येवला येथे संशयास्पदपणे फिरणाऱ्या एका युवकाकडून पोलिसांनी २७ तलवारी, गावठी पिस्तूल व एक बनावट पिस्तूल असा शस्त्रसाठा हस्तगत केला. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरात ही शस्त्र कशी दाखल झाली याची छाननी यंत्रणा करत आहे.
येवला शहरातील शहा कॉलनीत असलेल्या अपना बेकरीजवळ एक युवक खांद्यावर गोणी घेऊन संशयास्पदपणे वावरत असल्याची माहिती मालेगावच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने येवला येथील शहा कॉलनीत सापळा रचला. त्या वेळी कमानीपुरा परिसरात संशयित मतीन अब्दुल हमीद शेख (२१) खांद्यावर गोणी घेऊन उभा होता. पोलीस पथकाने चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच गोणी आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. गोणीत २७ तलवारी, एक गावठी बनावटीचे, तर एक बनावट पिस्तूल आढळून आले. ही तपासणी सुरू असताना मतीनने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्याला पकडून येवला शहर पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी चौकशी सुरू असून संशयिताच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.