गणपतीचे नाव घेताच डोळ्यासमोर त्याची मंगलमय मूर्ती, त्याच्याभोवतीचे मखर आणि आरास, फुलाफळांनी गजबजलेला दादरचा बाजार, लालबाग-परळ भागामध्ये राजाची एक झलक घेण्यासाठी चालू असलेली भाविकांची लगबग, विसर्जनाच्या दिवशी गजबजून गेलेली जुहू चौपाटी असे दृश्य सर्वसाधारण मुंबईकरांच्या डोळ्यासमोर येते. देशभरात कोणालाही विचारलं तर नवरात्र म्हटलं की सुरत-अहमदाबाद, दुर्गापूजा म्हटलं की कोलकाता डोळ्यासमोर येतं. त्याचप्रमाणे गणेशोत्सव म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती म्हणजे गजबजलेली मुंबई. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आम्ही मुंबईबाहेरून आलेल्या आणि इथे स्थिरावलेल्या आपल्या लाडक्या कलाकारांना ते इथे येण्यापूर्वी त्यांच्या मनात असलेली गणेशोत्सवाबाबतची संकल्पना काय होती, याबद्दल बोलतं केलं आहे..
लहानपणापासून ‘लालबागचा राजा’चे आकर्षण
लहानपणापासून मला लालबागच्या राजाचे प्रचंड आकर्षण होते. खासकरून त्याच्या रूपाचे. कारण, इतर गणपती गुबगुबीत असतात. ते देवासारखे दिसतात. पण, या राजाच्या रुबाबदार देहयष्टीमुळे तो मला आपल्यातला एक वाटतो. तीन वर्षांपूर्वी मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या पहिल्या मालिकेच्या प्रसिद्धीनिमित्त आम्ही गणेशगल्लीतील गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा तिथे मला माझा एक चाहता भेटला. मी त्याला लालबागच्या राजाला भेटायची माझी इच्छा बोलून दाखवली आणि त्याने लगेचच मला राजाचे दर्शन मिळवून दिले. तेव्हा मी या क्षेत्रात नवीन होतो. त्यामुळे अशावेळी अचानक भेटलेला चाहता आणि त्याच्यामुळे लालबागच्या राजाचे झालेले दर्शन, तिथे मला माझ्या भूमिकेमुळे मला ओळखणारी माणसं आणि त्यामुळे मला मिळत असलेली खास वागणूक.. या सगळ्या गोष्टींनी मी भारावून गेलो होतो. मला राजाकडे कधीही नवस मागायचा नव्हता. त्यावेळी मी त्याच्याकडे फक्त एकच मागणे मागितले होते की ‘जोपर्यंत मी मुंबईत आहे, तोपर्यंत दरवर्षी मला तुझे दर्शन लाभू दे’. योगायोगाने गेली तीन वर्षे मी गणपतीच्या दिवसांमध्ये कितीही व्यग्र असलो तरी एक दिवस असा मिळतोच की मला लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळते. मुंबईमधील हे माझं चौथं वर्ष आहे. यावेळी पाहू या मला दर्शनाला कधी वेळ मिळतोय.
हरीश दुधादे (माझे मन तुझे झाले, ई टीव्ही)

पर्यावरणाचे भान राखणे आवश्यक
मी डेहराडूनचा आहे. पण, आम्ही तिथेही दरवर्षी नियमितपणे गणपतीची मूर्ती आणून त्याची पूजा करत असू. त्यामुळे मुंबईतसुद्धा मी गणेशोत्सव मनापासून साजरा करणार आहे. कदाचित हा एक असा सण आहे जो सर्व धर्मातील लोक साजरा करतात. मी माझ्या मित्रांकडेसुद्धा गणपती दर्शनासाठी जाणार आहे. मला गोडाधोडाचे पदार्थ फार आवडतात. त्यामुळे मोदक हा माझा लाडका प्रकार आहे. फक्त हा सण साजरा करताना लोकांनी पर्यावरणाचे भान राखावे, एवढीच माझी प्रार्थना आहे.  
करण शर्मा (एक नयी पहचान, सोनी)

