प्रियांका चोप्रा हे नाव बॉलीवूडमध्ये फारच लोकप्रिय आहे, कारण ती ज्या सहजतेने ‘खाना’वळीशी पटवून घेते त्याच सहजतेने ती रणवीर आणि अर्जुन कपूरलाही ताब्यात घेऊ शकते. एकाच वेळी ती ‘गुंडे’ करते आणि ‘मेरी कोम’ही करते आणि तितक्याच सहजतेने ती अमेरिकन रॅप गायक पिटबुलबरोबर गाणेही गाऊन येते. तिची ही ऊर्जा तिच्या बॉलीवूडमधील सहकाऱ्यांना अचंबित करून जाते. खुद्द प्रियांकालाही याची जाणीव आहे; पण तिला एकाच वेळी खूप काही गोष्टी करायच्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री, ख्यातनाम आंतरराष्ट्रीय गायिका आणि आता ‘मॅडमजी’ या चित्रपटाची निर्माती अशा नानाविध भूमिकांमधून वावरणाऱ्या प्रियांकाला ती साकारत असलेल्या ‘मेरी कोम’चा आणि तिचा संघर्ष सारखाच वाटतो..
एका ग्लॅमरस अभिनेत्रीसाठी ‘मेरी कोम’ची भूमिका करण्याचा निर्णय सोपा होता? ग्लॅमरस तर मी आहेच.. प्रियांका सांगते. उलट, एम. सी. मेरी कोमची भूमिका केल्यानंतर ते आणखीन दुपटीने वाढलेय, असे ती म्हणते. एका छोटय़ाशा गावातली तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्याची मुलगी. ती पुढे जाऊन ऑलिम्पिक विजेती बनते, पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती खेळाडू बनते. ही प्रत्येक अशा व्यक्तीची कहाणी आहे ज्यांच्या प्रतिभेला संकुचित विचारातच अडकवून ठेवण्याचे काम समाजाक डून केले जाते. म्हणजे एखाद्याला तू खेडय़ातून आहेस, त्यामुळे तू कधीच पुढे येऊ शकणार नाहीस. तुमचा पारंपरिक व्यवसाय आहे, मग तू स्वत:च्या आवडीनिवडींना बाजूला सारून तोच प्राणपणाने जपला पाहिजेस, असे सल्ले देऊन, अशी बंधने घालून जेव्हा एखाद्याच्या सर्जनशीलतेला दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात असेच बंडाचे, विद्रोहाचे विचार येतात. त्याच्या व्यक्तित्वातून तो विद्रोह उमटायला लागतो जे मेरी कोमच्या बाबतीतही घडले होते. ती पहिली ‘अँग्री यंग वुमन’ होती. मी स्वत: माझे नशीब घडवून दाखवीन, ही जिद्द मेरीची होती. त्यामुळे तिची क था ही इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. मला म्हणूनच ही कथा खूप आवडली आणि मी चित्रपटासाठी होकार दिला, असे प्रियांकाने सांगितले.
तुझा आणि मेरीचा संघर्ष एकसारखा कसा असू शकतो..
मेरीचा आणि माझा संघर्ष वेगळा नाही, असे मी म्हणते, कारण माझ्या घरात चित्रपटांची पाश्र्वभूमी कोणालाच नव्हती. माझे आईवडील दोघेही डॉक्टर. आमच्यापैकी कोणीही कधी मुंबईला आले नव्हते. त्यात मला स्वत:ला अभिनयातला ‘अ’ही माहीत नव्हता. ‘शो बिझनेस’ असे भलेमोठे नाव असलेल्या या व्यवसायात करतात काय हे मला फारसे माहीत नव्हते. ‘अ‍ॅक्शन’ आणि ‘कट’ या दोन शब्दांमध्ये अजब दुनिया असते आणि ती त्या कॅमेऱ्यासमोर उभ्या असलेल्या कलाकाराला उभी करायची असते, हे काही कळत नव्हते, शिवाय तुमचा कोणी ‘गॉडफादर’ इथे नसेल तर निभाव लागणे कठीण आहे, असे सल्ले तर आएदिन मिळत होते. मी तेव्हा फक्त १७-१८ वर्षांची होते. त्यामुळे इथे काहीच झाले नाही तर मी परत येऊन माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करेन, असे आश्वासन मी वडिलांना दिले होते; पण आता मागे वळून बघताना मी एवढेच सांगेन.. मी जे चित्रपट केले ते पहिल्यापासून खूप चालले. त्यासाठी मला ‘गॉड’नेच ‘फादर’सारखी मदत केली, दिशा दाखवली, असे मी म्हणते, कारण त्या तरुण वयात काय चांगले-काय वाईट, कुठला चित्रपट तुमच्यासाठी योग्य आहे हे विचाराने ठरवणे मला शक्य झाले म्हणून आजचे यश माझ्याबरोबर आहे, असे मला वाटते.
