घरात असताना मला साधे टेलिव्हिजन चॅनल बदलण्याचा हक्क नसतो, पण मतदानाच्या रूपाने मला देशाचे भविष्य ठरविण्याचा अधिकार मिळाला असल्याची मजेशीर प्रतिक्रिया मतदान केल्यानंतर बॉलीवूड किंग शाहरूख खानने ट्विटरवर दिली आहे. मतदान केल्यानंतर  लगेचच अमेरिकेत सुरू असणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना होणार असल्याचे शाहरूखने यापूर्वीच सांगितले होते.  मतदान करण्यासाठी मुंबईतील अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी सकाळपासूनच हजेरी लावली होती. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, विद्या बालन, सनी देओल आणि सोनम कपूर यांनी गुरूवारी सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला. लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील १९ मतदारसंघांत गुरूवारी होत असलेल्या मतदानामुळे राज्यातील ३३८ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. एकीकडे शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखे अभिनेते मतदानाविषयी सजग असताना मतदानाला दांडी मारून आयफा पुरस्कारांसाठी अमेरिकेत दाखल झालेल्या बॉलीवूडमधील एका मोठ्या वर्गाने आपल्या बेजबाबदारपणाचे प्रदर्शन केले आहे.