विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचे पुरस्कार पटकावित असतानाच ‘किल्ला’ने राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. हे यश मिळत असतानाच प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार किल्लाला मिळेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता आणि या शुक्रवारी त्याचं उत्तर चित्रपटगृहाबाहेर लागलेल्या लांब रांगा आणि दिमाखात झळकणा-या हाऊसफुल्लच्या बोर्डमधून रसिकांनीच दिलं. पहिल्या तीन दिवसात तीन कोटी २५ लाख एवढी घसघशीत कमाई या चित्रपटाने केली.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आशयघन चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरतात मात्र सामान्य प्रेक्षकांचा त्या चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आणि हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरतात असा एक समज आपल्याकडे प्रचलित झाला आहे. यामध्ये काही अंशी तथ्य असलं तरी आता मात्र हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे आणि याचं उत्तम उदाहरण ठरला आहे ‘किल्ला’ हा चित्रपट. या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या किल्लाने सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड दिमाखात झळकवत पहिल्या तीन दिवसात कोटींची उड्डाणे घेत तीन कोटी पंचवीस लाख एवढी कमाई केली आहे.
चित्रपटात स्टार पॉवर असलेले कलाकार नसताना, मनोरंजनाचा नेहमीचा मसाला नसतांना, सशक्त कथा आणि तेवढ्याच जबरदस्त अभिनयाच्या जोरावर ‘किल्ला’ ने हे यश मिळवलंय. पहिल्या आठवड्यात २२५ चित्रपटगृहे आणि तीन हजार शोज् द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘किल्ला’च्या शोज् मध्ये प्रेक्षकांच्या मागणीतून वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई – पुण्यासह कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, नागपूर मध्येही ‘किल्ला’ला असाच तुफान प्रतिसाद मिळत आहे.