नृत्य ही कधीच अजय देवगणची खासियत नव्हती. पण भल्याभल्याना आपल्या तालावर नाचविणाऱ्या प्रभुदेवाने हे आव्हान लिलया पेलले. ‘अॅक्शन जॅक्सन’ या त्याच्या आगामी चित्रपटात प्रभुदेवाने अजयला अतिशय हलक्याफुलक्या आणि सहज करता येण्याजोग्या प्रभावशाली स्टेप्स दिल्या आणि त्याच्याकडून आकर्षक नृत्याविष्कार साकारून घेतला. अजयची शरीरयष्ठी लक्षात घेऊन नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवाने तयार केलेल्या नृत्याच्या खास स्टेप्स साकारण्यात अजयला जराही अवघडल्यासारखे वाटले नाही. पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना अजय म्हणाला, मी प्रभुदेवाच्या पावलावर पाऊल ठेऊन पदन्यास केला. प्रभुदेवाने मला जे काही करायला सांगितले मी तेच केले. चांगली गोष्ट म्हणजे, मला शोभेल असा पदन्यास त्याने साकारला. अभिनेत्याची शरीरयष्टी लक्षात घेऊन डान्स स्टेप्स साकारत असल्याचे प्रभुदेवा म्हणतो, प्रभुदेवाने तेच केल्यामुळे आपल्याला या डान्स स्टेप्स करणे अवघड वाटले नाही असे अजयचे म्हणणे आहे. चित्रपटात अजयला नाचताना पाहून कमालीचा खुष झालेला प्रभुदेवा म्हणतो, अजय देवगण चित्रपटात फार नृत्य वगैरे करण्याच्या फंदात पडत नाही. आम्ही त्याला स्टायलिश नृत्य करण्यास भाग पाडले. जेव्हा बघाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवेल! ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या अॅक्शन जॅक्सन चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि यामी गौतम यांच्यादेखील भूमिका आहेत.