कोणतीही हिंदी मालिका पहा.. त्या मालिकेची कथा ज्या प्रांतात घडते त्याच प्रांतातील कलाकारांनी मालिकेतील व्यक्तिरेखा साकाराव्यात, असा अलिखित नियमच असतो जणू.. पंजाबी, गुजराती, सिंधी पाश्र्वभूमीवर कथानक आधारित असेल तर मालिकेतील बहुतेक कलाकारसुद्धा पंजाबी, गुजराती चित्रपट किंवा प्रादेशिक रंगभूमीवरील कलाकार असतात. पण, घोडे अडते ते मराठी बाजाच्या मालिकांकडे. एकतर हिंदीमध्ये मराठी पाश्र्वभूमीवरील कथानक असलेल्या मालिका किंवा मराठी व्यक्तिरेखा अपवादानेच पाहायला मिळतात. त्यातही त्या भूमिका साकारणारे कलाकार कित्येकदा हिंदीच असतात. एकदा मालिका गाजली की या कलावंतांना हिंदी मालिकांची दारे खुली होतात. पण, मराठी कलाकारांच्या बाबतीत मात्र हे चित्र अपवादानेच पाहायला मिळते. निशिगंधा वाड, क्षिती जोग, स्नेहा वाघ, सुमीत राघवन, सविता प्रभुणे, उषा नाडकर्णी, शुभांगी गोखले अशी अपवादात्मक नावे वगळता हिंदी मालिकांच्या क्षेत्रामध्ये तग धरून राहिलेल्या मराठी कलाकारांची संख्या कमी आहे. ‘पवित्र रिश्ता’, ‘इस प्यार को क्या नाम दू’ सारख्या काही मालिका मराठी
संस्कृ तीतील असूनही वर्षांनुवर्ष चालतात, असे सुखद चित्र क्वचितच समोर येते. मात्र, या मालिकांमधून मराठी कलाकार दिसत नाहीत. पूर्णपणे मराठी कथानक, मराठी कलाकार घेऊन केलेले हिंदी मालिको निर्मितीचे प्रयोगही फारसे यशस्वी ठरत नाहीत. अगदी हल्लीच सुरू झालेली ‘चंद्रकांत चिपलूनकर सिडी बम्बावाला’, ‘मायके से बंधी डोर’ सारख्या कित्येक मालिका सुरू झाल्या झाल्या काही दिवसांतच बंद पडल्या. पर्यायाने या मालिकेतून पुढे आलेले मराठी चेहरेसुद्धा प्रेक्षकांच्या विस्मृतीत गेले. यानिमित्ताने, हिंदीत काम करताना अभिनयात सरस असलेले मराठी कलाकार भाषेपासून ते देहबोलीपर्यंत नक्की कुठे कमी पडतात याबद्दल याच क्षेत्रात नाव कमावलेल्या मराठी कलाकारांशी बोलून मांडलेला हा लेखाजोखा..
मराठी कलाकार केवळ मराठी पाश्र्वभूमी असलेल्या मालिकांपुरतेच मर्यादित असतात
हिंदी मालिकांमधील मराठी व्यक्तिरेखा किंवा मराठी पाश्र्वभूमी असलेल्या हिंदी मालिकांमध्ये मराठी कलाकार प्रामुख्याने पाहायला मिळतात. त्या मालिकांचा एकूण बाजच मराठी असल्याने त्यांना ती भूमिका साकारणे कठीण जात नाही. पण, त्याऐवजी पंजाबी, मारवाडी अशा भूमिकांमध्ये मराठी कलाकार फारसे दिसत नाहीत. त्याचे कारण म्हणजे हिंदी भाषेवर प्रभुत्व नसणं हे आहे. हिंदी भाषा एकच असली तरी विविध प्रांतानुसार त्याचा लहेजा बदलत जातो. तो लहेजा आत्मसात करणं हे कलाकारांना कित्येकदा कठीण जातं. त्यामुळे ते मराठी बाजाच्या भूमिकांमध्ये अडकून पडतात. मी हिंदीबरोबर उर्दू भाषेचासुद्धा अभ्यास केला होता. त्यामुळे मला विविध भाषिक व्यक्तिरेखा साकारताना अडचण आली नाही.    
