‘अर्धी चड्डी’वाले दादा कोंडेकेही शरद पवारांना महागात पडले होते हे त्यांनी विसरू नये अशी खोचक टीका करत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
अर्धी चड्डीवाले देश चालवणार काय? असा सवाल उपस्थित करत शरद पवार यांनी संघावर टिका केली होती. नाशिक शहरातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली.
भुजबळांवर टीका करताना उद्धव यांनी त्यांच्यावर झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपांवर बोट ठेवले. तसेच नाशिकात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या काळात पैसेवाटप केला जात असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला. छगन भुजबळ यांनी आधी आपले घोटाळे सोडवावेत आणि नंतर जनतेला आश्वासने द्यावीत असेही उध्दव ठाकरे म्हणाले.
तसेच आपले शिवराय हे श्रीमंत योगी होते आणि शरद पवार हे श्रीमंत भोगी आहेत. तसेच अजित पवारांना सत्तेचा माज आलाय आम्ही तो उतरवू असेही उध्दव ठाकरे पुढे म्हणाले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पूर्णपणे लक्ष्य केले. काँग्रेसकडून मोदींवर वारंवार हुकूमशहा असल्याचा आरोप केला जातो. मात्र, पंतप्रधानसाठी काँग्रेसकडे एकसुद्धा लायक उमेदवार नसल्याचे उद्धव यांनी सांगितले. ईशरत जहाँ निष्पाप असल्याचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार शरद पवारांना कोणी दिला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.