अर्थात, मेरीचा संघर्ष हा अधिक कडवा होता, असे ती म्हणते. तिने बॉक्सिंग हा खेळ आपला व्यवसाय म्हणून स्वीकारला तेव्हा तो पुरुषांचा खेळ आहे, तू तिथे जाऊ शकत नाही.. इथपासून तिच्या विरोधाची सुरुवात झाली होती. तिने खेळ आपलासा केला, मग विवाहाचा निर्णय घेतला, तर विवाहानंतर तुझा खेळ संपेल म्हणून तिला विरोध झाला. मुले झाल्यानंतर तर तिचा खेळच बंद केला गेला; पण तिने हा सगळा विरोध मोडून काढला आणि ती पुन्हा खेळाकडे परतली. नुसतीच परतली नाही, तर तिने ऑलिम्पिक पदक जिंकून दाखवले. हे जे तिचे जिद्दी मन आहे ना ते अफलातून आहे. म्हणजे स्त्री जेव्हा एखाद्या ध्येयाने पेटून उठते तेव्हा ती काय चमत्कार करू शकते हे मेरीने दाखवून दिले आहे. मी माझ्या ध्येयाप्रत पोहोचणार, तुम्ही मला रोखूच शकत नाही. मी हिरो नाही.. ‘शिरो’ आहे. ‘ती’ आणि ‘हिरो’ या दोन गोष्टींचा मिलाफ फार क्वचित पाहायला मिळते. मेरीचे ‘शिरो’ असणे मला अंतर्बाह्य़ बदलून गेले..
पण, मेरी कोमची भूमिका करणे तिच्यासाठी सहजसोप्पे नव्हते. शारीरिकदृष्टय़ा तर ते आव्हान होतेच; पण माझा चेहरा हीसुद्धा एक मोठी अडचण होती. मेरीसारखे दिसण्यासाठी प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर केला, व्हीएफएक्स करून पाहिले, पण तो प्रकार फारच नाटकी वाटत होता. तेव्हा तो प्रकारच सोडून दिला. मेरी अ‍ॅथलीट असल्याने एकीकडे दणकट शरीर, पण मन मात्र अवखळ. मेरीचा स्वभाव खूप गमत्या, सगळ्यांबरोबर हसूनखेळून वावरणारी आणि एका स्त्रीचे जे नखरे असतात ते सगळं करणारी अशी ती आहे. ती तिच्या घरसंसारात तितकीच रमते. हा तिच्या एकूणच शरीर आणि स्वभावातला विरोधाभास मला माझ्यात उतरवायचा होता जे माझ्यासाठी आव्हान होते; पण तिच्या स्वभावातली एक गोष्ट आपल्याला खूप भावली, असे प्रियांका सांगते. एवढा टोकाचा संघर्ष केल्यानंतरही मेरी मनाने ‘कठीण’ नाही झाली. आपला मूळ स्वभाव टिकवणे फार अवघड असते, ते तिला सहज जमले आहे.
‘मेरी कोम’ संपल्यानंतर लगेचच प्रियांकाने झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली. मी वर्षांला कमीत कमी चार चित्रपट करते आहे. त्यामुळे साठाव्या वर्षांपर्यंत मी स्किझोफ्रेनिक होण्याची शक्यता जास्त आहे; पण मला असेच आवडते, असे ती म्हणते. एकाच वेळी विविध स्तरांवर सक्रिय असणे मला व्यवस्थित जमते. माझ्यासाठी एका चुटकीसरशी गोष्टी बदलतात, असे ती विश्वासाने म्हणते आणि हा विश्वास आपल्या कामातूनच आला आहे, असे तिचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय गायिका होण्याचा विचार कसा काय केलास? असे विचारल्यावर गाणे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आले, असे ती म्हणते. माझे वडील गायचे, त्यामुळे गाणे माझ्या रक्तातच होते. चित्रपट कारकीर्द स्थिरावल्यानंतर आता आपण गाण्याकडे वळायला हवे, ही इच्छा जोर धरायला लागली होती. त्यानंतर दोन वर्षे मी गाणे शिकले. आंतरराष्ट्रीय गायकीवरच माझा भर होता आणि त्यासाठी मी आणखी दोन वर्षे प्रशिक्षण घेतले. माझ्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी मला खूप मोलाचे सहकार्य केले; पण मी फार लवकर आंतरराष्ट्रीय गायक म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकले. आता तर दोन्ही व्यवसाय सांभाळावे लागतात. म्हणजे, लोक इथून उठून पनवेलला जातात तसे मी विमानाने लॉस एंजेलिसला पोहोचते, असे ती गमतीने म्हणते. कधी चार दिवसांआड, कधी दोन दिवसांआड माझ्या वाऱ्या सुरू असतात. धावपळ खूप आहे; पण कामाचे खूप मोठे समाधान आहे. एक अभिनेत्री, एक गायिका.. और भी बहोत कुछ है..