विधानसभेच्या ६२ पैकी ४४ जागा जिंकून राज्याची सत्ता मिळविण्यात भाजपला मदत झालेल्या विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे. गोंदियामध्ये राष्ट्रवादी तर भंडाऱ्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने अवघ्या आठ महिन्यांमध्ये जनमत भाजपच्या विरोधात गेले असून, सत्ताधारी पक्षासाठी हा धोक्याचा इशारा आहे.
नवी मुंबई आणि वसई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला दुहेरी आकडा गाठणे शक्य झाले नव्हते. औरंगाबादमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले. सत्ता मिळाल्यावर फक्त पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. हा अपवाद वगळता सत्तेत आल्यापासून आठ महिन्यांमध्ये भाजपची घसरण सुरू झाली आहे. मध्यंतरी झालेल्या अंबरनाथ, बदलापूरसह काही नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने आघाडी घेतली होती. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्ता होती, पण दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजपची पिछेहाट झाली आहे.
विदर्भातून भाजपला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले होते. लोकसभा निवडणुकीत युतीने सर्व १० जागांवर विजय मिळविला होता. विधानसभा निवडणुकीत भंडारा जिल्ह्यातील तिन्ही तर गोंदिया जिल्ह्यातील चारपैकी तीन जागांवर भाजपचे आमदार निवडून आले होते. अशी पाश्र्वभूमी असताना विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या आठ महिन्यांमध्येच मतदारांनी भाजपला नाकारले आहे.
गोंदियामध्ये राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. भंडारा हा भाजपचा पांरपारिक बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्यात भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
विदर्भ हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असला तरी गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पार सफाया झाला होता. भंडारा जिल्हा परिषदेत सर्वाधिक १९ जागा जिंकल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गोंदियामध्ये सर्वाधिक जागा जिंकून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.  काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळे लढूनही हे यश मिळाले हे आणखी विशेष आहे. शेतीचे प्रश्न, धानाला भाव, गोरगरिबांच्या विविध योजना बंद करणे यामुळे मतदारांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपला नाकारल्याचे मत राष्ट्रवादीचे सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. तर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीकडे भाजप व मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यानेच कौल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेला. ही तर सुरुवात असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली.

सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार ?
भंडारा जिल्ह्यत ५२ पैकी १९ जागा काँग्रेसने जिंकल्या असून, सत्ता संपादनाकरिता १५ जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीची मदत लागणार आहे. चार अपक्ष निवडून आले असले तरी त्यांच्या मदतीने सत्ता स्थापन करणे काँग्रेसला शक्य होणार नाही. गोंदियामध्ये ५३ पैकी १९ जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेसच्या मदतीची गरज आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मतदारांनी भाजपच्या विरोधात कौल दिल्याने साहजिकच काँग्रेसबरोबर आघाडीचा पर्याय खुला असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे. विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये झालेला पराभव ही चिंतेची बाब असून, पक्षाला आत्मपरीक्षण करावे लागेल, अशीच प्रतिक्रिया भाजपच्या एका मंत्र्याने व्यक्त केली.