आपल्याला प्रवास करावयाची गाडी सध्या कोणत्या स्थानकात आहे, ती किती तास उशीरा आहे वा तिचा मार्ग बदलला आहे का, ही माहिती मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. भारतीय रेल्वेच्या ‘राष्ट्रीय रेल्वे चौकशी यंत्रणे’ने (एनटीईएस) नुकतेच आपले अ‍ॅप्लिकेशन गुगल प्लेवर आणले आहे. रेल्वेने तयार केलेल्या या अधिकृत अ‍ॅपमध्ये आपल्याला गाडीचे सध्याचे ठिकाण, गाडीची वेळापत्रकानुसारची वेळ आणि सध्याची वेळ याची माहिती मिळू शकणार आहे. याचबरोबर आपण प्रवास करत असताना गाडी सध्या ज्या स्थानकावर आहे त्या स्थानकापासून आपल्या इच्छित स्थानकापर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागेल याचा तपशीलही मिळेल. याशिवाय वेळापत्रकातील बदल, गाडय़ा रद्द वा मार्गात काही बदल झाल्यास त्याचा तपशीलही अ‍ॅपमध्ये उपलब्ध होईल. अ‍ॅप अँड्रॉइड आणि विंडोजवर उपलब्ध आहे.
आंध्र प्रदेशातील फरार ज्योतिषाचा ठाण्यात शोध
ठाणे: आंध्र प्रदेशात मालमत्तेच्या वादातून झालेल्या हत्या प्रकरणात फरार असलेला ज्योतिषी तिरुपती नागाराजू आणि त्याचे कुटुंबीय मुंबई-ठाणे परिसरात वास्तव्यास असल्याचा संशय असल्याने आंध्र प्रदेश पोलिसांचे पथक ठाणे शहरात दाखल झाले आहे. या पथकाने ठाणे पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला आहे. तसेच मुंबई-ठाणे परिसरात त्याचे छायाचित्र असलेली सुमारे चार हजार पोस्टर्स लावण्यात येणार आहेत.