बॉलिवूडमध्ये शंभर कोटी क्लबचा बोलबाला आहे. एखाद्या अभिनेत्याच्या चित्रपटाने शंभर कोटींची कमाई केली म्हणजे तो त्या दमाचा नायक म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावावर चित्रपट चालतात, असा सर्वसाधारण समज आहे. यावर्षी ‘यह जवानी है दिवानी’ चित्रपटाच्या यशामुळे रणबीर क पूर तर ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाच्या यशामुळे फरहान अख्तर दोघांचेही नाव या शंभर कोटी क्लबमध्ये दाखल झाले आहे. पण, फरहानने खरेतर दुसऱ्यांदा शंभर कोटींचे यश चाखले आहे. फरहानचा ‘डॉन २’ चित्रपट शंभर कोटी कमावणारा पहिला चित्रपट आहे. मात्र, हे यश फरहानला अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून मिळाले होते. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून तिन्ही क्षेत्रात शंभर कोटींची कमाई करणारा फरहान सध्यातरी बॉलिवूडमध्ये एकमेव आहे.
फरहान अख्तरने अभिनेता म्हणून आपली मोहोर इंडस्ट्रीत उमटवल्यावर दिग्दर्शक म्हणून लक्ष केला. त्यापाठोपाठ थेट शाहरूखला घेऊन ‘डॉन’ चित्रपटाचा रिमेक केला. या दोन्ही चित्रपटांनी त्याला दिग्दर्शक म्हणूनही यश मिळवून दिले, नावलौकिक मिळवून दिला. मात्र, ‘डॉन’च्या सिक्वलने त्याला तिकीटबारीवर शंभर कोटींची कमाई करून दिली होती. ‘डॉन २’ साठी फरहानने निर्माता आणि दिग्दर्शक दोन्ही भूमिका पार पाडल्या होत्या. आता ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटानेही तीन आठवडय़ाच्या आत शंभर कोटीचा आकडा पार केल्यामुळे तो अभिनेता म्हणून या क्लबमध्ये दाखल झाला आहे. ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाचे चौथ्या आठवडय़ातही जोरदार खेळ सुरू आहेत.
फहानची तुलना सध्या दिग्दर्शक-अभिनेता राज कपूर यांच्याशी के ली जाते आहे. राज कपूर हे केवळ अभिनयातच नव्हे तर चित्रपटनिर्मितीच्या विविध गोष्टींमध्ये निष्णात होते. तसेच फरहाननेही एक अभिनेता, एक गायक, दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवला आहे. केवळ बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या शंभर कोटी क्लबमध्ये त्याचा समावेश करून चालणार नाही तर त्याच्यासारख्या हरहुन्नरी कलाकारासाठी बॉलिवूडला स्वतंत्र क्लब निर्माण करावा लागणार आहे.