एकोणिसाव्या शतकात भारतात स्त्रीनं शिक्षण घेणं म्हणजे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला तडा जातो अशी समाजाची धारणा होती. याच कालखंडात ब्रिटिश राजवटीचा अंमल भारतात सुरू झाला होता. त्यामुळे काहीशा पराभूत मनोवस्थेनं पिचलेला, मागासलेपण, अज्ञान, दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, बुरसटलेल्या रूढी-परंपरा यांनी ग्रासलेला भारतीय समाज अंध:काराच्या खाईत आयुष्य कंठीत होता. पुरुषप्रधान संस्कृतीचा इतका पगडा त्याच्यावर होता, की पुरोगामी म्हणविली जाणारी मंडळीही त्यास अपवाद नव्हती. अशा अंधारलेल्या वातावरणात सुधारकी विचारांची मोजकी मंडळी याविरोधात आवाज उठवत होती. उच्च शिक्षणाने पाश्चात्य आचार-विचार आणि आधुनिकतेशी परिचित झालेल्या आणि त्यामुळेच देशाच्या पारतंत्र्याची तसेच भारतीय समाजातील अनिष्ट प्रथा-रूढींची तीव्रतेनं जाणीव झालेल्या या मंडळींनी लेखणी व प्रत्यक्ष कृतीद्वारे समाजसुधारणेचा आग्रह धरला होता. परंतु मूढावस्थेतील समाजाला म्हणावी तशी जाग येत नव्हती. अशावेळी रवींद्रनाथ टागोरांसारखा साहित्यिक प्रबोधनाकरता पुढे सरसावला. त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्या, नाटकांतून सामाजिक सुधारणांबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा मार्ग पत्करला. घणाघाती वैचारिक मांडणीपेक्षा ललितलेखनाद्वारे हे काम केल्यास ते लोकांच्या पचनी पडून त्यांच्या मानसिकतेत हळूहळू बदल होईल, हे रवींद्रनाथ जाणत होते. स्त्रीची अवनत अवस्था हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होताच. म्हणूनच त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून तत्कालीन स्त्रीची मनोव्यथा, त्यांचा कोंडमारा, त्यांना आलेलं आत्मभान यांना वाट करून दिली. ‘स्त्रीर पत्र’, ‘खाता’सारख्या कथांमध्ये त्यांनी स्त्रीचं हे दु:ख मांडलं आहे. रवींद्रनाथांची तरल, हळुवार लेखणी स्त्रीदु:खाची कथा मांडताना क्वचित आक्रमकही होते; परंतु त्यातून स्त्रीचा आक्रोशच व्यक्त होतो. त्यावेळच्या समाजाची धारणा लक्षात घेता त्यांनी या कथांद्वारे केलेलं समाजजागृतीचं काम नि:संशय महत्त्वाचं होतं.
नृत्यांगना राजश्री शिर्के यांनी सादर केलेलं रवींद्रनाथांच्या ‘खाता’ या कथेवर आधारित नृत्यनाटय़ पाहण्याचा योग नुकताच आला. उमा ही या कथेची नायिका. सुखसमृद्धीनं संपन्न अशा घरात जन्मलेल्या उमेचे सर्वचजण लाड करतात. तिच्या प्रत्येक गोष्टीचं घरात कोडकौतुक होतं. तिच्या अवखळ बाललीलाही वाखाणल्या जातात. त्यामुळे काहीशी लाडावलेली उमा घरभर मुक्त संचार करत आपल्या मनाला येईल ते करत असते. यथावकाश ती शाळेत जाते. तिथंही मैत्रिणींसोबत ती  बागडते. शब्दांशी ओळख झाल्यावर तर तिच्या प्रतिभेला जणू धुमारेच फुटतात. घरच्या भिंती तिच्या शब्दरंगानं रंगून जातात. उमेच्या या कृतीचंही कौतुकच होतं. वडिलांच्या घरखर्चाच्या वहीत ती आपल्या शब्दांची नवी भर घालते. तिच्या या बालअपराधाकडे घरचे काणाडोळा करतात. पण जेव्हा ती लेखक असलेल्या थोरल्या भावाच्या वहीतही अक्षरं गिरबटते, तेव्हा स्फोट होतो. त्याला ते बिलकूल आवडत नाही. कधी नव्हे ते उमाला त्याच्या संतापाला सामोरं जावं लागतं. पण त्यातून एक गोष्ट मात्र बरी घडते. तिला एक स्वतंत्र वही मिळते; ज्यात ती आता तिला जे वाटेल ते लिहू शकते. अल्लाउद्दिनचा दिवाच जणू तिला सापडतो. तिला जाणवणाऱ्या, भावणाऱ्या प्रत्येक गोष्टींबद्दल ती त्यात लिहू लागते. ही वही म्हणजे तिची जीवलग मैत्रीणच बनते. तिची गुपितं सांभाळणारी. तिचे हर्षविमर्श नोंदविणारी.
त्याकाळच्या रीतीप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षीच उमेचं लग्न होतं आणि तिचं हसरं, खेळकर व्यक्तित्व अकस्मात आक्रसून जातं. सासरच्या नव्या रीतीभाती, नीतिनियमांनी बंदिस्त जग तिला सर्वस्वी अपरिचित असतं. तिच्यासोबत आलेली दाई जोवर सासरी असते, तोवर तिला त्याचा काच होत नाही. ती तिची समजूत काढते. परंतु दाई माघारी गेल्यावर मात्र तिची घुसमट सुरू होते. लहानगं वय.. तशात माहेरच्या मोकळ्या श्वासातून एकदम बंदिवासात येऊन पडलेली उमा. आपलं मन मग ती वहीत मोकळं करू पाहते. पण तिच्या नणंदा व जावा तिला वहीत लिहिताना पाहून भयचकित होतात. मुलीनं लिहिणं-वाचणं पाप समजणाऱ्या त्या घरात उमेचं हे वर्तन अगोचर ठरतं. त्या तिच्या नवऱ्याकडे- प्यारीमोहनकडे  तिची तक्रार करतात. स्वत: एक लेखक असलेल्या प्यारीमोहनला बायकोनं लिहिलेलं मात्र अजिबात खपत नाही. तो तिच्यावर प्रचंड चिडतो. तिला मारहाण करून ‘याउप्पर लिहिताना दिसलीस तर बघ..’ असा सज्जड दम देतो. तिथून उमेचं वहीत लिहिणं थांबतं.