बहिणीशी जोडणारा दुवा
मी मूळचा काश्मीरचा आहे आणि मुंबईत येऊन मला दहा वर्षे झाली आहेत. लहानपणी एकदा मी माझ्या वडिलांसोबत मुंबईत आलो होतो आणि तेव्हा मी गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक पाहिली होती. त्यावेळेस त्या मिरवणुकीने मला प्रचंड आकर्षित केले होते. अजूनही गणेशोत्सव जवळ आला की मला विसर्जनाच्या मिरवणुकीचे वेध लागतात. पण, त्याचवेळी एक मुंबईकर म्हणून तेव्हा होणाऱ्या रहदारीचा मला राग येतो. माझी बहीण लहानपणापासून गणपतीला पूजते. तेव्हा मला त्याचे फारसे काही वाटत नसे पण, इथे आल्यावर गणेशोत्सवामध्ये मला तिची फार आठवण येते.
एका अर्थाने हा सण आम्हा दोघांना जोडणारा एक दुवा आहे, असे म्हटले तरी हरकत नाही. मी एक अस्सल खवय्या आहे आणि या दिवसांमध्ये बनवल्या जाणाऱ्या मोदकांची मी आतुरतेने वाट पाहतो.
राज सिंग अरोरा (ये मोहबत्ते, स्टार प्लस)

थक्क करणारा सोहळा
मी मूळची बंगळुरूची आहे. दक्षिण भारतात गणेशोत्सव तितक्या गाजावाजा करून साजरा केला जात नाही. त्यामुळे मुंबईत येईपर्यंत मला या सणाबद्दल फार कमी माहिती होती. पण, जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा इथल्या गणेशोत्सवाचे व्यापक स्वरूप पाहून मी थक्क झाले होते. इथे गणेशोत्सव हा केवळ घराघरातून साजरा केला जाणारा एक सण नसतो तर तो एक मोठा जल्लोष असतो. विसर्जनाच्या दिवशीची मिरवणूक, गाणी, नृत्य यामध्ये बेधुंद झालेले लोक पाहिले की वाटतं ते देवासोबत आनंद साजरा करत आहेत. या दिवसांमध्ये मी माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी जाते. त्यांच्यासोबत गणेशोत्सव साजरा करते. मला फारसे गोड खाणे आवडत नाही. पण, गणपतीचा मोदक मात्र मला फार आवडतो.
रुपल त्यागी (सपने सुहाने लडपन के, झी टीव्ही)

विसर्जन मिरवुणकीला चौपाटीवर जाणार
मी मूळची पुण्याची आहे आणि मुंबईमधलं हे माझं पहिलंच वर्ष आहे. खरे पाहायचे झाल्यास गणेशोत्सवाच्या दरम्यान आमच्या सोसायटीमध्ये होत असलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये मी नृत्य आणि अभिनयाच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि तेथूनच मला अभिनयाचे बाळकडू मिळाले. त्यामुळे माझे आणि गणेशोत्सवाचे एक छान नाते आहे. पुण्यात आम्ही विसर्जनासाठी नदीवर जात असू. नदीवर बाप्पांचे विसर्जन करण्याची मजा वेगळीच असते. मुंबईत मात्र बाप्पांच्या मोठमोठय़ा मूर्तीचे शानदारपणे समुद्रात विसर्जन केले जाते. त्याची उत्सुकता आहे. इथे मुंबईत समुद्रावर होणाऱ्या विसर्जनाच्या मिरवणुका पाहायलाही मला खूप आवडतात. त्यावेळी उधळला जाणारा गुलाल, संगीतामध्ये दंग झालेले भक्त, जल्लोष पाहायची मला फार उत्सुकता आहे. त्यामुळे या मिरवणुका अनुभवायला मी यंदा नक्कीच चौपाटीवर जाण्याचा प्रयत्न करेन.
दीप्ती लेले (लगोरी, स्टार प्रवाह)