कमी वेळेत प्रसिद्धी आणि भरमसाट पैसा देणारे ‘ग्लॅमर’चे क्षेत्र म्हणजे मॉडेलिंगचे. काहींना तर तो बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळण्याचा महामार्गही वाटतो. मुंबई तर फॅशन क्षेत्राची कर्मभूमीच. त्यामुळे देशभरातून शेकडो मुले-मुली करियरसाठी म्हणून या क्षेत्रात पर्यायाने मुंबईत येत असतात; परंतु फॅशन क्षेत्रातील हे ‘ग्लॅमर’ चिरकाल टिकणारे नसते. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी सततची धडपड करावी लागते, अनेक तडजोडी कराव्या लागतात; पण यशाचा झगमगता मुकुट सगळ्यांच्याच नशिबी येत नाही. मग काहींना निराशा येते. त्यातूनच व्यसनाधीनता, आत्महत्या, लैंगिक शोषणाचे प्रकार घडतात. आयुष्य वाहवत जाते. काही जण टोकाचे पाऊल उचलतात. गेल्या काही वर्षांमधील मॉडेल्सच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे या क्षेत्राची दुसरी बाजू जगासमोर येऊ लागली आहे. फॅशन जगतातील या दोन्ही बाजूंवर प्रकाश टाकला आहे मृणाल भगत आणि सुहास बिऱ्हाडे यांनी.
झगमगत्या रॅम्पवर उंची कपडे घालायचे किंवा मोठमोठय़ा ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्ये काम करायचे, या अपेक्षेपोटी मुंबईमध्ये दरवर्षी शेकडो मुली येतात; पण सर्वसामान्य मुलामुलींना रॅम्पपर्यंतचा हा पल्ला गाठणे सोपे नसते. मुळात संधी कमी आणि त्या मिळविण्याच्या आशेने या क्षेत्रात येणाऱ्या तरुण-तरुणी अधिक असे व्यस्त प्रमाण असल्याने स्पर्धाही जीवघेणी बनते. नाही म्हणायला भारतातील दोन प्रतिष्ठित ‘फॅशन वीक्स’ दरवर्षी वर्षांतून दोनदा प्रत्येकी दहा ते पंधरा नव्या मॉडेल्सची निवड करतात. सौंदर्यवर्ती स्पर्धाच्या निवड चाचण्यांमध्ये दरवर्षी हजारो मुली भाग घेतात. त्यातील दहा ते वीस जणीच शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचतात. स्पर्धामधून पुढे आलेल्या मॉडेल्सची जबाबदारी आयोजक केवळ त्या स्पर्धेपुरतीच उचलतात. त्यानंतर मात्र त्यांना त्यांच्या वाटा स्वत: शोधाव्या लागतात.
 मॉडेलिंग क्षेत्रामध्ये भरपूर पैसा असतो, असा सर्वसामान्यपणे गैरसमज लोकांमध्ये असतो. नव्या मॉडेल्सना एका फॅशन शोमध्ये दिवसाचे १० ते १५ हजार रुपये मिळतात. चार ते पाच दिवसांच्या फॅशन शोमध्ये त्या ५० हजार रुपयांपर्यंत कमाई करतात; पण सहा महिन्यांतून एकदा होणाऱ्या या शोनंतर पुढचे काही महिने त्यांच्या हातात अभावानेच काम असते. जाहिराती, फोटोशूटमधून मिळणारी कमाई अनिश्चित असते. मॉडेल्सना कामासाठी स्वत:चा चेहरा, शरीर याच्यावर लक्ष देणे गरजेचे असते. आपली ओळख निर्माण करण्यासाठी मग मॉडेल्सना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते, ते सांगत आहेत याच क्षेत्रातील जाणकार.

