एकाच पुलाच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय लाटण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झाली असून आपापल्या नेत्यांना सोबत घेऊन भूमिपूजनाचा धडाका उडविण्याचे मनसुबे दोन्ही पक्षांतील सुभेदारांनी आखले आहेत. परिणामी दिवसेंदिवस पालिकेमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामधील दरी रुंदावू लागली आहे.
गोरेगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे एस. व्ही. रोड जंक्शन आणि सावरकर पूलानजिक नव्या पूलाच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुलाच्या उभारणीसाठी दोन्ही पक्षांचे नगरसेवक आग्रही होते. त्यामुळे या पुलाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त काढण्यात आला. .
महापौर स्नेहल आंबेकर यांच्या आदेशानुसार प्रजासत्ताक दिनी या पुलाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याचे सकाळी ११.३० वाजता आयोजन करण्यात आले.  विशेष अतिथी म्हणून उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना, तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विद्या ठाकूर, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, उपमहापौर अलका केरकर, आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची नावे निमंत्रण पत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. मात्र असे असतानाही भाजपच्या गोटातून पत्रकारांना रविवारी वॉटसअपच्या माध्यमातून विशेष निमंत्रण देण्यात आले. या निमंत्रणात भूमिपूजनाचा कार्यक्रम सकाळी ११.३० ऐवजी ११ वाजता असल्याचे नमूद करण्यात आले होते. विद्या ठाकूर, आशीष शेलार, अलका केरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला होता. शिवसेनेचे मंत्रीच नव्हे तर महापौरांचा उल्लेख त्यात टाळण्यात आला होता. महापौरांच्या हस्ते ११.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमापूर्वीच ११ वाजता आपल्या नेत्यांसोबत हा कार्यक्रम उरकण्याचे मनसुबे भाजप नेत्यांनी आखले होते.