एका सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी.. कुठलीही फिल्मी किंवा ग्लॅमर विश्वाची पाश्र्वभूमी नसताना फॅशन विश्वात शिरकाव करते.. तिथल्या सर्वस्वी अनोळखी वातावरणात नेटाने काम करते.. सर्वोच्च मानाचा किताब मिळवते आणि चांगलीच स्थिरावते.. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही चित्तरकथा अमृता पत्की नावाच्या मुलीच्या खऱ्या आयुष्याची गोष्ट आहे. तीच उलगडणार आहे यंदाच्या व्हिवा लाऊंजमधून!
मॉडेलिंगची आवड असणाऱ्या अनेक मुली असतात, पण या मोहमयी दुनियेतला शिरकाव सोपा नाही हेच ऐकून असतात. फॅशन विश्वाबद्दल अनेक समज-गैरसमज असल्याने सहसा सामान्य घरातली मुलगी इथे यायला धजावत नाही. माध्यमांनीही फॅशन विश्वाची अशीच प्रतिमा तयार केली आहे. पण या सगळ्याला छेद देत अमृता इथे स्थिरावली. ‘मिस इंडिया’ स्पर्धेत यश मिळवल्यानंतर २००६ मध्ये ‘मिस अर्थ’ या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेतही तिने ‘मिस अर्थ एअर’ हा किताब मिळवला आणि तिच्या मॉडेलिंगच्या करिअरची वाट सुकर झाली. अमृता आज देशातील टॉप मॉडेल्सपैकी एक गणली जाते. मोठमोठय़ा डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक करण्याबरोबरच ती तिची संगीताची आवडदेखील जोपसते आहे. आंतरराष्ट्रीय संगीत मैफलींचे ती सूत्रसंचालन करते. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी काय करायचे? रॅम्पच्या लखलखाटामागे कसे वातावरण असते? फॅशन विश्वाविषयीचे समज किती खरे किती खोटे हे प्रत्यक्ष अमृताच्या तोंडून जाणून घ्यायची संधी व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून मिळणार आहे.

*कधी – मंगळवार,
२९ एप्रिल
*कुठे – सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
*वेळ – दुपारी ३.३०
*विनामूल्य प्रवेशिका शुक्रवारपासून उपलब्ध.
*मिळण्याचे ठिकाण – १. सावरकर सभागृह, दादर २. महाराष्ट्र वॉच कंपनी, दादर (प.)