    शुभांगी लाटकर (मालिका – पुकार)
मेहनतीला पर्याय नाही
हिंदी मालिकांमध्ये मेहनतीला पर्याय नसतो हा अलिखित नियम आहे. येथे चित्रीकरणाच्या वेळा मराठीपेक्षा rv10जास्त असतात. त्यामुळे जर मेहनत घ्यायची तयारी असेल तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणी नाही म्हणणार नाही. अर्थात, मराठी असल्यामुळे हिंदी भाषेवर जास्त मेहनत घ्यावी लागतेच. येथे तुम्हाला तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावर अधिक लक्ष द्यावे लागते. कित्येकदा हिंदी मालिकांचे नायक-नायिका मराठी मालिकांमधील कलाकारांपेक्षा तंदुरुस्त दिसतात, त्यामागे हे कारण असते. हिंदीमध्ये कित्येकदा नायिका देखणी, सडपातळ असणं गरजेचं असतं. माझ्या आधीच्या मालिकेमध्ये बारिक दिसणे भूमिकेची गरज असल्याने काही दिवस माझ्या रात्रीच्या जेवणावर बंदी घातली होती. असे प्रकार भूमिकेची गरज म्हणून होतात. त्याला पर्याय नसतो. मराठीच्या बाबतीत असे नियम अजूनतरी लावले जात नाहीत. ज्यावेळी अशा नायिकांची गरज भासेल तेव्हा तिथेही हे बदल नक्कीच होतील.
 स्नेहा वाघ (मालिका – वीरा)
वक्तशीरपणा आणि भाषेचा अडसर यामध्ये आपण मागे पडतो  
मराठी कलाकारांना सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे भाषेचा. आपली मूळ भाषा मराठी असल्याने प्रत्येक rv11राज्यानुसार हिंदी भाषेमध्ये होणारे बदल अंगीकारणे कधीकधी कठीण जाते. शिवाय, मराठी कलाकारांच्या हिंदी संभाषणामध्येसुद्धा मराठी ढब लगेच कळून येते. याशिवाय मराठी मालिका किंवा चित्रपट क्षेत्रामध्ये काम करताना आजूबाजूची माणसं आपल्या ओळखीची असतात, त्यांना आपले काम, कौशल्य ठाऊक असतं. त्यामुळे बरेचदा सेटवर खेळीमेळीचे वातावरण असते. पण, हिंदी मालिकांमध्ये तसं नसतं. तिथे सर्वच एकमेकांना अनोळखी असतात. तुम्हाला सेटवर वेळेवर येण्यापासून ते पाठांतरापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये काटेकोरपणा पाळावा लागतो. मराठी मालिकांच्या सेटवर आता हळूहळू हा बदल जाणवायला लागला आहे.    दअमिता खोपकर (मालिका – तू मेरा हीरो)
गटबाजीचा प्रकार मराठी कलाकारांना जमत नाही
हिंदी मालिका क्षेत्रामध्ये पंजाबी, मारवाडी भाषिक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांचे गट तयार झालेले दिसतात. कालांतराने हे गट आपलं वर्चस्व दाखवायला सुरुवात करतात. आज हिंदी मालिकांमध्ये तंत्रज्ञाचा rv12भाग सांभाळणारे बहुतेकजण मराठी आहेत. पण, त्यांना अशाप्रकारची गटबाजी करून काम करता येत नाही. त्यातही एखादा मराठी माणूस जर पुढे येत असेल तर तो सोबत इतरांना घेऊन येत नाही. त्याचा हा स्वभाव त्याला नडतो. कित्येक मराठी कलाकारांनी हिंदीमध्ये उत्तम काम केलेलं आहे. पण, मराठी माणूस कधीही स्वत:हून समोरच्याकडे काम मागायला जात नाही. हे चांगलं की वाईट हा प्रत्येकाचा निर्णय आहे. मी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर अगदी सध्या चालू असलेल्या ‘एव्हरेस्ट’ मालिकेसाठीसुद्धा आशुतोष गोवारीकर यांनी माझे काम पाहून मला भूमिकेबद्दल विचारले. त्यामुळे आपणच कुठेतरी स्वत:च्या कामाचा पुरस्कार करण्यात कमी पडत आहोत, असं मला वाटतं. त्याचबरोबर मराठी नटाला एकाच वेळी नाटक, मालिका किंवा सिनेमा अशी तारेवरची कसरत करण्याची सवय असते. पण, इथे एकदा एक मालिका हातात घेतली की तुम्ही दोन-तीन वर्षांसाठी त्यात अडकून पडता. इतर ठिकाणी लक्ष द्यायला तुम्हाला वेळ मिळत नाही.
– मिलींद गुणाजी (मालिका – एव्हरेस्ट)