मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील मानाचे पान असलेले कट्यार काळजात घुसली हे नाटक लवकर चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध गायक शंकर महादेव याने पंडित भानूशंकर शास्त्री ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शंकर महादेवन अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करतो आहे. या सिनेमात त्याने गायलेले आणि त्याच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘सूर निरागस हो’ या गाण्यावर महानायक अमिताभ बच्चनही फिदा झाले आहेत. या गाण्याचे आणि शंकर महादेवन याचे कौतुक करणारे ट्विट अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर केले आहे. त्याचबरोबर या गाण्याचा व्हिडिओही शेअर केला आहे.


एस्सेल व्हिजन आणि श्री गणेश मार्केटिंग अॅंड फिल्मस् यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे अभिनेता सुबोध भावेने. यानिमित्ताने सुबोध दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतो आहे. या चित्रपटातील शंकर महादेवन याच हे नवं रूप सादर करणारा शानदार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी शंकर महादेवनसोबत दिग्दर्शक सुबोध भावे, निर्माते सुनिल फडतरे, एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी आणि बिझनेस हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय शंकर महादेवनच्या या नव्या कारकिर्दीला शुभेच्छा देण्यासाठी सुप्रसिद्ध तालवादक तौफिक कुरेशी आणि शंकर महादेवन यांचे कुटुंबियही उपस्थित होते.