मत्सर, कुरघोडी नित्याच्या
या क्षेत्रामध्ये मुलामुलींना कारकीर्द घडवण्यासाठी वयाची मर्यादाही असते. वयाच्या तिशीनंतर चेहऱ्यातील वृद्धापकाळाची चिन्हे त्यांच्यासाठी मारक ठरतात. भारतातील मॉडेलिंग क्षेत्र हे खुले मार्केट आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक मॉडेलला केवळ प्रस्थापित नाही, तर तिच्या मागून येणाऱ्या नव्या मॉडेल्सशीसुद्धा स्पर्धा करावी लागते. त्यामुळे येथे स्पर्धेला कधीच अंत नसल्याने मत्सर, कुरघोडीच्या घटना नित्यनियमाच्या असतात.
– कँडीस पिंटो, मॉडेल.

पैशांची जुळवाजुळव करणे कठीण
विशिष्ट लाइफस्टाइल सांभाळणे ही या क्षेत्राची गरज आहे. त्यामुळे पार्लर, मेकअप, उंची कपडे, अ‍ॅक्सेसरीज, स्किन ट्रीटमेंट्स, डाएटीशिअन, फिटनेस ट्रेनरमागे यांच्या मिळकतीतील बहुतेक पैसे खर्च होतात. त्यात कित्येक जणी मुंबईमध्ये भाडय़ाच्या घरामध्ये राहत असतात. त्यामुळे मिळालेला पैसाही सहज खर्च होतो. भारतात अजूनही नव्या मॉडेल्सना कामाचा म्हणावा तितका मोबदला मिळत नाही. त्याबद्दल कित्येकदाआक्षेप घेतला गेलाय, पण त्यावर तोडगा मिळाला नाही.
– अलिसिया राऊत, मॉडेल.

नशा अपरिहार्य
दारू, ड्रग्स हे शब्द मॉडेलिंग क्षेत्रासाठी परवलीचे झाले आहे. रात्रभर चालणाऱ्या शोजमध्ये थकवा जाणवू न देणे, थंडीपासून संरक्षण, आंबटशौकिनांच्या  नजरा टाळणे यासाठी मॉडेल्स शोपूर्वी ड्रिंक्स करणे पसंत करतात. शोनंतरच्या पार्टीजमध्ये ड्रिंक्स करणे ही संस्कृतीच असते; पण गरज म्हणून जवळ केलेल्या दारूचे व्यसनात रूपांतर होते.
काम मिळत नसल्याचा ताण, वाढती उधारी, सततची स्पर्धा यामुळे चिडचिड, नैराश्याने त्या ग्रासल्या जातात. परिणामी आत्महत्या आणि लैंगिक शोषणाचे प्रकार घडतात.
– एक फॅशन स्टायलिस्ट

हे क्षेत्र मानसिक-शारीरिक
पिळवणूक करणारे
मी मॉडेलिंगमध्ये काम करण्यासाठी मुंबईला आले. काही कामे मिळाली. नंतर मात्र संघर्ष वाढला, फसवणूक झाली. त्यामुळे नैराश्य आले. दोन वर्षे मला मानसोपचारतज्ज्ञाकडे  जावे लागत होते. सुदैवाने मी त्यातून बाहेर पडले. आता मी माझ्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहे. मॉडेलिंग क्षेत्रात मानसिक आणि शारीरिक पिळवणूक होत असते एवढे मात्र खरे.
एक पूर्वाश्रमीची मॉडेल

