आता जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी-थोरात गटाने श्रीरामपूर सेवा संस्था मतदारसंघात उमेदवार रिंगणात उतरवलेला नाही. येथे विखे गटाचे जयंत ससाणे व इंद्रभान थोरात (स्वतंत्र उमेदवार) यांच्यात चुरशीची लढत होत आहे. विखे गटाने कोपरगाव सेवा संस्था व नेवासे सेवा संस्था या दोन्ही ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवलेला नाही. कोपरगाव येथे अनपेक्षितरीत्या अशोक काळे हे राष्ट्रवादी-थोरात गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी बिपीन कोल्हे स्वतंत्ररीत्या रिंगणात उतरले आहेत. या अनपेक्षित रचनेमुळे येथील निवडणूक चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत. नेवासे येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे राष्ट्रवादी-थोरात गटाचे उमेदवार आहेत. मात्र विखे गटाने येथे उमेदवार दिलेला नाही. गडाख व स्वतंत्र उमेदवार भगवान गंगावणे यांच्यात ही लढत होत आहे. विखे गटाने बिगरशेती संस्था मतदारसंघातही उमेदवार दिलेला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होते. येथे राष्ट्रवादी-थोरात गटाचे आमदार अरुण जगताप व स्वतंत्र उमेदवार सबाजी गायकवाड यांच्यामध्ये चुरस आहे.
अन्य ठिकाणच्या उमेदवारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सेवा संस्था : अकोले- सीताराम गायकर (राष्ट्रवादी-थोरात गट), शिवाजी धुमाळ (विखे गट). संगमनेर- रामदास वाघ (थोरात गट), रंगनाथ खुळे (विखे). श्रीरामपूर- इंद्रभान थोरात (स्वतंत्र उमेदवार), जयंत ससाणे (विखे). नेवासे- यशवंतराव गडाख (राष्ट्रवादी-थोरात), भगवान गंगावणे (स्वतंत्र). जामखेड- जगन्नाथ राळेभात (विखे), रामचंद्र राळेभात (राष्ट्रवादी-थोरात). कर्जत- विक्रम देशमुख (राष्ट्रवादी-थोरात), अंबादास पिसाळ (विखे). श्रीगोंदे- प्रेमराज भोईटे, बाबासाहेब भोस, दत्तात्रेय पानसरे (तिघेही स्वतंत्र उमेदवार). शेतीपूरक संस्था: रावसाहेब शेळके (राष्ट्रवादी-थोरात), दादासाहेब सोनमाळी (विखे). महिला (दोन जागा): चैताली काळे व मीनाक्षी साळुंके (दोघीही राष्ट्रवादी-थोरात), प्रियंका शिंदे व सुरेखा कोतकर (विखे), अश्विनी केकाण (स्वतंत्र). अनुसूचित जाती-जमाती : आमदार वैभव पिचड (राष्ट्रवादी), अशोक भांगरे (विखे). इतर मागासर्गीय : सुरेश करपे (विखे), अनिल शिरसाठ (राष्ट्रवादी-थोरात), बाबासाहेब भोस (स्वतंत्र) आणि विशेष मागास प्रवर्ग : बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर (राष्ट्रवादी- थोरात), गीते सुभाष (विखे), शिवाजी शेलार (स्वतंत्र).