हिंदी वाहिन्यांवर आलेल्या विनोदी मालिकांच्या लाटेमध्ये प्रत्येकाने आपले हात धुवून घेतले असले, तरी त्यातील कित्येक मालिका किंवा कार्यक्रमांमधील विनोद ऐकताना ‘यात खरेच हसण्यासारखे काही होते का?’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यातही कमरेखालील विनोदांवर भर असलेल्या कार्यक्रमांची कमतरताही वाहिन्यांवर अजिबातच नाही. पण रोजच्या रोज काही तरी मनोरंजनात्मक देण्याच्या नादामध्ये एखाद्या वेळी या विनोदी मालिकांमध्ये कमरेखालचे विनोद दाखवले जाणे साहजिकच असल्याचे मत मराठी आणि हिंदी टीव्हीवरील नावाजलेले अभिनेता अतुल परचुरे यांनी सांगितले.
मराठीप्रमाणेच हिंदीमध्येसुद्धा यशस्वी कारकीर्द केलेल्या काही मोजक्या कलाकारांमध्ये अतुल परचुरे यांचे नाव घेतले जाते. लवकरच ‘सब टीव्ही’वरील ‘यम है हम’ या नवीन मालिकेतून चित्रगुप्ताच्या भूमिकेत ते प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पुराणात आणि कथांमध्ये चित्रित केलेल्या काळ्या रेडय़ावरून येणाऱ्या, कुरूप चेहरा, असुरी हसणाऱ्या यमाऐवजी लोकांच्या आयुष्याची काळजी घेणाऱ्या, भोळ्या यमाचे चित्रण या मालिकेमध्ये करण्यात येणार आहे. पण पुराणामध्ये चित्रित केलेल्या यमापेक्षा हा यम भोळा आहे, त्याला पटकन कोणीही फसवू शकतो. त्यामुळे त्याचा मदतीस हा हुशार चित्रगुप्त पृथ्वीवर येणार आहे, असे या मालिकेचे कथानक असून हलकी-फुलकी विनोदी मालिका असणार आहे.
हिंदी वाहिन्यांवरील विनोदी मालिकांबद्दल विशेषत: बोलताना त्याने सासबहूच्या रटाळ मालिकांना कंटाळलेले प्रेक्षक आता या विनोदी मालिकांकडे वळू लागल्याचे सांगितले. त्यामुळेच सध्या हिंदीमध्ये जास्तीत जास्त विनोदी मालिका दिसून येत आहेत. पण रोजच्या रोज वेगळे कथानक देण्याच्या हट्टापोटी कित्येकदा या मालिकांमधून कमरेखालचे विनोद दाखवले जातात आणि ते असणे अत्यंत स्वाभाविक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विनोदी मालिकांचे कथानक लेखकाच्या कलात्मक लेखनावर अवलंबून असते आणि रोजच्या रोज या मालिकांमध्ये नवीन प्रकारचे विनोदी प्रसंग आणि किस्से लिहणे सोपे नसते. त्यामुळे कधी तरी असे प्रसंग येणे साहजिकच असल्याचे ते सांगतात. पण त्यातही शेवटी लोकांना हलकेफुलके विनोदच आवडतात. त्यामुळे अशा आचरट विनोदी मालिकांचे आयुष्य मर्यादित स्वरुपाचे असल्याचेही ते नमुद करतात. त्याच वेळी मराठी प्रेक्षकांची विनोदाची भूक नाटकांमधून पूर्ण केली जाते, त्यामुळे आज हिंदीच्या तुलनेत मराठीमध्ये विनोदी मालिका कमी असल्याचे ते सांगतात.