मॉडेल्स नैराश्याच्या बळी
गेल्या दशकभरात मुंबईत अनेक मॉडेल्सनी नैराश्यापोटी आत्महत्या केल्या. त्यांच्यात एक समान धागा होता, तो म्हणजे कुणाच्याच हातात ठोस म्हणावे असे काम नव्हते. त्यातून आलेले नैराश्य हे आत्महत्येसाठी सबळ कारण ठरले होते.
‘‘चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी मॉडेलिंग हे प्रवेशद्वार मानले जाते. अनेक आघाडीच्या अभिनेत्री पूर्वाश्रमीच्या मॉडेल्स होत्या; परंतु सर्वानाच ते साध्य होत नाही. अनेकींची फसवणूक होते. काम देण्याच्या बहाण्याने या मॉडेल्सना तडजोड करावी लागते. ते करूनही काम मिळत नाही. मग अनेक जणी बलात्काराच्या तक्रारी देतात. काही जणी ते सहन करतात आणि गप्प बसतात, कारण परतीचा मार्ग नसतो,’’ असे एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
 मॉडेलिंग क्षेत्रात टिकून राहण्यासाठी राहणीमानावरही तितकेच लक्ष द्यावे लागते. मुंबईच्या उपनगरात भाडय़ाचे घरही पाऊण लाख ते लाख रुपयांना घ्यावे लागते. राहणीमानाचा खर्च वेगळा. मग या मॉडेल्सना इतर अनैतिक मार्गाचा अवलंब करावा लागतो. अनेक मॉडेल चित्रपटात छोटय़ामोठय़ा भूमिका करतात. काही जणी मग एखाद्या निर्मिती संस्थांमध्ये काम करतात. व्हिडीयो अल्बम्स, जाहिरातीत काम मिळविण्याचा प्रयत्न करतात. शेवटी लग्न करून स्थिरावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो; पण तेथेही फसवणूकच होते. जिया खान, नफिसा जोसेफ, विवेका बाबाजी या मॉडेल्सच्या बाबतीतही हेच झाले होते. कामे मिळत नव्हती. ज्यांच्याशी लग्न करून आयुष्यात स्थिर होण्याचा प्रयत्न केला त्यांनीच फसवल्याने त्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या सर्व नैराश्यापोटी मॉडेल्स व्यसनांच्या अधीन होतात.

गेल्या काही वर्षांतील आत्महत्या करणाऱ्या मॉडेल्स
नफिसा जोसेफ
(वय २६) – १९९७ ची फेमिना मिस इंडिया. १२ व्या वर्षांपासून मॉडेलिंग करत होती. वर्सोवा येथील राहत्या घरात २९ जुलै २००४ रोजी गळफास लावून आत्महत्या. तिचे एका उद्योजकाशी लग्न ठरले होते, पण तो विवाहित होता. फसवणूक झाल्याने नैराश्य आल्याची चर्चा.

कुलजित रंधवा (वय ३०) –  ८ जून २००६ रोजी जुहू येथील घरात गळफास लावून आत्महत्या. काम मिळत नसल्याने नैराश्य.

विवेका बाबाजी
(वय ३०) – मिस मॉरिशस आणि कामसूत्र जाहिरातीची प्रसिद्ध मॉडेल. मॉडेलिंग सुटल्यावर स्वत:ची कंपनी काढली. त्यातही नुकसान झाले होते. प्रियकराने फसवणूक केल्याने निराश होऊन २५ जून २०१० मध्ये वांद्रे येथील घरात गळफास लावून आत्महत्या.

अर्चना पांडे (वय २६) – २००९ मध्ये मॉडेलिंग सुटल्यानंतर एका प्रॉडक्शन कंपनीत काम करत होती. प्रियकराने फसवले होते. २९ सप्टेंबर २०१४ मध्ये घरी गळफास घेऊन आत्महत्या.

जिया खान (वय २५) – ‘निशब्द’, ‘गजनी’ आदी चित्रपटांत भूमिका केल्यानंतर जियाला
पुढे कामे मिळत नव्हती. त्यातच सूरज पांचोली या अभिनेत्याशी तिचे प्रेमसंबंध बिघडले होते. या सगळ्या नैराश्यातून ३ जून २०१३ रोजी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
 
शिखा जोशी (वय ४०)
मॉडेलिंग करिअर संपल्यानंतर शिखा दिल्लीत परत गेली होती. पुन्हा ती मुंबईला काम मिळवण्याच्या प्रयत्नात होती. हातात काम नव्हते. एका डॉक्टरवर तिने लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्याच नैराश्यापोटी तिने मे २०१५ मध्ये गळ्यावर वार करून आत्महत्या केली.