तिची घुसमट मात्र वाढत जाते. दुर्गापूजेच्या वेळी एका भिकारणीने गायलेल्या गाण्यानं तिच्या हृदयाची तार पुन्हा एकदा छेडली जाते, आणि नकळत पुन्हा ती वहीत आपलं मन मोकळं करते. ही गोष्ट जावा लगोलग तिच्या नवऱ्याच्या कानी घालतात. संतप्त प्यारीमोहन तिची वही हिसकावून घेऊन त्यातली पानं टराटरा फाडून टाकतो. उमेचं सर्वस्वच हिरावलं जातं. असहाय उमा काहीच करू शकत नाही. तिला प्रश्न पडतो : जो नवरा स्वत:ला लेखक म्हणवतो, त्याला बायकोच्या लिहिण्याचं मात्र असं वावडं का असावं?
तिच्या या शोकसंतप्त प्रश्नाला कुठलंच उत्तर नसतं..
राजश्री शिर्के यांच्या ‘खाता’ या नृत्यनाटय़ात उमेचं हे दु:ख उत्कटतेनं प्रतिबिंबित झालेलं आहे. पुराणातली आत्माभिमानी उमा आणि वर्तमानातली सृजनाचं दैवी वरदान लाभूनही उपेक्षिली गेलेली उमा यांची तुलना करत हे नृत्यनाटय़ चरमबिंदूशी पोहोचतं. रवींद्रनाथांच्या कथेचं ठाय लयीतलं हे आविष्करण प्रेक्षकांची पहिल्या प्रवेशापासूनच पकड घेतं. उमेची निरनिराळ्या प्रसंगांतली वेगवेगळी रूपं घटना-प्रसंगांच्या लयपूर्ण बांधणीतून आपल्यासमोर उलगडत जातात. निवेदन, कथन, सादरीकरण अशा त्रिवेणीतून हे नृत्यनाटय़ साकारतं. कथेतील पेहेराव, रहनसहन, संगीत, नृत्य असं सगळं बंगाली वातावरण यात प्रत्ययकारकरीत्या उभं केलं गेलं आहे. राजश्री शिर्के यांच्यासह त्यांच्या चार शिष्या उमेची ही कथा मंचित करतात. घटनाक्रमात अनेकविध पात्रं एकातून एक उलगडत जातात. त्यांची गुंफण इतक्या सफाईनं संहिताकार आणि नृत्यरचनाकार या नात्यानं राजश्री शिर्के यांनी केली आहे, की ती- ती पात्रं ओळखायला बघणाऱ्याला सायास पडत नाहीत. सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकेला दिलेला शंभर टक्के न्याय हे ‘खाता’च्या यशाचं गमक सांगता येईल. रवींद्रनाथांच्या कथेशी आजच्या स्त्रीप्रश्नांचा संदर्भ जोडण्याचा जो प्रयत्न राजश्री शिर्के यांनी यात केला आहे, तो मात्र तितकासा उचित वाटत नाही. कारण आज स्त्री सर्वचदृष्टय़ा कितीतरी योजने पुढे गेली आहे. अर्थात तिच्यासमोरचे सगळेच प्रश्न संपले आहेत असं नाही. पुरुषी मानसिकतेशी तिला त्यावेळी जसं झगडावं लागत होतं, तसंच आजही झगडावं लागतंय, हेही खरंय. परंतु त्याचे संदर्भ वेगळे आहेत. ते या कथेशी मेळ खात नाहीत. असो.
संकल्पना, संहिता, नृत्यआरेखन, वेशभूषा, दिग्दर्शन आणि अभिनय अशा चतुरस्र जबाबदाऱ्या राजश्री शिर्के यांनी सहजगत्या व उत्तमरीत्या पेलल्या आहेत. त्यांच्या गुणी शिष्या मनवा भागवत, श्रृती भालेकर, शुची साकवाय आणि श्रद्धा सुर्वे यांनीही गुरूच्या तोडीस तोड साथ देत हा नृत्यनाटय़ाविष्कार संस्मरणीय केला आहे. नृत्याबरोबरच अभिनयाची त्यांची जाणकारीही लक्षणीय आहे. या आविष्काराचं दृश्यस्वरूप जितकं देखणं आहे, तितकंच श्राव्यरूपही! याचं श्रेय संगीतकार अनिरुद्ध शिर्के यांना जातं. त्यांनी रसपरिपोषी वातावरणनिर्मिती आणि प्रसंगानुसारी मूड्स गडद-गहिरे करताना विविध तालवाद्यांचा केलेला वापर अप्रतिम! नरेंद्र कोथंबीकर यांनी आपल्या भावपूर्ण गाण्यांतून ‘खाता’चं हळुवारपण, त्यातला शोकसंतप्त भाव ताकदीनिशी पोहोचवला आहे. रवी यांची प्रकाशयोजनाही पूरक. ‘खाता’च्या रूपानं एक देखणं दृक्-श्राव्य-काव्य बऱ्याच दिवसांनी अनुभवायला मिळालं.