औरंगाबाद महापालिकेतील महापौर आणि सत्तापदांवरुन भाजप-शिवसेनेत जुंपली असून आपलाच महापौर निवडून आणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. पहिली अडीच वर्षे महापौरपद मिळावे, ही भाजपची मागणी शिवसेनेने साफ धुडकावून लावली आहे. भाजपला कमी जागा मिळूनही महापौरपद अडीचवर्षे हवे असेल, तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावे, असे शिवसेना नेत्यांनी भाजपला सुनावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना-भाजपने युती करुन निवडणूक लढविली, तरी सत्तापदांवरुन चर्चा फिसकटली असल्याने महापौरपदाच्या निवडणूक िरगणात भाजप, शिवसेना आणि एमआयएचे उमेदवार राहण्याची चिन्हे आहेत.
औरंगाबादमध्ये युतीच्या जागावाटपात शेवटपर्यंत वाद झाले आणि निवडणूक निकालानंतरही शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘स्वबळावर लढलो असतो, तर बरे झाले असते’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. महापौरपदावरुनही आता शिवसेना-भाजपमध्ये तडजोड होण्याची शक्यता नसून भाजपची पहिली अडीच वर्षे महापौरपदाची मागणी मान्य करणे शक्य नाही, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.
अडीचवर्षे महापौरपद, पाच वर्षे उपमहापौरपद व स्थायी समिती अध्यक्षपद भाजपला हवे आहे. शिवसेनेला अधिक जागा मिळाल्याने त्यांनी हा प्रस्ताव अमान्य केला आहे. शिवसेनेकडे पहिली चार वर्षे महापौरपद आणि शेवटचे एक वर्षे भाजपला महापौरपद, पाच वर्षे उपमहापौरपद आणि अडीच वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद देण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे समजते. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात यासंदर्भात झालेली बोलणी फिसकटली आहेत. भाजपने तडजोड केली, तरच या प्रश्नातून मार्ग निघेल, असे शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केले.

संख्याबळ शिवसेनेकडे
महापौरपदासाठी सेना, भाजप, एमआयएमचे उमेदवार रिंगणात
शिवसेना आणि एमआयएमचे उमेदवार माघारी घेतले जाणार नाही. भाजपनेही निवडणूक लढविली, तर भाजप व एमआयएम यांना जास्तीत जास्त ३० मते मिळू शकतात. शिवसेनेने ४५ ते ५० मतांसाठी तयारी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मतांची वेगळ्या स्वरुपात बेगमी करण्यासाठीही व्यूहरचना करण्यात येत असल्याचे समजते. भाजपने असहकार्य केल्यास अन्य पदांसाठीही वेगळ्या पध्दतीने खेळी करण्याची तयारी शिवसेना करीत आहे.