क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी महापालिकेला सुपरस्टार अमिताभ बच्चनची साथ मिळाली असून रविवारी, जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये क्षयरोग नियंत्रण जनजागृती मोहिमेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अमिताभने क्षयरोग जनजागृतीसाठी केलेल्या माहितीपटाचे या वेळी प्रकाशन होईल.
शहरात क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या तीस हजारांहून अधिक आहे. क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेला बिल अॅण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहकार्य मिळाले आहे. क्षयरोगाबाबत जनजागृती झाल्यावरच त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याने याबाबत जोरदार मोहीम हाती घेण्याचे ठरले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी माहितीपटातून संदेश देण्याची योजना आखण्यात आली. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन, आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत, महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत हॉटेल जे. डब्ल्यू मॅरियटमध्ये जनजागृती अभियानाची सुरुवात होईल.